जिहादी आतंकवादावरील ‘द केरल स्टोरी’ चित्रपटाचे विज्ञापन प्रदर्शित

चित्रपटात ३२ सहस्र हिंदु आणि ख्रिस्ती तरुणींचे धर्मांतर केल्याचे अन् त्यांचे आतंकवादासाठी वापर केल्याचे चित्रण

‘द केरल स्टोरी’ चित्रपटाचे निर्माते विपुल शहा (उजवीकडे)

मुंबई – ‘द केरल स्टोरी’ या हिंदी चित्रपटाचा विज्ञापन (टीझर) प्रदर्शित करण्यात आला. यामध्ये हिजाब (मुसलमान महिलांचे डोके आणि गळा झाकण्याचे वस्त्र) घातलेली एका महिला दाखवण्यात आली असून तिचे परिचारिका बननण्याचे स्वप्न असते; मात्र तिचे घरातूनच अपहरण करण्यात येते. यानंतर ती अफगाणिस्तानमधील कारागृहात बंद असल्याचे स्वतः सांगते. या चित्रपटातून केरळातील ३२ सहस्र तरुणींना आमीष, दबाव, भीती आदींद्वारे जाळ्यात ओढून जिहादसाठी इस्लामी देशांत नेण्यात आल्याचे दाखवण्यात आले आहे. या तरुणींना या देशांत जिहादी आतंकवाद्यांनी शारीरिक संबंधांसाठी गुलाम म्हणून ठेवल्याचेही यात दाखवण्यात आले आहे. यात मोठ्या संख्येने हिंदु तरुणींचा समावेश असतो. या चित्रपटाचे दिग्दर्शक सुदीप्तो सेन आहेत. त्यांनी काही मास याविषयावर संशोधन केले. यात त्यांना विविध समाजसेवी संघटनांनी साहाय्य केले.

सौजन्य: Sunshine Pictures

चित्रपट सत्य घटनेवर आधारित ! – निर्माते विपुल शहा

या चित्रपटाचे निर्माते विपुल शहा यांनी सांगितले की, ही प्रेक्षकांना अंतर्मुख करण्यास बाध्य करील, अशा संकटाची गोष्ट आहे. ही एक वास्तविक, निष्पक्ष आणि सत्य घटना आहे. एका चौकशीनुसार वर्ष २००९ पासून केरळ राज्य आणि कर्नाटकातील मंगळुरू शहरातून अनुमाने ३२ सहस्र हिंदु आणि ख्रिस्ती तरुणींना मुसलमान बनवण्यात आले. यांतील बहुतांश तरुणींना सीरिया, अफगाणिस्तान, तसेच इस्लामिक स्टेट या जिहादी आतंकवादी संघटनेचे प्राबल्य असलेल्या अन्य देशांत नेऊन तेथे बंदी बनवण्यात आले. त्यांच्या दुःखाची, तसेच या कटाची संपूर्ण माहिती या चित्रपटात देण्यात आली आहे.