‘आदिपुरुष’ चित्रपटाचे दिग्दर्शक ओम राऊत यांना कायदेशीर नोटीस

रामायणाचे इस्लामीकरण केले जात आहे ! – ब्राह्मण महासभा

मुंबई – ‘आदिपुरुष’ चित्रपटातून रामायणाचे इस्लामीकरण केले आहे, असा आरोप ब्राह्मण महासभेने केला आहे. याविषयी आठवडाभराच्या आत क्षमा मागावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक ओम राऊत यांना ब्राह्मण महासभेकडून नोटीसही पाठवण्यात आली आहे. चित्रपटातील वादग्रस्त दृश्ये हटवली नाहीत, तर कायदेशीर कारवाई करण्यासाठी पावले उचलली जातील, अशी चेतावणीही त्यांनी दिला आहे. पुढील वर्षी १२ जानेवारी या दिवशी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

या चित्रपटात हिंदूंच्या देवतांना चुकीच्या पद्धतीने दाखवल्याने धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत. रामायण हा हिंदूंचा इतिहास आहे. जातीय तेढ निर्माण करणारे प्रसंगही या चित्रपटात आहेत, असे त्यांना पाठवलेल्या नोटिसीत म्हटले आहे.

या चित्रपटातील हनुमानाची भूमिका करणार्‍यालाही मुसलमानांप्रमाणे मिशी न दाखवता दाढी दाखवली आहे. रावणालाही त्याचप्रमाणे दाढी दाखवून त्याच्या डोळ्यांत मुसलमानाप्रमाणे सुरमा घातला आहे.

‘आदिपुरुष’ चित्रपटातील रावणाची केशभूषा आणि वेशभूषा मुसलमानाप्रमाणे दाखवल्याने ‘रावणाचे दिसणे (लूक) तालिबानी आहे’, असे मत अभिनेता पुनीत इस्सार यांनी व्यक्त केले होते.