स्वयंसूचना सत्रे ध्वनीमुद्रित करून ऐकल्यावर सूचना अंतर्मनापर्यंत पोचून स्वभावदोष आणि अहं यांच्यावर मात करणे सोपे जाऊ लागणे

श्री. धैवत वाघमारे

१. स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाच्या प्रक्रियेच्या अंतर्गत स्वयंसूचना सत्रे करणे बरीच वर्षे कठीण जात असणे : ‘स्वभावदोष आणि अहं हे साधनेतील अडथळे आहेत. ते दूर करण्यासाठी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सांगितलेली स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवतांना स्वयंसूचना सत्रे करणे आवश्यक असते. बरीच वर्षे ही प्रक्रिया ज्ञात असूनही मला नियमितपणे स्वयंसूचना सत्रे करणे जमत नव्हते. स्वयंसूचना सत्रे करण्यासाठी ती पाठ करणे आणि स्वतःला सूचना देणे किंवा वाचून करणे, असे मार्ग मी अवलंबित होतो; परंतु त्यांचा विशेष लाभ मला होत नव्हता.

२. सूचना ध्वनीमुद्रित करून ऐकल्यावर घडणार्‍या प्रसंगांत स्वभावदोषांची जाणीव होऊन त्यांवर मात करणे सोपे जाऊ लागणे : वीस दिवसांपूर्वी स्वयंसूचना सत्रे करण्यासाठी मी ती भ्रमणभाषवर ध्वनीमुद्रित केली आणि ती नियमितपणे ऐकण्याचा प्रयत्न सुरू केला. पहिल्या आठवड्यातच तीन प्रसंग असे घडले की, ज्यांमध्ये ‘मी भावनाशील होत आहे’, याची मला जाणीव झाली आणि एक मिनिटाच्या आत त्या प्रसंगातून बाहेर येण्यासाठी मी गुरूंना आत्मनिवेदन केले अन् त्या विचारांतून बाहेर पडून वर्तमानकाळात आलो. सूचनासत्रे ऐकल्याने ती मनावर बिंबणे सोपे गेले. त्यामुळे माझ्या मनाला स्वभावदोष आणि अहं यांची जाणीव होऊ लागली. स्वभावदोष आणि अहं यांच्या संदर्भात घडणारे प्रसंग लक्षात येऊन त्यांवर मात करणे सोपे जाऊ लागले. ‘श्री गुरूंनी दिलेल्या या मार्गामुळे आज मला स्वयंसूचना सत्रे करणे सोपे जात आहे’, ही गुरूंची कृपा आहे. त्यासाठी मी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.’

– श्री. धैवत विलास वाघमारे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा (२३.९.२०२२)