श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि पू. दीपाली मतकर यांच्यामध्ये भ्रमणभाषवर झालेला आनंददायी भावसंवाद !

‘भाद्रपद कृष्ण प्रतिपदेच्या दिवशी (२१.९.२०२१ या दिवशी) सकाळी उठल्यापासूनच मला सोलापूर सेवाकेंद्रात श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचे अस्तित्व पुष्कळ जाणवत होते. सेवाकेंद्रात एका साधकाने देवीचे भजन लावले होते. तेव्हा ‘श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांची दैवी पावले सेवाकेंद्रात सर्वत्र पडत आहेत’, असे मला जाणवत होते. त्याच दिवशी दुपारी मला त्यांचा भ्रमणभाष आला. तेव्हा आमच्यात झालेला आनंददायी संवाद पुढे दिला आहे.

(भाग १)

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ

१. पू. दीपाली मतकर यांनी ‘तुमचे अस्तित्व सोलापूर सेवाकेंद्रात आणि स्वतःमध्येही सतत जाणवते’, असे श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांना सांगणे

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ : कशी आहेस ?

पू. दीपाली मतकर : छान आहे. आनंदी आहे. तुम्ही कशा आहात ? तुमची पुष्कळ आठवण येते.

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ : हो. ‘पुष्कळ आठवण येते’, असे म्हणतेस; पण मला भेटायला आली नाहीस.

पू. दीपाली मतकर : श्रीसत्‌शक्ति बिंदाताई, मी तुमच्या चरणकमलांजवळच बसलेली असते. तुम्ही माझ्या समवेत सतत सोलापूर सेवाकेंद्रातच असता. त्यामुळे मी तिकडे आले नाही. मी चालत असतांना मला तुमचीच दैवी पावले दिसतात. मी बोलतांना मला ‘तुम्हीच बोलत आहात’, असे वाटते. मला इथे तुमचेच अस्तित्व सतत जाणवते.

पू. दीपाली रामचंद्र मतकर

२. पू. दीपाली यांनी ‘सोलापूर येथे सेवा चालू असल्याने रामनाथीला जावे’, असे वाटत नाही’, असे सांगणे आणि ते ऐकून श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना आनंद होणे

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ : बघ, कशी विषय बदलतेस ? विषय बदलू नकोस. ‘तू इकडे कधी येणार ?’, ते सांगत नाहीस.

पू. दीपाली मतकर : खरंच, तुम्ही इथेच असता ना ! मी तुमच्या समवेतच असते. आता इथे सेवाही चालू झाल्या आहेत. त्यामुळे मला ‘तिकडे यावे’, असे वाटत नाही. सद्गुरु स्वातीताईही (सद्गुरु स्वाती खाडयेही) जिल्ह्यात येणार आहेत.

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ : फारच छान ! हे सर्व ऐकून मला आनंद झाला. तुझ्या घरातील सर्व जण कसे आहेत ?

पू. दीपाली मतकर : बाबा (श्री. रामचंद्र मतकर) देवद आश्रमात आहेत आणि लहान भाऊ (श्री. नीलेश मतकर) घरी डोंबिवलीला आहे.

३. ‘माझा विवाह श्रीकृष्णाशी झाला असून त्याचा समष्टी संसार सोडून मला आणखी काहीच नको’, असे म्हणणार्‍या पू. दीपाली मतकर !

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ : तुझ्या घरचे तुला विवाहाविषयी विचारत नाहीत का ?

पू. दीपाली मतकर : मी १२ वर्षे घरी गेलेच नाही. मी घरी जात नसल्यामुळे मला कुणी विचारत नाही.

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ : मग तुझे लग्न कधी ठरवायचे ?

पू. दीपाली मतकर : माझा विवाह श्रीकृष्णाशी कधीच झाला आहे. त्याचा समष्टी संसार सोडून मी दुसरा विचार कसा करणार ? श्रीकृष्णाला सोडून मी दुसर्‍या कुणाचा विचार कधीच करू शकत नाही आणि करणारही नाही. गुरुदेवांनी आणि तुम्ही माझा विवाह श्रीकृष्णाशी करूनच मला समष्टीत पाठवले आहे. त्यामुळे ‘त्याचा संसार कसा करता येईल ?’, हे मी पहाते. श्रीकृष्णाने मला जिल्हा आणि सेवाकेंद्र येथे कितीतरी लहान-मोठी बाळे दिली आहेत. स्त्रीला ‘आई’ होण्यासाठी किती कष्ट घ्यावे लागतात ! किती त्रास सहन करावा लागतो ! मला किती सहजतेने बाळे मिळाली आहेत ! हे सनातनचे किती मोठे कुटुंब आहे ! त्यामुळे या संसाराविना मला दुसरे काही नको.

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ : अग हो, मीच तुझा श्रीकृष्णाशी विवाह करून दिला आहे आणि एकदा विवाह झाल्यावर दुसरा विवाह नसतोच !

४. पू. दीपाली यांनी स्वतःची भावस्थिती सांगितल्यावर श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी ‘मला गावेसे वाटत आहे’, असे आनंदाने सांगणे

पू. दीपाली मतकर : श्रीसत्‌शक्ति बिंदाताई, गुरुदेव किती भरभरून देतात ! तुम्ही आणि गुरुदेव सतत माझ्या समवेतच असता. मला तुमचे अस्तित्व सतत जाणवते. सत्संग घेतांना आणि सेवा करतांना माझ्याकडून आपोआप प्रार्थना होते, ‘माझे अस्तित्व नको. माझ्या जागी तुम्हीच रहा. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदाताई, माझ्या मुखातून तुम्हीच बोला. तुम्हीच हसा. तुम्हीच माझ्या डोळ्यांतून सर्व बघा आणि तुमच्या हातांनी सर्वत्र तुम्हीच स्पर्श करा.’ या प्रार्थनेमुळे मला माझे अस्तित्वच जाणवत नाही. ‘सर्वकाही तुम्हीच करता आणि तुम्हीच माझ्यातून बोलता’, असे मला जाणवते. मला तुमचाच आवाज ऐकू येतो. मी रात्री झोपतांना अन्नपूर्णामातेच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करते, ‘माते, तुझ्यामुळे सेवाकेंद्रातील सर्व साधक तृप्त झाले. त्यांची साधना होऊ दे.’ तेव्हा मला तिच्या जागी  ‘तुम्हीच कृपाळू दृष्टीने माझ्याकडे पहात आहात’, असे दिसते.

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ : किती छान ! दीपाली, तू याच स्थितीत रहा. या स्थितीतून तू कधीच बाहेर येऊ नकोस. लवकर प्रगती कर. तुला कुणाची दृष्ट लागायला नको. आज मी तुझी दृष्ट काढते. तू याच आनंदी आणि आध्यात्मिक भावविश्वात रहा. तुझी ही भावस्थिती बघून मला फार आनंद झाला आहे. तू आनंदतरंगांवरच तरंगत आहेस. मी गायक असते, तर आता गायलाच लागले असते. आनंदाचे डोही आनंद तरंग…

(श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ पुष्कळ खळखळून हसल्या).

पू. दीपाली मतकर : गायक काय ? श्रीसत्‌शक्ति बिंदाताई, तुम्ही तर साक्षात् सरस्वतीच आहात.’

(क्रमशः)

– (पू.) कु. दीपाली मतकर, सोलापूर (३०.११.२०२१)