सनातनचे संस्कृतवर आधारलेले नाविन्यपूर्ण मराठी व्याकरण !
‘मराठी, हिंदी, गुजराती आदी संस्कृतोद्भव भाषांच्या व्याकरणाचा पाया भाषाजननी संस्कृतचे व्याकरण हाच आहे. परिणामी या भाषांचे व्याकरण शिकण्यासाठी संस्कृतचे व्याकरण ठाऊक असणे अनिवार्य आहे. आधुनिक काळात इंग्रजीच्या आक्रमणामुळे नव्या पिढीला संस्कृतवर आधारित स्वभाषेचे व्याकरण शिकणे अवघड झाले आहे. या पार्श्वभूमीवर या लेखमालेमध्ये मराठीची स्वायत्तता आणि तिचे संस्कृतशी असलेले आध्यात्मिक नाते जपत व्याकरणाचे नियम मांडण्यात आले आहेत. सनातनचे निरनिराळी शैक्षणिक पार्श्वभूमी असलेले साधक, वार्ताहर, संकलक आदींना दृष्टीसमोर ठेवून ही मांडणी करण्यात आली आहे.
मागील लेखात आपण ‘इंग्रजी शब्द देवनागरी लिपीत (मराठीत) कसे लिहावेत ?’, यासंबंधीची काही सूत्रे पाहिली. आता त्यापुढील सूत्रे पाहू.
(लेखांक १४ – भाग २)
१. ‘फीड्स (प्राण्यांचे अन्न)’ यासारख्या शब्दांतील शेवटचे अक्षर पूर्ण आणि शेवटून दुसरे अक्षर पाय मोडलेले लिहिणे
‘फीड्स (प्राण्यांचे अन्न)’ या शब्दाचा उच्चार केल्यास त्यातील ‘ड्’ हे अक्षर अपूर्ण उच्चारले जाते. ‘स’ हे शेवटचे अक्षर अपूर्ण उच्चारल्यासारखे वाटते; पण ‘स’चा उच्चार केल्यावर उच्छ्वास लांबतो, असे लक्षात येते. त्यामुळे ते पूर्ण उच्चारित अक्षर मानले जाते. या सूत्रांनुसार ‘फीड्स’ हा शब्द लिहितांना ‘ड’ हे अक्षर ‘ड्’ असे हलंत (पाय मोडून) लिहावे आणि ‘स’ पूर्ण लिहावा. याची आणखी काही उदाहरणे पुढे दिली आहेत. या उदाहरणांपुढे कंसात त्यांचे मराठीत अर्थही दिले आहेत.
स्पोर्ट्स (खेळ), असोसिएट्स (सहकारी), ॲड्व्होकेट्स (अधिवक्ते), साउंड्स (ध्वनी), पाटर््स (भाग) इत्यादी.
या नियमानुसार पुढील शब्दांसारख्या शब्दांचीही शेवटची अक्षरे पूर्ण आणि शेवटून दुसरी अक्षरे हलंत लिहावीत.
मूव्हर्स (हलवणारे), ॲक्सेसरीज (वस्तू), इलेक्ट्रिकल्स (विद्युत् उपकरणांशी संबंधित व्यवसाय), एंटरप्रायझेस (खासगी उद्योग किंवा संस्था), ऑटोमोबाईल्स (दुचाकी आणि चारचाकी वाहनांशी संबंधित व्यवसाय) इत्यादी.
२. ‘ज्युनियर (कनिष्ठ श्रेणीचा)’ हा इंग्रजी शब्द देवनागरी लिपीत लिहितांना त्याच्या उच्चारानुसार तो लिहिण्यात झालेला पालट
‘ज्युनियर’ हा इंग्रजी शब्द रोमन लिपीत ‘Junior’ असा लिहिला जातो. सर्वसाधारण नियमानुसार त्यातील ‘Ju’ ही अक्षरे एकत्र येऊन ‘जु’ हे मराठी अक्षर सिद्ध व्हायला हवे, तसेच ‘or’ ही अक्षरे एकत्र येऊन ‘ऑर’, ‘ओर’ किंवा ‘अर’ ही अक्षरे सिद्ध व्हायला हवीत; परंतु जगातील आणि भारतातीलही वेगवेगळ्या ठिकाणचे इंग्रजी बोलणारे लोक ‘Junior’ या शब्दाचा उच्चार ‘ज्युनियर’ असा करतात. त्यामुळे आपण देवनागरी लिपीत हा शब्द ‘ज्युनियर’ असा लिहायचे ठरवले आहे. अशा प्रकारे शब्द उच्चारांप्रमाणे लिहिण्याची आणखी काही उदाहरणे पुढे दिली आहेत. या उदाहरणांपुढे कंसात त्यांचे मराठीत अर्थही दिले आहेत.
अ. Senior (वरिष्ठ) – सिनियर
आ. Serious (गंभीर) – सिरियस
इ. Aluminium (एक धातू) – ॲल्युमिनियम
ई. Mountain (डोंगर) – माउंटन
उ. Biscuit (खाण्याचा एक पदार्थ) – बिस्कीट
३. इंग्रजीत परस्परांच्या अत्यंत जवळ जाणारे ‘मीटर’ आणि ‘लिटर’ हे शब्द देवनागरी लिपीत लिहितांना त्यांत रूढीमुळे भेद असणे
‘मीटर’ हा शब्द रोमन लिपीत ‘metre’ असा लिहिला जातो, तर ‘लिटर’ हा शब्द ‘litre’ असा लिहिला जातो. ‘metre’ या शब्दातील ‘m’ या अक्षराच्या पुढे ‘e’ हा एक स्वर आला आहे आणि ‘litre’ या शब्दातील ‘l’च्या पुढेही ‘i’ हा एकच स्वर आला आहे. ‘मीटर’ आणि ‘लिटर’ या शब्दांचे उच्चारही परस्परांच्या पुष्कळ जवळ जाणारे आहेत. असे असूनही प्रचलित मराठी भाषेत रूढीने ‘मीटर’ या शब्दातील ‘मी’ दीर्घ लिहिला जातो, तर ‘लिटर’ या शब्दातील ‘लि’ र्हस्व लिहिला जातो. सनातनच्या नियमानुसार कोणत्याही इंग्रजी अक्षराच्या पुढे एक स्वर आल्यास ते अक्षर र्हस्व लिहिणे योग्य आहे; परंतु ‘मीटर’ आणि ‘लिटर’ हे दोन शब्द याच पद्धतीने लिहिणे रूढीने अत्यंत प्रचलित असल्यामुळे आपणही ते त्याच पद्धतीने लिहिण्याचे धोरण स्वीकारले आहे.
४. ‘पीएच्.डी.’ ही पदवी लिहिण्याची पद्धत
इंग्रजी भाषेत ‘पीएच्.डी.’ या पदवीचे पूर्ण नाव ‘Doctor of Philosophy (डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी)’ असे आहे. तिचे संक्षिप्त रूप ‘Ph.D.’ असे लिहिले जाते. यातील ‘Ph.’ हे ‘Philosophy (फिलॉसॉफी)’ या शब्दाचे संक्षिप्त रूप आहे. या ‘Ph’चा उच्चार इंग्रजीत ‘पीएच्’ असाच केला जातो. ‘फ’ असा केला जात नाही. त्यामुळे ही पदवी देवनागरी लिपीत लिहितांना ‘पीएच्.डी.’ अशी लिहावी.
५. ‘ॲलोपॅथी’, ‘होमिओपॅथी’ आणि ‘आयुर्वेद’ या वैद्यकीय शाखांतील औषधांच्या संदर्भात उल्लेख करण्याची पद्धत
प्रचलित मराठी भाषेमध्ये ‘ॲलोपॅथिक औषधे’, ‘होमिओपॅथिक औषधे’ आणि ‘आयुर्वेदिक औषधे’ असे म्हटले जाते. हे इंग्रजी वळणाचे शब्दप्रयोग आहेत. त्याऐवजी पुढीलप्रमाणे उल्लेख करावेत.
अ. ‘ॲलोपॅथी’ची औषधे किंवा ‘ॲलोपॅथी’च्या गोळ्या
आ. ‘होमिओपॅथी’ची औषधे किंवा ‘होमिओपॅथी’च्या गोळ्या
इ. आयुर्वेदाची औषधे किंवा आयुर्वेदाच्या गोळ्या
६. इंग्रजी शब्द देवनागरी लिपीत लिहितांना तो एकेरी अवतरणचिन्हात लिहिणे
विज्ञापने वगळता वृत्ते, लेख इत्यादी लिखाणात इंग्रजी शब्द देवनागरी लिपीत लिहायचा असेल, तर तो एकेरी अवतरणचिन्हात लिहावा, उदा. तरुणांनी प्राणवायूचे ‘सिलिंडर’ रुग्णालयात पोचवण्यासाठी पुष्कळ धावपळ केली.
अपवाद : विविध प्रकारची मापे दर्शवणारे शब्द एकेरी अवतरणचिन्हात लिहू नयेत, उदा. किलोमीटर, सेंटीमीटर, इंच, सेल्सियस, किलोग्रॅम इत्यादी.’
– सुश्री (कुमारी) सुप्रिया शरद नवरंगे, एम्.ए. (मराठी), बी.एड., सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२७.९.२०२२)