चीनच्या हेरगिरी नौकेमुळे भारताकडून ‘अग्नी’ क्षेपणास्त्राची चाचणी स्थगित !

चीनची हेरगिरी करणारी नौका ‘यूआन वांग-६’

नवी देहली – चीनने तिची हेरगिरी करणारी ‘यूआन वांग-६’ ही नौका हिंदी महासागरात पाठवल्याने भारताने बंगालच्या खाडीमधील नियोजित अग्नी क्षेपणास्त्राची चाचणी स्थगित केली. येत्या १० आणि ११ नोव्हेंबरला ही चाचणी करण्यात येणार होती. नेमके त्यापूर्वीच चीनने इंडोनेशियाजवळील समुद्रात असलेल्या या नौकेला हिंदी महासागरात पाठवले. या नौकेद्वारे भारतीय क्षेपणास्त्राविषयीची माहिती गोळा करण्यात येण्याची शक्यता असल्याने ही चाचणी रहित करण्यात आली. यासह या चाचणी संदर्भात प्रसारित केलेल्या सूचनाही रहित करण्यात आल्या आहेत.

‘युआन वांग-६’ या नौकेवर अँटिना, अत्याधुनिक पाळत ठेवणारी उपकरणे आणि ‘सेन्सर्स’ आहेत. या नौकेची इलेक्ट्रॉनिक हेरगिरी करण्याची, उपग्रह प्रक्षेपणांवर लक्ष ठेवण्याची, तसेच लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांंच्या कक्षीय मार्गाचा मागोवा घेण्याची क्षमता आहे. या नौकेवर चीनचे ४०० सदस्य कार्यरत आहेत.

संपादकीय भूमिका

चीनच्या या चालीमुळे भारताला माघार घ्यावी लागली, याचा भारताने सूड उगवणे आवश्यक आहे, अन्यथा चीन भारताला अशाच प्रकारे आडकाठी आणत राहील आणि भारताला माघार घेत रहावी लागेल !