‘आदिपुरुष’ या रामायणावर आधारित चित्रपटाचा १ मिनिट ४६ सेकंदाचा ‘टीझर’ (चित्रपटाचा संक्षिप्त भाग) चित्रपट निर्मात्यांकडून प्रसारित करण्यात आल्यावर संपूर्ण देशात गदारोळ निर्माण झाला आहे. यातून भारतियांच्या रामायण आणि त्यातील चरित्रे यांच्याविषयीच्या भावना किती जागृत आहेत, हे लक्षात येते. रामायण आणि महाभारत हे भारतीय संस्कृतीचे दर्शक आहेत. यांच्या आधारेच भारतीय म्हणजे हिंदु ‘आपले जीवन आदर्श कसे असायला हवे’, याचा विचार करून आयुष्याचे मार्गक्रमण करत असतात. वर्ष १९८६ मध्ये रामानंद सागर यांनी दूरदर्शनवर ‘रामायण’ ही मालिका चालू केली आणि ती जगभरात प्रसिद्ध झाली. या मालिकेचे प्रसारण रविवारी सकाळी होत असे. तेव्हा संपूर्ण देश दूरचित्रवाणी संचासमोर बसून ते पहात. त्यात हिंदूंसमवेत मुसलमान आणि अन्य धर्मीय यांचा समावेश होता, हे नाकारता येणार नाही. याच वेळी देशातील सर्व रस्ते आणि वर्दळीची ठिकाणे निर्मनुष्य होत असत. एवढी लोकप्रियता या मालिकेला मिळाली होती. रामायण आणि महाभारत यांच्यातील प्रसंगांशी संबंधित अनेक चित्रपट देशातील विविध भाषांत त्यापूर्वी प्रदर्शित झाले होते. त्यात आणि या मालिकेत दाखवण्यात आलेल्या चरित्रांची वेशभूषा, वागणे, बोलणे हे जवळपास सारखे होते, म्हणजेच भारतियांवर हाच संस्कार झाला होता अन् ते तितकेच खरे आहेत; कारण रामायणामध्येच त्यातील चरित्रांचे वर्णन करण्यात आलेले आहे आणि त्यानुसारच या चित्रपटांमध्ये दाखवण्यात आले. तसेच आतापर्यंत या चरित्रांची जी काही चित्रे आपण पाहिलेली आहेत, तीही त्यानुसारच रेखाटण्यात आलेली आहेत. मग अशा वेळी कुणीतरी त्यात विपरीत पालट करत असेल, तर ते कसे स्वीकारले जाणार ? हा मूळ प्रश्न आहे; कारण ‘आदिपुरुष’ चित्रपटाच्या ‘टीझर’मध्ये श्री हनुमान आणि रावण यांना मिशी नसलेले, तर प्रभु श्रीरामांना मिशी असलेले दाखवण्यात आले आहे’, असे लोकांनी पाहिले. यामुळेच आदिपुरुष चित्रपटावरून देशात गदारोळ निर्माण झाला आहे आणि ‘तो चुकीचा आहे’, असे म्हणताच येणार नाही; कारण ते चित्रपटाचे दिग्दर्शक ओम राऊत यांच्याही लक्षात आले आहे, असे त्यांच्या ‘आज तक’ वृत्तवाहिनीवर प्रसारित झालेल्या मुलाखतीतून समोर आले आहे.
‘समाजातून ज्या काही प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत, त्याची आम्ही नोंद घेत आहोत. अद्याप चित्रपट प्रदर्शित होण्यास विलंब आहे. जेव्हा चित्रपट प्रदर्शित होईल, तेव्हा तुम्हाला योग्य काय आहे ? ते लक्षात येईल’, असे त्यांनी या वेळी सांगितले आहे; मात्र ‘आता जे काही पालट सांगण्यात येत आहेत, ते तुम्ही करणार का ?’, या प्रश्नावर त्यांनी काहीही बोलण्यास नकार दिलेला आहे. यातून असाच अर्थ काढता येऊ शकतो की, ओम राऊत यांना कळून चुकलेले आहे की, भारतीय जनतेच्या भावना किती तीव्र आहेत आणि आपण कोणती चूक करत आहोत अन् आता चित्रपटात पालट करणे आवश्यक आहे. त्यामुळे जेव्हा हा चित्रपट प्रदर्शित होईल किंवा तो करण्यास दिला जाईल, तेव्हाच राऊत म्हणतात त्याप्रमाणे योग्य काय आहे, हे समजेल. तूर्तास तरी या चित्रपटाला विरोध चालू रहाणार, हे स्पष्ट आहे. जर ओम राऊत यांनी उघडपणे याविषयी स्पष्ट भूमिका मांडली नाही, तर कदाचित् त्यांचा चित्रपट प्रदर्शित होईल कि नाही ? हे ठामपणे आताच सांगता येणार नाही. भाजपचे आमदार राम कदम यांनी ‘महाराष्ट्रात हा चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही’, अशी घोषणा केली आहे, तसेच विश्व हिंदु परिषद आणि हिंदु महासभा यांनीही याला विरोध केलेला आहे. श्रीराम मंदिराचे प्रमुख पुजारी सत्येंद्र दास यांनीही याला विरोध केला आहे. मध्यप्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनीही चित्रपटात पालट न केल्यास कारवाई करण्याची चेतावणी दिली आहे.
भावाचा अभाव !
‘आदिपुरुष’ चित्रपट ५०० कोटी रुपये खर्च करून बनवण्यात येत आहे. या ५०० कोटींमधील अर्धी रक्कम केवळ ‘स्पेशल इफेक्ट’साठीच खर्च करण्यात येणार आहे. सध्या हॉलिवूडमध्ये ज्या पद्धतीने चित्रपट बनवले जातात, त्याच धर्तीवर रामायणावर आधारित हा चित्रपट बनवला जात आहे. ज्यांनी टीझर पाहिला आहे, त्यांना पूर्वीचे म्हणजे रामानंद सागर यांचे रामायण आणि हा चित्रपट यांच्यात आकाश अन् पाताळ असा भेद लक्षात आला असणार. पूर्वीच्या मालिका भावपूर्ण आणि सात्त्विक पद्धतीने चित्रित करण्यात आल्याने दर्शकांवर त्याचा परिणाम अजूनही आहे, तर केवळ १ मिनिट ४६ सेकंदाचा टीझर पाहून हा चित्रपट तमोगुणी आणि भारतीय संस्कृतीच्या अत्यंत उलट बनवण्यात येत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. यामध्ये मानवी भाव-भावना नसून केवळ तंत्रज्ञानाचा वारेमाप केलेला वापर दिसत आहे. रावणाला वटवाघळावर बसून येत असलेले दाखवण्यात आले आहे. प्रत्यक्षात असे आतापर्यंत तरी हिंदूंनी ऐकलेले नाही किंवा कुठे पाहिलेले नाही. रावणाकडे त्याचे पुष्पक विमान होते आणि तो त्याचा वापर करत होता.
रावण राक्षस होता, हे जितके खरे आहे, तितकेच तो ब्राह्मण आणि वेदांचे ज्ञान असणारा होता. प्रभु श्रीरामांनी त्याचा वध केल्यानंतरही त्याचा योग्य मान ठेवला होता. रावणाच्या मृत्यूच्या क्षणी श्रीरामांनी लक्ष्मणाला रावणाकडून मार्गदर्शन घेण्यास पाठवले होते, हे सर्वांनाच ठाऊक आहे. नव्या पिढीचे, नव्या काळातील रामायण बनवण्याच्या विचारातून कुणी त्याला हवा तसा पालट करत असेल, तर ते धर्माभिमानी हिंदु कसे स्वीकारतील ? आणि त्यांनी ते का म्हणून स्वीकारावे ? कोरोनाच्या काळात दूरदर्शनवरून पुन्हा एकदा रामानंद सागर यांची ‘रामायण’ मालिका, तसेच बी.आर्. चोप्रा यांची ‘महाभारत’ मालिका प्रक्षेपित करण्यात आल्यावर त्याला तितकाच प्रतिसाद मिळाला होता, म्हणजे आताच्या पिढीनेही त्याला प्रतिसाद दिला, हे स्पष्ट होते. असे असतांना ‘आताच्या पिढीची आवड वेगळी आहे’, असे गृहित धरून तिच्यासमोर वेगळ्या अंगाने रामायण मांडण्याचा प्रयत्न जर कुणी करत असेल, तर ‘तो अज्ञानीच आहे’, असे म्हणावे लागेल. अशा अज्ञानींना योग्य ज्ञान करवून देण्यासाठी धर्माभिमानी हिंदूंनी घेतलेला पुढाकार योग्य म्हणावा लागेल !
आधुनिकतेच्या नावाखाली हिंदूंच्या देवतांचे अयोग्य चित्रण अस्वीकारार्ह ! |