१० ऑक्टोबरला खासदार संजय राऊत यांच्या जामिनावर सुनावणी 

शिवसेनेचे खासदार संजय राऊत

मुंबई – शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या जामिनावर पुढील सुनावणी १० ऑक्टोबर या दिवशी होणार आहे. राऊत यांच्या कोठडीत न्यायालयाने आणखी १३ दिवसांची वाढ केली आहे. २७ सप्टेंबर या दिवशीच्या सुनावणीत संजय राऊत यांची बाजू ऐकून घेण्यात आली आहे. पुढील तारखेला अंमलबजावणी संचालनालय (ईडी) त्यांची बाजू मांडणार आहे. पी.एम्.एल्.ए. (धनशोध निवारण अधिनियम) न्यायालयामध्ये ही सुनावणी घेण्यात आली. गोरेगाव येथील पत्राचाळ घोटाळा प्रकरणात संजय राऊत यांना अंमलबजावणी संचालनालयाने जून मासात अटक केली होती. त्यानंतर राऊत यांना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली होती. सध्या राऊत आर्थर रोड कारागृहामध्ये आहेत.

या सुनावणीत राऊत यांच्या अधिवक्त्यानी पुढील सूत्रे मांडली. एकमेकांशी पैशाची देवाण-घेवाण करणे हा गुन्हा होत नाही. आजपर्यंत याविषयी कोणताही पुरावा अन्वेषण यंत्रणा देऊ शकलेल्या नाहीत. संजय राऊत यांच्यामुळे पत्राचाळ प्रकल्पामध्ये ‘गुरुआशिष’ आस्थापनाला लाभ झाला याविषयी कोणताही पुरावा तपासयंत्रणा देऊ शकल्या नाहीत. या संपूर्ण प्रकरणात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संजय राऊत यांचा काहीही संबंध नाही; मात्र ओढूनताणून त्यांचे नाव घेतले गेले आहे.