हिंदु धर्मात सांगितलेल्या ‘सहस्रचंद्रदर्शन शांतीविधी’चे आध्यात्मिक महत्त्व स्पष्ट करणारे संशोधन !‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी |
‘उतारवयात इंद्रिये अकार्यक्षम होऊ लागतात. कानाने अल्प ऐकू येणे, डोळ्यांनी अल्प दिसणे, विविध रोग निर्माण होणे, असे त्रास चालू होतात. देवतांच्या कृपेने या व्याधींचा परिहार व्हावा आणि उर्वरित आयुष्य सुखात जावे, यांसाठी ५० व्या वर्षापासून १०० वर्षांपर्यंत प्रत्येक ५ वर्षांनी व्यक्तीसाठी शांतीविधी करावा’, असे शास्त्र आहे. सहस्रचंद्रदर्शन शांतीविधी वयाच्या ८० व्या वर्षी करतात.
सनातनचे संत पू. सदाशिव परांजपेआजोबा यांचा २०.१.२०२२ या दिवशी सहस्रचंद्रदर्शन शांतीविधी झाला. हा विधी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात सनातन-पुरोहित पाठशाळेतील पुरोहितांनी केला. ‘सहस्रचंद्रदर्शन शांतीविधी केल्याने व्यक्तीला आध्यात्मिकदृष्ट्या काय लाभ होतो ?’, हे अभ्यासण्यासाठी ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ उपकरणाद्वारे संशोधन केले. ते पुढे दिले आहे.
१. सहस्रचंद्रदर्शन शांतीविधी केल्याने पू. सदाशिव परांजपेआजोबा यांना आध्यात्मिक स्तरावरील लाभ होणे
विधीपूर्वी पू. परांजपेआजोबा यांच्यामध्ये ‘इन्फ्रारेड’ अन् ‘अल्ट्राव्हायोलेट’ या नकारात्मक ऊर्जा होत्या, तसेच सकारात्मक ऊर्जाही होती. विधीनंतर त्यांच्यातील नकारात्मक ऊर्जा न्यून होऊन त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जा पुष्कळ वाढली. विधीनंतर विधीतील अन्य घटकांतील सकारात्मक ऊर्जेत पुष्कळ वाढ झाली. हे पुढे दिलेल्या सारणीतून लक्षात येते.
टीप १ – पहिल्या चाचणीस्थळी जागा अपुरी पडल्याने त्यापुढे अचूक प्रभावळ मोजता आली नाही.
टीप २ – दुसर्या चाचणीस्थळी जागा अपुरी पडल्याने त्यापुढे अचूक प्रभावळ मोजता आली नाही.
२. चाचणीतील निरीक्षणांचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण
२ अ. पू. परांजपेआजोबा यांनी सहस्रचंद्रदर्शन विधीतील चैतन्य ग्रहण केल्याने त्यांना आध्यात्मिक स्तरावरील लाभ होणे : पू. परांजपेआजोबा यांनी शांतीविधीतील चैतन्य ग्रहण केल्याने त्यांच्या भोवतीचे त्रासदायक स्पंदनांचे आवरण पुष्कळ न्यून होऊन त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जेत पुष्कळ वाढ झाली.
आ. पू. परांजपेआजोबा यांच्या गळ्यातील फुलांच्या हारावर विधीतील चैतन्याचा सकारात्मक परिणाम झाला. त्यामुळे हारातील सकारात्मक ऊर्जेत पुष्कळ वाढ झाली.
इ. सहस्रचंद्रदर्शन विधीनंतर पू. परांजपेआजोबा यांच्या गळ्यातील हारामध्ये पुष्कळ सकारात्मक ऊर्जा आढळून येण्यामागील आध्यात्मिक कार्यकारणभाव : ‘सहस्रचंद्रदर्शन विधी केल्यामुळे चंद्रदेवतेमधील तारक शक्ती आणि सगुण-निर्गुण स्तरावरील चैतन्य यांचा लाभ हा विधी ज्यांच्यासाठी करतो त्यांना होतो. अशाच प्रकारे सहस्रचंद्रदर्शन विधी केल्यामुळे पू. परांजपे आजोबांनाही लाभ झाला. त्यामुळे त्यांच्या सूक्ष्म देहांवरील विरळ आणि पारदर्शक असणारे सूक्ष्मतर स्तरावरील त्रासदायक काळ्या शक्तीचे आवरण निघून गेले अन् त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जेचे प्रभामंडल पुष्कळ प्रमाणात वाढले. त्यामुळे पू. परांजपेआजोबा यांच्या गळ्यातील हारामध्ये पुष्कळ सकारात्मक ऊर्जा आढळून आली.’ – कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान) (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२.८.२०२२)
ई. चंद्रदेव ही सहस्रचंद्रदर्शन शांतीविधीतील प्रमुख देवता आहे. विधीच्या वेळी चंद्रदेवतेच्या कलशामध्ये चंद्रदेवतेचे चैतन्य आकृष्ट झाले. याचा परिणाम म्हणून विधीनंतर कलशातील सकारात्मक ऊर्जेत पुष्कळ वाढ झाल्याचे दिसून आले.
उ. तुपामध्ये तेजतत्त्वाच्या स्तरावरील चैतन्य कार्यरत असते. पू. परांजपेआजोबा आणि पू. (सौ.) परांजपेआजी यांनी शांतीविधीच्या वेळी तुपामध्ये स्वतःचे चेहरे पाहिले. तेव्हा त्यांच्या भोवतीची त्रासदायक स्पंदने अन् आवरण तुपामध्ये पडलेल्या प्रतिबिंबाच्या माध्यमातून तुपामध्ये खेचले गेले. त्याचप्रमाणे तुपातील चैतन्याचा सकारात्मक परिणाम पू. परांजपेआजोबा आणि सौ. परांजपेआजी यांच्या प्रतिबिंबावर झाला.
ऊ. पू. परांजपेआजोबा हे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या दोन आध्यात्मिक उत्तराधिकार्यांपैकी एक असलेल्या श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचे वडील आणि सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांचे ते सासरे आहेत. या सद्गुरु दांपत्याने पू. परांजपेआजोबांचे पाद्यपूजन केले. हा अत्यंत दुर्मिळ योग आहे. पू. परांजपेआजोबा यांच्या पाद्यपूजनातील तीर्थामध्ये पुष्कळ सकारात्मक ऊर्जा आढळून आली.
ए. संतांनी संतांचे पाद्यपूजन करतांना सूक्ष्मातून घडलेली प्रक्रिया : ‘जेव्हा एक संत दुसर्या संतांचे पाद्यपूजन करत असतात, तेव्हा संतांचे पाद्यपूजन करणार्या संतांमध्ये शिष्यभाव आणि ज्या संतांचे पाद्यपूजन होते त्यांच्यामध्ये गुरुभाव जागृत होतो. त्यामुळे दोन्ही संतांमधील चैतन्याचे एकत्रिकरण होऊन ते समष्टीच्या कल्याणासाठी कार्यरत होते. त्यामुळे दोन्ही संतांमधील सकारात्मक ऊर्जेचे प्रभामंडल पुष्कळ प्रमाणात वाढते आणि त्यांच्याकडून समष्टीच्या कल्याणासाठी पुष्कळ प्रमाणात चैतन्याचे प्रक्षेपण होते. अशाप्रकारे संतांनी संतांचे पाद्यपूजन केल्यामुळे व्यष्टी आणि समष्टी अशा दोन्ही स्तरांवर आध्यात्मिक लाभ होतो.’ – कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२.८.२०२२)
ऐ. सहस्रचंद्रदर्शन शांतीविधीच्या वेळी केलेल्या यागातून निघणार्या धुरात पुष्कळ सकारात्मक ऊर्जा आढळून आली.
सहस्रचंद्रदर्शन विधी केल्याने व्यक्तीला तिचे उर्वरित आयुष्य चांगल्या प्रकारे जगण्यासाठी आध्यात्मिक बळ प्राप्त होते. तसेच मृत्यूनंतरही तिच्या लिंगदेहाचे वाईट शक्तींपासून रक्षण होऊन तिचा मृत्यूत्तर प्रवास सुलभ होतो. यातून ‘हिंदु धर्मात सांगितलेल्या शांतीविधीमागे शास्त्र आहे’, हे लक्षात येते.’
– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (२.८.२०२२)
ई-मेल : [email protected]
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत. या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |