ख्रिस्ती मिशनर्‍यांनी गरीब हिंदु महिलांना प्रतिमास पैसे देऊन त्यांचे धर्मपरिवर्तन करणे

१. घरकाम करणार्‍या हिंदु महिलांना लक्ष्य करून त्यांनी मंदिरात न जाणे किंवा हिंदूंचे सण साजरे न करणे यासाठी ख्रिस्ती मिशनर्‍यांनी प्रतिमास २ सहस्र रुपये देणे

‘आमच्या पिंपरी-चिंचवड येथील रहाटणी येथे घरी काम करायला येणार्‍या महिलेने ख्रिस्ती मिशनरी सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या घरकाम करणार्‍या महिलांना मोठी रक्कम देऊन ख्रिस्ती धर्म स्वीकारण्यास भाग पाडल्याविषयी माहिती दिली. घरी पूजा न करणे, टिकली किंवा कुंकू न लावणे, हिंदूंचे सण साजरे न करण्यासाठी, तसेच मंदिरात न जाण्यासाठी आमच्या घरी काम करणार्‍या महिलेला प्रतिमास २ सहस्र रुपये देण्यात येत आहेत. असे सुमारे १०० पुरुष आणि स्त्रिया आहेत ज्यांना हिंदु धर्म पूर्णपणे सोडून ख्रिस्ती धर्म स्वीकारल्यानंतर प्रतिमास २ सहस्र रुपये रोख आणि काही रक्कम एकरकमी मिळत आहे. ही रक्कम वेगवेगळी आहे आणि ती ज्याप्रमाणे आवश्यकता असेल त्या प्रमाणात ५० सहस्रांपासून ते ५ लाख रुपयांपर्यंत मिळते.

२. हिंदूंना आर्थिक साहाय्य करून त्यांचा बुद्धीभेद करणे

ख्रिस्ती मिशनरी गरीब हिंदु आणि बौद्ध, त्यातही विशेषतः घरकाम करणार्‍या स्त्रिया अन् त्यांचे पती, जे बहुतेक दारूडे आणि व्यसनी/जुगारी असतात, ज्यांची आर्थिक / सामाजिक परिस्थिती वाईट असते, अशांना लक्ष्य करतात. अशा लोकांना ते प्रारंभी ‘आम्ही तुम्हाला साहाय्य करत आहोत’, असे सांगून त्यांच्या घरात येऊन प्रार्थना करतात. नंतर ‘येशू ख्रिस्त साहाय्य करत आहे’, असे सांगून पैशांचे साहाय्य करतात. काही कालावधीनंतर त्यांना नियमित चर्चमध्ये प्रार्थना करायला आणतात.

२ अ. हिंदूंच्या देवतांपेक्षा येशू श्रेष्ठ असल्याचे पटवून हिंदूंचे धर्मपरिवर्तन करणे : हळूहळू हिंदूंना लागलेले दारू, बाई, जुगार आदींचे व्यसन सुटते आणि मग ते सन्मार्गाला लागतात. एकदा त्या कुटुंबाला पटले की, हिंदूंचे देव काही साहाय्य करत नाही आणि ख्रिस्ती देव पैसे देतो अन् सन्मार्गाला लावतो. ते लगेच ख्रिस्ती धर्मात परिवर्तित होतात. या सगळ्याला २-३ वर्षे लागतात; पण ख्रिस्ती धर्मप्रचारक हे काम पूर्ण निष्ठेने करतात.

३. संभाजीनगर येथील पूर्वी हिंदूबहुल असलेले २ भाग ख्रिस्तीबहुल होणे

मी मूळचा संभाजीनगर येथील आहे. जेव्हा मी लहान होतो, तेव्हा भोईवाडा आणि हमालपूरया हे पूर्ण हिंदू अन् बौद्ध धर्मियांचे होते. आज २५ वर्षांनंतर हे दोन्ही भाग आता १०० टक्के ख्रिस्ती झाले आहेत. परिस्थिती पुष्कळ वाईट आहे आणि दुर्दैव हे आहे की, ना सरकार काही करू शकते, ना आपण काही करू शकतो !

– श्री. प्रथमेश देशमुख, पुणे