….मग तसे धाडस इतर धर्मांविषयीही दाखवा ! – शरद पोंक्षे, ज्येष्ठ अभिनेते आणि हिंदुत्वनिष्ठ नेते

‘आदिपुरुष’ चित्रपटातून करण्यात येत असलेल्या हिंदु देवतांच्या विडंबनाच्या विरोधात…

शरद पोंक्षे

अलीकडे चित्रपट, नाटक किंवा अन्य प्रकारच्या सादरीकरणांमधून हिंदु देवतांचे विडंबन, टिंगलटवाळी करण्याचे प्रकार वाढू लागले आहेत. हे अतिशय चुकीचे आहे; कारण बहुतांश निर्माते-दिग्दर्शक विडंबनासाठी फक्त हिंदु देवतांचाच वापर करतात. इतर धर्मांविषयी त्यांचा हात आखडता दिसून येतो. देवीदेवतांच्या नावाने जेव्हा अंधश्रद्धेचा अतिरेक होतो, तेव्हा त्यावर ओरखडे मारलेच पाहिजेत. सिनेमा आणि नाटक हे त्याच्यावरचे सशक्त माध्यम आहे; पण तसे करतांना कधी कधी पाय घसरतो आणि आपण काहीतरी अधिकच बोलून किंवा दाखवून जातो. त्याचे भान निर्माते आणि दिग्दर्शक यांनी ठेवले पाहिजे. विडंबनेलाही एक मर्यादा असली पाहिजे. त्यातून कुणाच्याही भावना दुखावल्या जाता कामा नयेत.

देवाच्या नावावर चालू असलेल्या चुकीच्या प्रथा खपवल्या गेल्यास त्यावर ताशेरे ओढलेच पाहिजेत; पण तितकेच धाडस इतर धर्मांविषयीही दाखवले पाहिजे. नेमके इतर धर्मांविषयी असे धाडस दाखवतांना निर्माते आणि दिग्दर्शक यांचा हात आखडला जातो, त्यांना भीती वाटायला लागते. ‘मी फारच पुरोगामी आहे’, हे दाखवण्याच्या नादात कधीकधी पुष्कळच वहावत जात चित्रण केले जाते. त्याला माझा विरोध आहे. मग तसेच धाडस इतर धर्मांविषयीही दाखवा.

‘माझ्यासमोर कोंबडे मारा’, असे देवीने कधी सांगितले नव्हते. त्याप्रमाणे ‘मला बकर्‍याचा बळी हवा’, म्हणून अल्लानेही कधी सांगितले नाही. तेही तुम्ही सिनेमा-नाटकांमधून दाखवा. तिथे मात्र यांचे हात थांबतात, तोंडे बंद होतात. पुरोगामित्व सगळीकडे एक समान हवे. चित्रपट परिनिरीक्षण मंडळाने उपरोक्त गोष्टींचा सारासार विचार करून प्रमाणपत्र दिले पाहिजे. मंडळाच्या सदस्यांनी त्यांचे व्यक्तीगत विचार बाजूला ठेवून नियमानुसार परीक्षण करून प्रमाणपत्र दिले पाहिजे. ते देतांना त्यांनी भेदभाव करता कामा नये.

– श्री. शरद पोंक्षे (साभार : दैनिक ‘हिंदुस्थान पोस्ट’, १७.१०.२०२२)