भाजपचे नेते प्रवीण नेट्टारू यांच्या हत्येच्या प्रकरणी पी.एफ्.आय.च्या तिघांना अटक

भारतीय जनता युवा मोर्चाचे नेते प्रवीण नेट्टारू

मैसुरू (कर्नाटक) – कर्नाटकतील भारतीय जनता युवा मोर्चाचे नेते प्रवीण नेट्टारू यांच्या हत्येच्या प्रकरणी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (‘पी.एफ्.आय.’च्या) ३ कार्यकर्त्यांना अटक केली आहे. सुळ्या येथे शफी बेळ्ळारे, इकबाल बेळ्ळारे आणि इब्राहिम शाह अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. इकबाल बेळ्ळारे हा येथील बेळ्ळारे गावातील पंचायतीचा सदस्य आहे, तर शफी बेळ्ळारे पी.एफ्.आय.ची राजकीय शाखा ‘सोशलिस्ट डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया’चा राज्य सचिव आहे.


नेट्टारू यांच्या हत्येच्या प्रकरणी पी.एफ्.आय.चे महंमद मुस्तफा, तुफैल, उमर फारुख आणि अबू बकर सिद्दीकी यांचा शोध घेतला जात आहे. यातील महंमद मुस्तफा आणि तुफैल यांची माहिती देणार्‍यांना ५ लाख, तर उमर फारुख याची माहिती देणार्‍यांना २ लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येईल, असे एन्.आय.ए.ने घोषित केले आहे.

२६ जुले २०२२ या दिवशी प्रवीण नेट्टारू यांची बेळ्ळारे येथे त्यांच्या दुकानाबाहेर हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी झाकीर आणि शफीक यांना आधीच अटक करण्यात आली आहे.