शहरातील वाहतूक कोंडी अल्प करायची असेल, तर सर्व बी.आर्.टी. मार्ग बंद करा ! – अमिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त

डावीकडे अमिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त

पुणे – वाहतूक कोंडी रोखण्यासाठी शहरात येणार्‍या जड वाहनांना बंदी घालावी. पोलिसांकडून गर्दीच्या ठिकाणी वाहतूक नियमन व्हावे, अशी मागणी महापालिकेने पोलीस आयुक्तांकडे केली होती; मात्र ही मागणी जिव्हारी लागलेल्या पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी महापालिकेलाच सल्ला दिला आहे. शहरातील वाहतूक कोंडी अल्प करायची असेल, तर सर्व बी.आर्.टी. मार्ग बंद करा, अशी मागणी अमिताभ गुप्ता यांनी पत्राद्वारे केली आहे. या पत्रानंतर सहस्रो कोटी रुपये व्यय केलेल्या या बी.आर्.टी. मार्गाविषयी उलटसुलट चर्चा चालू झाली आहे. गुप्ता यांनी हे पत्र २६ ऑगस्ट या दिवशी पाठवले होते. त्याला आता २ मास उलटून गेल्यानंतरही महापालिकेने त्याविषयी काहीही कृती केली नाही. त्यानंतर पुन्हा पोलिसांकडून पत्र पाठवण्यात आले. (पोलीस आयुक्तांच्या पत्रावरही कृती न करणारे महापालिका प्रशासन सर्वसामान्यांच्या सूचनांची कधी नोंद घेईल का ? – संपादक)

गुप्ता यांनी पत्रात म्हटले आहे की, पुणे शहरामध्ये पुणे-नगर रोड, पुणे-सोलापूर रोड आणि पुणे सातारा रोडवर बी.आर्.टी. योजना राबवण्यात आली आहे. हे तीनही राष्ट्रीय महामार्ग आहेत. बाहेरील जिल्ह्यातून याच मार्गाने मोठ्या प्रमाणावर वाहने ये-जा करतात. रस्त्याचा बराचसा भाग हा केवळ पी.एम्.पी.साठी वापरला जातो. त्यामुळे उर्वरित रोडवर वाहतुकीचा अतिरिक्त ताण येऊन वाहतूक कोंडी होते. तसेच अपघाताचे प्रमाणही वाढत आहे. त्यामुळे हा मार्ग बंद करून संपूर्ण रस्ता वाहतुकीसाठी खुला करावा.