इराणमध्ये हिजाबच्या विरोधात महिलांचे तीव्र आंदोलन !

इराणमध्ये ‘त्यांच्या’ सर्व महिलांचे डोके हिजाबने झाकलेले असणे कायद्यानुसार बंधनकारक आहे. त्याचे कथित उल्लंघन केल्याप्रकरणी २२ वर्षीय महसा अमिनी हिला मोरॅलिटी पोलिसांनी अटक केली होती, जिचा १६ सप्टेंबर २०२२ या दिवशी मृत्यू झाला. त्यानंतर इराणी महिलांच्या मानवाधिकारच्या संरक्षणासाठी सरकारच्या विरोधात तीव्र आंदोलन चालू झाले आहे. या आंदोलनाला जगभरातून मोठा पाठिंबा मिळत आहे. ‘या आंदोलनाला समस्त भारतियांनीही पाठिंबा द्यावा’, असे आवाहन डॉ. गोलसा अमिनोल्लाही (सुरक्षेसाठी नाव पालटले आहे.) यांनी त्यांच्या या लेखातून केले आहे.

इराणमध्ये हिजाबच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या महिला

१. योग्य प्रकारे हिजाब न घातल्यावरून महसा अमिनी हिला इराणच्या पोलिसांनी अटक केल्यानंतर तिचा मृत्यू होणे

‘इराणची महसा अमिनी ही २२ वर्षीय तरुणी तेहरान येथे तिच्या भावंडांसमवेत ४ दिवस सुखाने रहाण्यासाठी गेली होती. तिने योग्य पद्धतीने डोक्यावर स्कार्फ (हिजाब) न गुंडाळल्याच्या कारणावरून इराणच्या मोरॅलिटी पोलिसांनी तिच्या भावाच्या डोळ्यांदेखत तिला अटक केली. तिच्या भावाने हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला; पण बॅटन (लाकडी दांडका) आणि पेपर स्प्रे यांचा वापर करून पोलिसांनी त्याला हाकलून लावले. त्यांनी महसा हिला बलपूर्वक वाहनात कोंबले. महसा आणि इतर काही मुलींना मोरॅलीटी पोलीस ठाण्यात नेण्यात आले. तेथे ‘सबळ कारण नसतांना मला अटक का केली ?’, असा प्रश्न महसा हिने पोलिसांना विचारला. त्यामुळे चिडून पोलिसांनी तिला गंभीररित्या मारहाण केली. हे तिच्या समवेत असलेल्या एकाने सांगितले. पोलीस ठाण्यात आल्यावर काही मिनिटांनी महसा बेशुद्ध पडली. अटक करण्यात आलेल्या इतर मुलींनी तिला साहाय्य करण्याविषयी विचारले; परंतु तेथील अधिकार्‍याने तिला साहाय्य करण्यास मनाई केली. महसा हिला रुग्णालयात नेण्यात आले. तेथे तिचा मेंदू काम करत नसल्याने ती कोमामध्ये गेल्याचे आढळून आले. थोड्या वेळाने तिचा मृत्यू झाला.

पत्रकार निलूफर हमेदी हिने या घटनेचे छायाचित्र काढून बातमी दिल्यामुळे तिलाही पोलिसांनी अटक केली. अशा प्रकरणामध्ये पोलीस मृतकांचा मृतदेह पहाण्याची त्यांच्या नातेवाइकांना अनुमती देत नाहीत. त्या व्यक्तीचा मृतदेह थेट स्मशानात नेऊन पुरला जातो. जेव्हा या घटनेविषयीची बातमी दिली गेली. तेव्हा पोलिसांनी ‘त्या मुलीला आजार असल्याने तिचा मृत्यू झाला, तिला पोलिसांनी काहीही मारहाण केली नाही’, असे सांगितले. यावर महसाच्या कुटुंबियांनी पोलिसांचे स्पष्टीकरण फेटाळले आणि ‘तिला अशा पद्धतीने मृत्यू येण्यासारखा कोणताही आजार नव्हता’, असे सांगितले.

२. इराणमध्ये उघडपणे महिलांच्या मानवाधिकाराचे उल्लंघन होत असून त्यांना नरकयातना भोगाव्या लागणे

अ. आम्हा इराणी महिलांना हे महिलांवरील होणारे अत्याचार थांबून महिलांना मानाचे स्थान मिळून त्या सुरक्षित असाव्यात, असे वाटत आहे. सध्या महसा हिच्या मृत्यूमुळे इराणमधील महिला निषेध करत आंदोलन करण्याच्या पावित्र्यात आहेत. या आंदोलनामागे केवळ एका महसाचा मृत्यू नाही, तर इराणमधील सर्व महिला या अत्याचारांना सामोर्‍या जात आहेत. इराणमधील राजवटीच्या आर्थिक हानीमुळे बहुतेकांची मुले उपाशी पडत आहेत. इराण हे जगातील एक श्रीमंत राष्ट्र आहे; परंतु येथील थोड्या प्रमाणात असलेल्या सरकारी जमातीकडे ही संपत्ती आहे. या संपत्तीचा उपयोग त्यांच्या स्वत:साठी आणि जगभरातील आतंकवादाला प्रोत्साहन देऊन निष्पाप लोकांना ठार मारण्यासाठी होत असतो. तसेच अणूबाँब सिद्ध करण्यासाठीही केला जातो. त्यामुळे गेली ४४ वर्षे आमची ही भूमी महिलांसाठी नरकासमान बनली आहे.

आ. ‘या प्रश्नावर जगभरातील राजकारणी आणि नागरिक यांनी प्रतिक्रिया व्यक्त करावी’, असे आवाहन मी करत आहे. तेथील स्थानिक लोकांच्या संदर्भात इराणमधील राजवटीचा इतिहास रक्तरंजित आहे. जर त्यांना अण्वस्त्रे सिद्ध करण्यात यश आले, तर ते जगातील लोकांचे काय करतील ? हे सांगता येत नाही. राष्ट्रीय स्तरावर विचार केला, तर इराण हे समृद्ध राष्ट्र वाटते; परंतु येथील अनेक इराणी नागरिक अत्यंत गरिबीत दिवस काढत आहेत. प्रतिदिन आम्ही आमच्या मुलांचा आक्रोश सहन करत आहोत. ही मुले साधी करमणूक म्हणून नृत्यगाणे करू शकत नाहीत. त्यासाठी ती एकत्र आली, तर त्यांना मोरॅलिटी पोलिसांकडून अटक करून शिक्षा करण्यात येते. या हुकूमशाहीमध्ये मानवी स्रोत म्हणून प्रत्येकाला नोकरी करण्याची संधी मिळत नाही. त्यामुळे आम्हा बहुतांश लोकांकडे मुलांसाठी व्यय करण्यासाठी पैसे नाहीत. याउलट येथील अल्पसंख्यांक असलेले काहीजण ऐषोआरामात जीवन जगत आहेत. ज्या वेळी आम्ही मानवाधिकारासाठी आंदोलन चालू केले, तेव्हा येथील सरकारने इंटरनेट बंद केले आणि अनेक जणांना बंदी करून त्यांची हत्या केली.

इ. गेल्या ४४ वर्षांत आम्हा महिलांचा अनेक प्रकारे छळ केला जात आहे. महसा अमिनी हिचा मृत्यू हा केवळ इस्लामी स्कार्फच्या किंवा इतर कुठल्या धर्माच्या विचारसरणीविरुद्ध लढा नाही, तर मानवी हक्कांच्या संरक्षणासाठी हा लढा आहे. आम्हा इराणी महिलांवर कारागृहात अत्याचार आणि बलात्कार होत असतात. आमचा आमच्या स्वतःच्या मुलांवरही अधिकार नाही. मोरॅलिटी पोलीस हिजाबसाठी महिलांना मारहाण करतात. महसा अमिनीप्रमाणे अत्याचार झालेली अनेक उदाहरणे इराणमध्ये आहेत. मानवाधिकाराची मागणी करणारी आमची मुले, भावंडे, आई आणि वडील यांनाही येथील कारागृहात डांबून त्यांची हत्या केली जात आहे.

३. इराणमधील महिलांच्या आंदोलनाला जगभरातून पाठिंबा मिळणे

वर्ष १९७९ पासून या अल्पसंख्यांक लोकांनी जेव्हा आमच्यावर अत्याचार करण्यास प्रारंभ केला, तेव्हापासून आम्ही अनेक वेळा आंदोलन केले आहे; परंतु आता काळ थोडा  पालटला आहे. आज जगातील लोक आमच्या बाजूने आहेत. त्यांना आमचे दुःख कळले आहे. आता काही आश्चर्यकारक गोष्टी घडत आहेत. जगातील कित्येक न्यायालये आमच्या बाजूने बोलत आहेत. आमच्या या चळवळीची आंतरराष्ट्रीय पत्रकारांनी नोंद घेतली आहे. इराणमध्ये मानवाधिकारांचे उल्लंघन होत असल्याविषयी जगभरातील अनेक पुरुष आणि महिला यांनी डोक्यावरचे केस कापून निषेध व्यक्त केला. इराणमध्ये मानवाधिकारांचे उल्लंघन होऊ नये; म्हणून त्यांनी आवाज उठवला आहे. मी इराणमधील महिलांच्या चळवळीविषयी डॉ. दीपक चोप्रा यांचे भाषण ऐकले आणि त्यातून माझ्या दुःखाविषयी वेगळाच अर्थ माझ्या लक्षात आला. या चळवळीविषयी दीपक चोप्रा म्हणाले, ‘‘महिलांच्या या नाजूक ताकदीने मानवी उन्नतीविषयीच्या धोरणामध्ये पालट झाला आहे. या ताकदीचा अन्याय, युद्ध आणि क्रौर्य यांचे जग पालटून सौंदर्य, भावना, प्रेम, सहानुभूती, कृतज्ञता वगैरे आणण्यात वाटा आहे.’’ त्यांनी जगभरातील कोणत्याही विशेषतः इराणमधील महिलांवर होणार्‍या अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी जगभरातील लोकांना आवाहन केले आहे.

डॉ. दीपक चोप्रा यांचे भाषण ऐकल्यावर मला वाटले की, गेल्या ४४ वर्षांत आमची झालेली हानी, छळ आणि वेदना यांमुळे आमची कार्मिक शक्ती शुद्ध झाली असून जगाला त्याची जाणीव झालेली आहे. त्यांच्या भाषणामुळे मला माझ्या वेदनेचा नवीन अर्थ समजला. गेली ४४ वर्षे आम्हाला अंधाराकडून प्रकाशाकडे जाण्यासाठी पुष्कळ किंमत मोजावी लागली. यापूर्वी अनेक वेळा आंदोलन झाले; परंतु या वेळच्या आंदोलनाप्रमाणे त्याचा आवाज ऐकला गेला नाही. आता आम्ही राष्ट्रीय जाणीव पार करून जगाच्या जाणिवेकडे पोचलो आहोत. ‘क्रौर्य विरुद्ध मानवता’ या युद्धात महसासारख्या मानवाधिकाराची मागणी करणार्‍या अनेक महिलांचा बळी गेला; परंतु आज आम्हाला जगाचा पाठिंबा मिळत आहे.

४. भारतातील बुद्धीजिवी, पत्रकार, चित्रपट कलावंत अशा समस्त भारतियांनी मानवाधिकारासाठी लढणार्‍या इराणच्या महिलांना पाठिंबा देण्याचे आवाहन !

मी भारतातील माझे भाऊ आणि बहिणी यांना सांगू इच्छिते की, इराणमधील परिस्थिती गंभीर आहे. इराण सरकारकडे पुष्कळ प्रमाणात शस्त्रास्त्रे आहेत. आमचे आंदोलन मोडून काढण्यासाठी त्यांनी बाहेर देशांतून सैनिक मागवले आहेत. त्यामुळे सामूहिक हत्या होण्याची चिन्हे दिसत आहेत. येथील इंटरनेट व्यवस्था कमकुवत करण्यात आली आहे. शहरात सर्वत्र गणवेशातील आणि गणवेशाविना सैनिक फिरत आहेत. त्यांनी अनेक लोकांना कह्यात घेतले असून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत आहेत. भूतकाळातील घटनांप्रमाणे शांतपणे सामूहिक हत्या केल्या जातील. त्यामुळे भारतातील महत्त्वाच्या व्यक्ती, पत्रकार, आय.टी. तंत्रज्ञ, यू ट्यूब चालवणारे, संचालक, चित्रपट निर्माते, लेखक, शिक्षक वगैरेंनी आमच्या लोकांना न्याय मिळावा; म्हणून आवाज उठवावा, अशी मी त्यांना विनंती करत आहे. आमचा कोणत्याही धार्मिक विचारसरणीला विरोध नाही. आम्हाला केवळ आमच्या पूर्वजांच्या भूमीमध्ये जगण्याचे स्वातंत्र्य मिळावे, एवढीच इच्छा आहे. हे आंदोलन फसले, तर या आंदोलनामध्ये आवाज उठवणारे आणि सहभागी होणारे यांच्या थंडपणे हत्या करण्यात येतील. त्यामुळे इराणमधील मानवाधिकारांची मागणी करण्यासाठी आवाज उठवण्यात आम्हाला साहाय्य करावे. मानवता आणि मानवाधिकार यांची मागणी करण्यासाठी सीमा आखल्या जाऊ नयेत. आम्हाला आमचे मानवाधिकार मिळवण्यासाठी आणि आमची उन्नती साधण्यासाठी जे साहाय्य करतील, त्यांचे मी आभार मानते.’

– डॉ. गोलसा अमिनोल्लाही (लेखिका आंदोलनातील एक कार्यकर्त्या आहेत. सुरक्षिततेसाठी त्यांचे नाव पालटले आहे.)

(साभार : साप्ताहिक ‘ऑर्गनायझर’, ५.१०.२०२२)

संपादकीय भूमिका

भारतामध्ये हिजाबच्या मागणीसाठी आंदोलन करणारे कथित मानवतावादी इराणमधील महिलांच्या आंदोलनाविषयी बोलतील का ?