चिनी नागरिकांच्या टोळ्यांचा सहभाग असलेल्या बेंगळुरूस्थित ‘लोन अ‍ॅप’ टोळीला अटक !

पुणे – ‘लोन अ‍ॅप’च्या माध्यमातून नागरिकांना धमकावून खंडणी उकळणार्‍या सायबर गुन्हेगारांच्या टोळ्या देशभर धुमाकूळ घालत आहेत. पुणे पोलिसांनी बेंगळुरू येथील ‘लोन ॲप’च्या ‘कॉल सेंटर’वर धाड टाकून ११ जणांना कह्यात घेतले. बेंगळुरूतील टोळीला अधिकोष खात्यांचा तपशील पुरवणे, तसेच मजुरांच्या नावाने ‘इंटरनेट बँकिंग’ सुविधा असलेले अधिकोष खाते उघडून देणार्‍या ७ जणांना पुण्यातील खराडी, सोलापूर, बेंगळुरू येथून अटक केली. या प्रकरणांतील मुख्य सूत्रधार दुबईस्थित चिनी नागरिकांच्या टोळ्यांचा सहभाग असल्याची महत्त्वपूर्ण माहिती पोलिसांना अन्वेषणात मिळाली आहे. ‘लोन अ‍ॅप’च्या तक्रारींचे निवारण करण्याकरिता स्वतंत्र पथक स्थापन करण्यात आले आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. या ‘लोन अ‍ॅप’च्या माध्यमातून फसगत झाल्याच्या ४ सहस्र ७७४ तक्रारी पोलिसांकडे नोंदवण्यात आल्या आहेत.

१. ‘लोन अ‍ॅप’च्या माध्यमातून त्वरित कर्ज मंजूर करून दिले जाते. कर्जदाराने कर्जाची रक्कम दिल्यानंतरही नागरिकांना धमकावून त्यांच्याकडून अधिक रक्कम वसूल केली जाते. अशा घटनांच्या तक्रारी अधिक प्रमाणात सायबर पोलीस ठाण्यात येत आहेत.

२. त्यानुसार पुणे पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे. या कारवाईमध्ये ४८ भ्रमणभाष, ५६ अधिकोेषांच्या खात्यांची कागदपत्रे, सीमकार्ड, १६७ क्रेडिट आणि डेबिट कार्ड, १५ पॅनकार्ड, ११ मतदार ओळखपत्र इत्यादी साहित्य शासनाधिन करण्यात आले.

३. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडे १ लाख नागरिकांची वैयक्तिक माहिती असलेला ‘डाटा’ प्राप्त झाला आहे, तसेच त्यांच्या अधिकोषातील खात्यातील ७० लाख रुपयांची रक्कम गोठवण्यात आली आहे.