गणेशचतुर्थीच्या शुभेच्छा दिल्याने ‘सर तन से जुदा’च्या मिळाल्या धमक्या !

  • आंबेडकरनगर (उत्तरप्रदेश) येथील सलाउद्दीन अहमद सिद्दीकीने केला दावा

  • सिराज खान आणि महंमद मुशीर यांच्यावर आरोप

  • पैशाच्या व्यवहारावरून वाद ! – पोलीस

सलाउद्दीन अहमद सिद्दीकी

आंबेडकरनगर (उत्तरप्रदेश) – येथील सलाउद्दीन अहमद सिद्दीकी या युवकाने अन्य दोन मुसलमान युवकांकडून त्याला ‘सर तन से जुदा’ची (शरिरापासून धड वेगळे करण्याची) धमकी मिळाल्याचा आरोप केला आहे. सलाउद्दीन याने ‘इश्तियाक अहमद याला गणेशचतुर्थीच्या शुभेच्छा दिल्याने मला धमकी मिळाली आहे’, असा दावा केला. सिराज खान आणि महंमद मुशीर यांच्याकडून ही धमकी मिळाल्याचे त्याने म्हटले आहे. दुसरीकडे पोलिसांनी मात्र सलाउद्दीन याचे आरोप फेटाळून लावत पैशाच्या व्यवहारावरून सलाउद्दीन आणि सिराज यांच्यामध्ये वाद असल्याचे सांगितले.

या प्रकरणी पोलिसांनी इश्तियाक अहमद, सिराज खान आणि महंमद मुशीर यांच्या विरोधात तक्रार प्रविष्ट करून घेऊन सलाउद्दीनने केलेल्या मागणीवरून त्याच्या घराला संरक्षण पुरवले आहे; परंतु त्याने केलेले आरोप चुकीचे असल्याचेही सांगितले आहे.