उत्तरप्रदेशमध्ये ९ जणांची इस्लाम सोडून हिंदु धर्मात ‘घर वापसी’

मुझफ्फरनगर – येथे ९ जणांनी इस्लाम सोडून हिंदु धर्मात ‘घर वापसी’ केली. हिंदु धर्म स्वीकारणारे हे कुटुंब मूळचे सहारनपूरचे आहे. त्यांच्या पूर्वजांनी दीडशे वर्षांपूर्वी दबावाखाली इस्लाम पंथ स्वीकारला होता. आता ते स्वेच्छेने हिंदु धर्मात परतले आहेत.

प्रसारमाध्यमातील एका वृत्तानुसार, या मुसलमान कुटुंबाने मुझफ्फरनगरमधील यशवीर आश्रम बाघरा येथे हिंदु धर्म स्वीकारला. या आश्रमात स्वामी यशवीर महाराज यांच्या उपस्थितीत यज्ञ-हवन करून या कुटुंबातील ९ जणांना वैदिक विधींनुसार हिंदु धर्मात प्रवेश देण्यात आला. हिंदु धर्म स्वीकारलेल्या वादिल याचे विवेक सैनी असे नामकरण करण्यात आले आहे. यासह अलिसाला अनन्या सैनी, राबियाचे पल्लवी सैनी, नाझियाचे नीतू सैनी, वारिसाचे मनीषा सैनी, गुलिस्तानचे रविता सैनी, सानियाचे निशा सैनी, आकीलचे रोहित सैनी आणि रुखसाना याचे बबिता सैनी असे नामकरण करण्यात आले आहे.

यशवीर आश्रमाचे स्वामी यशवीर महाराज म्हणाले की, हे सर्व लोक प्रथम हिंदु सैनी होते; पण दबावाखाली त्यांचे पूर्वज १५० वर्षांपूर्वी मुसलमान बनले होते. आता सनातन धर्म संस्कृतीचा स्वीकार करून त्यांनी हिंदु धर्म स्वीकारला आहे. यापूर्वी यशवीर महाराज यांनी जिल्ह्यातील फुलत गावात असलेल्या मदरशात हिंदूंचे बलपूर्वक धर्मांतर केले जात असल्याचा आरोप केला होता. आतापर्यंत लाखो हिंदूंना प्रलोभन दाखवून त्यांचे धर्मांतर करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. फुलत गावातील मदरशाचे अन्वेषण करून कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.

उत्तराखंडमधील एका मुसलमानाकडूनही हिंदु धर्म स्वीकारण्यासाठी न्यायालयात अर्ज !

उत्तराखंडमधील डेहराडूनमधील सईद अर्शद नावाच्या मुसलमान व्यक्तीने इस्लाम सोडून हिंदु धर्म स्वीकारण्यासाठी जिल्हा न्यायालयात अर्ज केला आहे.