‘आधी केले मग सांगितले’, या उक्तीचे आचरण करणारे लालबहादूर शास्त्री !

‘जय जवान जय किसान’ याचा नारा देणारे लालबहादूर शास्त्री यांची आज २ ऑक्टोबर २०२२ या दिवशी जयंती आहे. त्यानिमित्ताने त्यांना विनम्र अभिवादन !

भारतियांना एकभुक्त रहाण्याचे आवाहन करण्यापूर्वी ‘स्वतःचे कुटुंबीय तसे राहू शकतात का ?’, याविषयी शास्त्रीजींनी पडताळणी करणे

‘खरेतर लालबहादूर शास्त्री यांचे वर्तन कायमच आदर्श असे होते. वर्ष १९६५ च्या भारत-पाक लढाईच्या वेळी अमेरिकेचे अध्यक्ष लिंडन जॉनसन यांनी शास्त्रीजींना ‘जर तुम्ही पाकिस्तान विरुद्ध लढाई थांबवली नाहीत, तर तुम्हाला पुरवण्यात येणारा लाल गहू आम्ही पाठवणार नाही’, अशी धमकी दिली होती. त्या वेळी भारत गहू उत्पादनामध्ये आत्मनिर्भर नव्हता. शास्त्रीजी अत्यंत स्वाभिमानी असल्याने ही गोष्ट त्यांच्या मनाला फार लागली. त्यांनी भारतियांना केवळ एक आठवडा एकभुक्त रहाण्याचे आवाहन केले, जेणेकरून अमेरिकेहून येणार्‍या गव्हाची कमी भरून निघू शकेल; मात्र हे करण्यापूर्वी त्यांनी ‘स्वत:च्या कुटुंबियांना हे खरच शक्य आहे का ? माझी मुले एक वेळ उपाशी राहू शकतात का ?’, याची पडताळणी केली आणि नंतरच जनतेला वरील आवाहन केले. यावरून ‘आधी केले मग सांगितले’, या उक्तीप्रमाणे शास्त्रीजींचे आचरण होते, याची प्रचीती येते.

भारताला महासत्ता बनवण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी शास्त्रीजींचे तत्त्वनिष्ठ विचार अन् आचार यांची आवश्यकता !

शास्त्रीजींच्या अथक प्रयत्नांमुळे युद्धकाळात भारतीय जनता, शेतकरी वर्ग आणि सैनिक यांचे मनोबल टिकून राहिले. त्यामुळे पाकिस्तानला हरवून ते युद्ध जिंकणे भारताला सहज शक्य झाले. लालबहादूर शास्त्री हे आदर्श व्यक्तीमत्त्व होते. पंतप्रधानपदी विराजमान असतांना शास्त्रीजींनी ‘साधी रहाणी उच्च विचार’, याप्रमाणे सर्वांसाठी एक आदर्शच घालून दिला. सद्यःस्थितीला भ्रष्टाचार, अराजकता, अनैतिकता आणि स्वार्थ यांमध्ये गुरफटलेल्या समाजाला राष्ट्रनिष्ठा, देशप्रेम, नैतिकता शिकण्यासाठी असेच आदर्श, तत्त्वनिष्ठ विचार अन् आचार यांची आवश्यकता आहे, तरच येणार्‍या काळात भारताला महासत्ता बनवण्याचे स्वप्न साकार होऊ शकेल !’

– श्रीमती धनश्री देशपांडे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा (२८.९.२०२२)