प्रदीर्घ आजारपणातही सतत आनंदी रहाणार्‍या आणि अंतर्मनाने साधना करणार्‍या पुणे येथील ६५ टक्के आध्यात्मिक पातळीच्या (कै.) श्रीमती सुलभा महाजन (वय ८१ वर्षे) !

१४.४.२०२२ (चैत्र शुक्ल त्रयोदशी) या दिवशी पुणे येथील सुलभा महाजनआजी यांचे निधन झाले. त्यांच्या कुटुंबियांना लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्या निधनसमयी जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.

(कै.) श्रीमती सुलभा महाजन

१. श्री. सुरेंद्र विनायक महाजन (कै. आजींचा मोठा मुलगा, वय ६३ वर्षे), पुणे

श्री. सुरेंद्र महाजन

१ अ. संसाराचे दायित्व सांभाळून मुलांवर चांगले संस्कार करणे : ‘माझ्या वडिलांच्या अल्प पगारात, तसेच लहान घरात राहून आई घरी आलेले नातेवाईक, शेजारी यांना आवश्यक ते साहाय्य करत असे. तिने कधीही कुणाविषयी तक्रार केली नाही. ती नित्य ‘देवळात जाणे, पूजा-अर्चा करणे, काकड आरतीला, तसेच भजनी मंडळात जाणे’, असे करत असे. तिने आम्हा चारही भावंडांवर उत्तम संस्कार करून आम्हाला चांगले शिक्षण दिले.

१ आ. दृष्टी गेल्याने परावलंबी होणे, तरीही आनंदी असणे : आईला २३ वर्षांपूर्वी अर्धांगवायूचा झटका आला. त्यात तिची दृष्टी गेली. ती काही वर्षे झोपून होती. तिच्यावर केलेल्या उपचारांमुळे तिच्या प्रकृतीत सुधारणा झाली; परंतु तिला दिसत नसल्याने तिचे जीवन परावलंबी झाले होते, तरीही ती समाधानी, आनंदी आणि सतत देवाच्या अनुसंधानात रहात असे. आईकडून मला ‘परेच्छेने वागणे आणि सतत आनंदी रहाणे’, हे गुण शिकता आले.

१ इ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर श्रद्धा ठेवून साधनेचे प्रयत्न करणे : ती सतत ‘प.पू. गुरुदेवांच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) अनुसंधानात रहाणे, मानसपूजा करणे, प.पू. भक्तराज महाराज यांची भजने ऐकणे, ‘ऑनलाईन’ सत्संग ऐकणे, अखंड नामजप करणे’, असे प्रयत्न करत होती. तिची प.पू. गुरुमाऊलीवर संपूर्ण श्रद्धा होती.

१ ई. मुलाला सेवेला जाण्यासाठी साहाय्य करणे : योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांच्या मार्गदर्शनानुसार होणार्‍या देवद आश्रमाजवळ असलेल्या गाढी नदीतील अनुष्ठानासाठी, तसेच नाशिक कुंभमेळा येथे मला १५ दिवस सेवेला जायचे होते. तेव्हा आईने मला सांगितले, ‘‘तू माझी काही काळजी करू नकोस. तू सेवेला जा.’’ तिच्यामुळेच मी दोन्ही ठिकाणी सेवेला जाऊ शकलो.

आईची सेवा करण्यात मी पुष्कळ अल्प पडलो. आईच्या सेवेत माझी पत्नी, माझा भाऊ आणि बहीण अन् त्यांचे कुटुंब यांचे पुष्कळ सहकार्य मिळाले. त्याबद्दल गुरुमाऊलीच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

२. सौ. सुरेखा अनिल पेटकर (कै. आजींची मधली मुलगी, वय ६० वर्षे), पुणे

सौ. सुरेखा पेटकर

२ अ. अंतर्मनातून साधना करणे : आईला अर्धांगवायूचा झटका आल्याने ती २३ वर्षे काही करू शकत नव्हती, तरीही तिची अंतर्मनातून साधना होत होती. ६.४.२०१७ या दिवशी रामनवमीच्या पूर्वसंध्येला आईची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के झाल्याचे घोषित केले.

२ आ. गुरुदेवांप्रती भाव : एकदा गुरुदेवांच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) आजारपणाविषयी दैनिक ‘सनातन प्रभात’ मध्ये लिखाण छापून आले होते. त्या दिवशी तिने ‘आज दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये काय आले आहे?’, असे विचारले. तिला गुरुदेवांच्या आजारपणाविषयी  सांगितले. तेव्हा तिने दैनिक ‘सनातन प्रभात’ भावपूर्णरित्या हातात घेऊन स्वतःच्या तोंडवळ्याला लावले. त्या वेळी ती ‘माझ्या गुरुदेवांना बरे नाही’, असे म्हणून रडत होती.

२ इ. आईचे आजारपण आणि तिचे निधन

२ इ १. आई अतीदक्षता विभागात असतांना तिच्या हृदयात परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे दर्शन होणे : आईला शेवटच्या काही दिवसांत शरिरात ताप आणि उष्णता जाणवून श्वास घ्यायला आणि बोलायला त्रास होत होता. १२.४.२०२२ या दिवशी तिला रुग्णालयात अतीदक्षता विभागात भरती केले. तेव्हा तिच्या शरिरावर असलेले (सलाईनच्या) नळ्यांचे जाळे पाहून मला पुष्कळ वाईट वाटले. त्या वेळी मला तिच्या हृदयात प.पू. गुरुदेवांच्या मुखकमलाचे दर्शन झाले. तेव्हा ‘त्यांच्याकडून प्रक्षेपित होणारे चैतन्य आणि त्यांच्या चरणांचे तीर्थ ‘सलाईन’मधून आईच्या शरीरभर पसरत आहे’, असे मला जाणवले. त्यानंतर माझे मन शांत आणि स्थिर होऊन माझा नामजप होऊ लागला.

२ इ २. आईला रुग्णालयातून घरी नेतांना वैखरीतून नामजप करणे आणि तिच्या निधनाच्या वेळी स्थिर रहाणे : आधुनिक वैद्यांनी ‘रुग्णाला घरी घेऊन जाणार कि रुग्णालयात ठेवायचे ?’, असे विचारले. आम्ही आईला प्राणवायूचा पुरवठा चालू ठेवून घरी नेण्याचे ठरवले. आईला रुग्णवाहिकेतून घरी आणेपर्यंत मी आणि माझा भाऊ आईची छाती अन् पाय यांवर हात ठेवून, तसेच तिचा हात हातात घेऊन वैखरीतून नामजप करत होतो. तिला घरी आणल्यावर तिने केवळ २ – ३ श्वास घेतले. नंतर तिने हळूहळू डोळे मिटले. आईच्या निधनाच्या वेळी कुटुंबीय शांत आणि स्थिर होते.

२ इ ३. ‘आईच्या साधनेमुळे तिच्या शेवटच्या श्वासापर्यंत प.पू. गुरुदेव तिच्या समवेत आहेत’, असे जाणवणे : ‘आईने केलेल्या साधनेमुळे तिच्या शेवटच्या श्वासापर्यंत प.पू. गुरुदेव सूक्ष्मातून तिच्या समवेत होते’, हे माझ्या लक्षात आले. ‘या सर्व प्रसंगांतून गुरुमाऊली प्रत्येक क्षणी आपल्या समवेत असते. त्यामुळेच आपण श्वास घेत आहोत’, हे मला प्रत्यक्ष अनुभवता आले.

आईला रुग्णालयात भरती केल्यापासून ते आईचे निधन होईपर्यंत ३ दिवसांत परात्पर गुरु डॉक्टरांनी आम्हाला अंतर्मुख केले आणि आमच्याकडून साधना करून घेतली. सद्गुरु (कु.) स्वाती खाडये, अन्य सद्गुरु आणि संत, सौ. मनीषा पाठक (आध्यात्मिक पातळी ६९ टक्के), साधक यांच्याप्रती आम्हा पेटकर अन् महाजन कुटुंबांकडून कृतज्ञता आणि त्यांना भावपूर्ण नमन ! गुरुदेवांच्या कृपेने आईचे प्रारब्ध सुसह्य झाले. अशा गुरुमाऊलींप्रती आणि परम पूज्यांची भक्त असलेली आई यांच्या चरणी कोटीशः प्रणाम !’

(लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक २५.४.२०२२)

१. सौ. रेणुका सुरेंद्र महाजन (मोठी सून), पुणे

१ अ. सोशिक आणि समाधानी वृत्ती : ‘आई (सासूबाई) पुष्कळच सोशिक वृत्तीच्या होत्या. त्या कुठल्याही परिस्थितीत आनंदी आणि समाधानी असायच्या. मी नोकरी करत असल्याने माझ्याकडून त्यांची सेवा फारशी झाली नाही; मात्र त्यांनी कधीही गार्‍हाणे केली नाही. मी त्यांना भ्रमणभाष केल्यावर त्याच माझ्या प्रकृतीविषयी विचारपूस करत असत.

१ आ. त्या मला सतत ‘नामस्मरण आणि प्रार्थना कर अन् स्वतःची काळजी घे’, असे सांगायच्या.’

२. सौ. आशा सतीश महाजन (धाकटी सून), पुणे

अ. ‘सासूबाई नेहमी आनंदी असत. त्या आजारी असतांनाही कधीही नकारात्मक बोलल्या नाहीत.

आ. त्या माझ्या माहेरच्या नातेवाइकांची नेहमी विचारपूस करत असत. माझे बाबा घरी आल्यानंतर त्या त्यांना जेवल्याविना जाऊ देत नसत.’

३. श्री. उत्कर्ष सतीश महाजन (नातू (मुलाचा मुलगा), वय २१ वर्षे), पुणे

३ अ. प्रेमभाव : ‘मी परीक्षेत उत्तीर्ण झाल्यावर तिला पुष्कळ आनंद व्हायचा. ती ‘काहीतरी गोड करा’, असे सांगायची. आजीने घरकाम करायला येणार्‍या दोन्ही मावशींनाही जीव लावला होता. आजी त्यांच्या घरातील व्यक्तींची प्रतिदिन चौकशी करत असे. आजी वेळप्रसंगी, सणांच्या दिवशी त्यांना आपुलकीने काही ना काही देत असे.

प.पू. डॉक्टरांच्या कृपेमुळे मी आजीची सेवा करू शकलो. आजीच्या सेवेतून मला ‘प्रामाणिकपणा, वक्तशीरपणा आणि त्यागी वृत्ती’ हे गुण शिकता आले. याबद्दल गुरुमाऊलीच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’

४. श्री. अनिल पेटकर (जावई, वय ६५ वर्षे), पुणे

४ अ. आतिथ्यशील : ‘सासूबाई अतिशय शांत स्वभावाच्या होता. त्या घरी येणार्‍या सर्वांचे आस्थेने आणि प्रेमाने आदरातिथ्य करत.

४ आ. त्या सतत नामजप करून देवाच्या अनुसंधानात रहात असत. त्या घरी येणार्‍यांनाही नामजप करायला सांगत.

४ इ. त्यांना तीर्थक्षेत्राच्या ठिकाणाहून किंवा सत्संग यांतून मिळालेला किंवा संतांनी पाठवलेला प्रसाद मिळाल्यावर पुष्कळ आनंद होत असे.’

५. कु. क्रांती अनिल पेटकर (मोठी नात (मुलीची मुलगी), पुणे

अ. ‘आजीला दैनिक ‘सनातन प्रभात’ वाचून दाखवल्यावर ते ऐकायला आणि ‘ऑनलाईन’ सत्संग ऐकायला पुष्कळ आवडायचे.

आ. मी तिला भेटायला गेल्यावर ती मला माझ्या सेवेविषयी विचारायची. ती मला कधी मायेतील गोष्टींविषयी विचारायची नाही.

गुरुमाऊलींच्या कृपेने मला अशी आध्यात्मिक स्तरावर साहाय्य करणारी आजी मिळाली आणि तिच्याकडून मला शिकता आले. ‘जीवनात साधना करणे किती आवश्यक आहे !, हे मला शिकायला मिळाले. त्याबद्दल गुरुमाऊलींच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

६. कु. स्पर्धा सुरेश राऊत (नात (मुलीची मुलगी), वय २० वर्षे) आणि कु. तन्वी सुरेश राऊत (नात (मुलीची मुलगी), वय २२ वर्षे), बर्मिंगहॅम, इंग्लंड.

६ अ. ‘आम्ही अल्प वेळा आजीला भेटलो असलो, तरीही आमच्या आयुष्यात नेहमी तिचे आदराचे आणि प्रेमाचे स्थान आहे.’

(लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक २१.१०.२०२२)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक