महान भारतीय संस्कृतीचे आचरण करणे अत्यावश्यक ! – प्रशांत जुवेकर, हिंदु जनजागृती समिती

श्री अग्रसेन महाराज जयंतीनिमित्त अग्रवाल समाजाच्या वतीने जळगाव येथे कार्यक्रम !

खासदार श्री. उन्मेष पाटील यांना हिंदूसंघटन मेळाव्याचे निमत्रंण देतांना श्री. प्रशांत जुवेकर (डावीकडे)

जळगाव – भारतीय संस्कृती केवळ पुरातन नसून ती महान होती. दुर्दैवाने आज आपल्या शिक्षणव्यवस्थेत भारतीय संस्कृतीविषयी शिकवले जात नाही. या जगाला जेव्हा शिक्षणव्यवस्था म्हणजे काय असते ? हे ज्ञातही नव्हते, तेव्हा म्हणजे इ.स. पूर्व ७०० मध्ये भारतभूमीत तक्षशिला हे विश्वविद्यालय उत्तमरित्या चालू होते. ब्रिटीश अर्थशास्त्रज्ञ अँगस मॅडिसन याने त्याच्या पुस्तकात लिहून ठेवले आहे की, भारताचा जीडीपी (वार्षिक सकल उत्पन्न) वर्ष १५०० मध्ये २४.४ टक्के एवढा प्रचंड होता. भगवंताच्या कृपेने एवढ्या पवित्र भूमीत आणि महान संस्कृतीत आपल्याला जन्म मिळाला आहे. त्याची जाणीव ठेवून ती आचरणात आणणे आणि संघटित राहून तिचे रक्षण करणे, ही काळाची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे जळगाव जिल्हा समन्वयक श्री. प्रशांत जुवेकर यांनी केले. महाराज अग्रसेन यांच्या ५१४६ व्या जयंतीनिमित्त जळगाव अग्रवाल समाजाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जळगावचे खासदार श्री. उन्मेष पाटील यांनीही संबोधित केले.

श्री. जुवेकर पुढे म्हणाले की, लव्ह जिहाद, हलाल जिहाद यांसारख्या संकटांपासून आपल्या पुढील पिढीला वाचवायचे असेल, तर धर्माचरण करणे आणि संघटित होणे आवश्यक आहे.

अग्रवाल नवयुवक मंडळ यांच्या वतीने श्री अग्रसेन महाराज यांच्या जयंतीनिमित्त जळगाव येथे घटस्थापनेच्या दिवशी या कार्यक्रमाचे आयोजन अग्रवाल समाज अध्यक्ष मनीष अग्रवाल, उपाध्यक्ष सपन झुनझुनवाला आणि सहकारी, तसेच महिला अध्यक्ष सौ. राजश्री झुनझुनवाला, सौ. संगीता अग्रवाल आणि कार्यकारिणी यांनी केले होते.