बुरख्याच्या विरोधात विद्यापिठाबाहेर निदर्शने करणार्‍या मुलींना तालिबानी अधिकार्‍याकडून मारहाण

काबुल (अफगाणिस्तान) – अफगाणिस्तानच्या पूर्व भागातील बदख्शान विद्यापिठात ३० ऑक्टोबर या दिवशी प्रशासनाने बुरखा घालून न आलेल्या मुलींना वर्गातून बाहेर जाण्यास सांगितले. यानंतर मुलींनी शिक्षणाचा हक्क मिळावा, यासाठी आंदोलन चालू  केले. या मुलींना तालिबानच्या दूरसंचार विभागातील एका वरिष्ठ अधिकार्‍याने मारहाण केली. त्याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला आहे.

१. अफगाणिस्तानमध्ये तालिबान सत्तेवर आल्यानंतर मुलींना महाविद्यालयांमध्ये जाण्यावर बंदी घालण्यात आली होती; मात्र फेब्रुवारी २०२२ मध्ये सरकारने नियमांसह मुलींना महाविद्यालयात प्रवेश देण्यास सहमती दर्शवली.

२. मे मासात तालिबान सरकारने एका आदेशात म्हटले होते की, महिलांना सार्वजनिक ठिकाणी बुरखा घालावा लागेल. जर महिलांनी घराबाहेर स्वतःचा तोंडावळा झाकून ठेवला नाही, तर त्यांचे वडील किंवा जवळच्या पुरुष नातेवाइकाला कारागृहात टाकले जाईल, तसेच सरकारी नोकरीतून काढून टाकले जाऊ शकते.