जागतिक ‘भारतीय’ फुटबॉलपटू !

भारतीय फुटबॉल संघाचे कर्णधार सुनील छेत्री ‘कॅप्टन फँटास्टिक’

‘फिफा’ म्हणजेच ‘इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ असोसिएशन फुटबॉल’ या फुटबॉलच्या जागतिक संघटनेने नुकताच भारतीय फुटबॉल संघाचे कर्णधार सुनील छेत्री यांचा गौरव केला. छेत्री यांना ‘कॅप्टन फँटास्टिक’ संबोधून त्यांच्या नावाने तीन व्हिडिओ प्रसारित करण्यात आले. एकूण दीड घंट्याहून अधिक कालावधीच्या या व्हिडिओजमध्ये छेत्री यांनी केलेल्या ऐतिहासिक कामगिरीवर प्रकाश टाकण्यात आला आहे. यामागे भारतासारख्या अवाढव्य देशात फुटबॉलला प्रोत्साहन मिळावे, असा ‘फिफा’चा उद्देश कदापि नाही, तर छेत्री यांच्या कर्तृत्वाचा गौरव करणे, हा आहे. छेत्री यांनी आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये आतापर्यंत तब्बल ८० गोल केले असून खेळाच्या इतिहासात ही कामगिरी करणारे ते केवळ पाचवे खेळाडू ठरले आहेत. तसेच सध्या खेळत असलेले म्हणजे ‘ॲक्टिव्ह फुटबॉलर्स’पैकी ते जागतिक क्रमवारीत तिसर्‍या क्रमांकावर आहेत. अव्वल स्थानावर पोर्तुगालचे क्रिस्तियानो रोनाल्डो असून त्यांच्या नावावर ११७ गोल आहेत, तर त्यांच्यानंतर अर्जेंटिनाचे लायोनेल मेस्सी असून त्यांनी आतापर्यंत आंतरराष्ट्रीय स्तरावर ९० गोल केले आहेत. त्यांच्या पाठोपाठ सुनील छेत्री असून भारताला अभिमान वाटावा, अशी ही गोष्ट आहे. असे असले, तरी छेत्री यांची कामगिरी तर दूर, पण ‘त्यांचे नावतरी किती भारतियांना ठाऊक आहे ?’, हा संशोधनाचा विषय आहे आणि हेच भारतासाठी लज्जास्पद आहे ! फुटबॉलमध्ये फारसा रस नसणार्‍या भारतियांना रोनाल्डो अथवा मेस्सी यांची ख्याती ऐकून माहिती आहे; परंतु आपल्याच देशाचा कर्णधार ठाऊक नाही, हे दुर्दैवी आहे !

‘सुनील छेत्री’ ‘ॲक्टिव्ह फुटबॉलर्स’पैकी जागतिक क्रमवारीत तिसर्‍या क्रमांकावर !(उजवीकडील)

महान फुटबॉलपटू !

भारतात अनेक वेळा फुटबॉल आणि क्रिकेट या खेळांविषयीच्या लोकप्रियतेतील भेद अन् हे खेळ खेळण्यासाठी सरकारी स्तरावरून दिले जात असलेले प्रोत्साहन हे वादाचे विषय राहिले आहेत. फिफाने छेत्री यांचा गुणगौरव केल्याने ही सूत्रे पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहेत. क्रिकेटचा विचार करता ‘जागतिक क्रिकेट परिषद’ म्हणजेच ‘इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिल’च्या अंतर्गत हा खेळ खेळणार्‍या देशांची संख्या १०६ असली, तरी ‘फुल मेंबर्स’ म्हणजे संपूर्ण सदस्यत्व असणार्‍या देशांची संख्या ही केवळ १२ आहे. अन्य सर्व देश हे ‘असोसिएट मेंबर्स’ म्हणजे सहयोगी सदस्य आहेत. दुसरीकडे फुटबॉलमध्ये संपूर्ण सदस्यत्वाची संख्या २११ आहे म्हणजेच जगातील जवळपास सर्वच देश फुटबॉल खेळतात आणि त्यांना जागतिक मान्यता आहे. यातून या दोन्ही खेळांमधील भेद लक्षात येतो. या पार्श्वभूमीवर क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणार्‍या फलंदाजांमध्ये सचिन तेंडुलकर, विराट कोहली, राहुल द्रविड यांसारख्या भारतीय क्रिकेटपटूंच्या कर्तृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे धाडसीपणाचे ठरू शकेल; परंतु सुनील छेत्री यांनी केलेली नेत्रदीपक कामगिरी हा खेळाच्या क्षेत्रातील वास्तविक पुरुषार्थ आहे, हे निश्चित ! यावरून एखादा उपटसुंभ म्हणेल की, छेत्री यांनी कोणत्या संघांच्या विरोधात गोल केले आहेत, हे पहाणे आवश्यक आहे. छेत्री यांच्या कामाचे अशा प्रकारे मूल्यमापन करणे सयुक्तिक नाही. याचे कारण असे की, सर्वाधिक गोल करणारे रोनाल्डो यांचा पोर्तुगाल संघ जागतिक क्रमवारीत ९ व्या क्रमांकावर, तर मेस्सी यांचा अर्जेंटिना हा तिसर्‍या क्रमांकावर आहे. छेत्री यांचा भारतीय संघ मात्र जागतिक क्रमवारीत १०४ थ्या क्रमांकावर आहे. प्रतिस्पर्धी देशांच्या विरोधात सातत्यपूर्ण पद्धतीने गोल करणे, ही स्वत:तच मोठी कामगिरी असते. दुसरीकडे ‘फिफा’ने छेत्री यांचा केलेला गौरव यातच सर्वकाही आले आहे. आज सचिन तेंडुलकर, सुनील गावस्कर, अनिल कुंबळे, कपिल देव यांच्यासारख्यांना भारतात ‘क्रिकेटिंग लेजेंड’ संबोधले जाते; परंतु ‘सुनील छेत्री हेसुद्धा ‘लेजेंड’ (महान) आहेत’, हे जोरकसपणे सांगणे आवश्यक आहे. दुसर्‍या दृष्टीकोनातून पाहिल्यास कुणाची अन्य कुणाशीही तुलना करणे अतार्किक असते; कारण प्रत्येकाची परिस्थिती, कामाचे स्वरूप, त्याच्यासमोरील आव्हाने, त्याला मिळत असलेले प्रोत्साहन आदी वेगवेगळे असते. त्यामुळेच सुनील छेत्री हे वास्तविक ‘लेजेंड’ आहेत.

क्रीडा संस्कृती रुजावी !

आतापर्यंतच्या विवरणातून क्रिकेटचे उदात्तीकरण अनावश्यक आणि अर्थहीन आहे, हे लक्षात आले असेल. देशात क्रिकेटचा व्यवसाय हा सहस्रावधी कोटी रुपयांचा आहे. जागतिक क्रिकेट परिषद म्हणजेच ‘आयसीसी’च्या सदस्य देशांमध्ये सर्वाधिक पैसा हा ‘बीसीसीआय’ या भारतीय नियामक क्रिकेट मंडळाकडे असल्याने त्याला आधीच पुष्कळ महत्त्व आहे. त्यातच ‘आय.पी.एल्.’ ही ‘कॅश रिच लीग’ म्हणून (कु)प्रसिद्ध आहे. दुसरीकडे फुटबॉलसारख्या खेळाला पूर्णपणे दुर्लक्षिले गेले आहे. वर्ष २०२२-२३ साठी या खेळाला सरकारी स्तरावरून करण्यात आलेल्या अर्थसाहाय्यामध्ये तब्बल ८५ टक्क्यांनी घट करण्यात आली. यंदा या खेळाला केवळ ५ कोटी रुपयांचे साहाय्य घोषित करण्यात आले. यामागे फुटबॉलमध्ये भारताची सुमार कामगिरी असल्याचे सरकारकडून सांगण्यात आले. आज ‘आत्मनिर्भर भारत’ या मोहिमेखाली भारताला प्रत्येक क्षेत्रामध्ये कणखर बनवण्यासाठी प्रयत्न होत आहेत. या जोडीला जागतिक राजकारणात भारत हा कूटनैतिक स्तरावर अधिक बलवान बनत असल्याचा संदेश गेल्या काही कालावधीपासून भारताचे परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर यांच्या वक्तव्यांतून दिला गेला आहे. आंतरराष्ट्रीय कूटनीती आणि खेळ यांचा जवळचा संबंध असतांना भारताने फुटबॉलकडे दुर्लक्ष करणे त्यामुळे साजेसे नाही. आज अमेरिका, चीन, रशिया, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया यांसारख्या प्रगत राष्ट्रांच्या पंगतीत बसण्यासाठी प्रयत्न करणार्‍या भारताने खेळाच्या आणि ओघाने फुटबॉलसारख्या खेळांना प्रोत्साहन देणे आवश्यक आहे अन् त्यासाठीच जागतिक भारतीय फुटबॉलपटू सुनील छेत्री यांना अतीविशेष महत्त्व आहे. त्यांचे अलौकिक कर्तृत्व भारतियांमध्ये रुजवणे आवश्यक आहे. त्यातूनच भारतीय फुटबॉलला सशक्त करता येणार आहे. भारतात सर्वाथाने क्रीडा संस्कृती रुजवण्यासाठी हे आवश्यक आहे !

भारताला क्रीडा क्षेत्रात अव्वल बनवण्यासाठी शासनकर्त्यांनी देशात ‘क्रीडा संस्कृती’ रुजवणे आवश्यक !