परस्पर निर्णय दिल्याविषयी देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री अब्दुल सत्तार यांना जाब विचारला !

डावीकडून अब्दुल सत्तार आणि देवेंद्र फडणवीस

मुंबई – शेतकरी सन्मान योजनेविषयी कोणताही निर्णय झालेला नसतांना तुम्ही ही माहिती घोषित कशी केली ? असा जाब १२ सप्टेंबर या दिवशी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांना विचारला.

केवळ विचार चालू असतांना घोषणा केल्यास त्या निर्णयाचे महत्त्व निघून जाते. कोणताही निर्णय घोषित करण्याचे अधिकार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडेच आहेत. त्यामुळे यापुढे कोणत्याही मंत्र्याने अशा सवंग घोषणा करण्यापूर्वी आमच्याशी चर्चा करावी, परस्पर घोषणा करू नये, अशी सक्त ताकीद त्यांनी अब्दुल सत्तार यांच्यासह उतावीळ मंत्र्यांना दिली. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या मंत्र्यांना समज दिल्याची माहिती आहे.

नेमके झाले काय ?

केंद्र सरकारच्या ‘प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजने’च्या धर्तीवर राज्यातही नवीन सन्मान योजना राबवण्याविषयी राज्य सरकार विचार करत आहे. याविषयी शिंदे-फडणवीस अधिकार्‍यांशी चर्चा करत असतांनाच ही माहिती प्रसारमाध्यमांमध्ये फुटली. त्यामुळे मंत्रिमंडळाच्याा बैठकीत उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या गोष्टीची गंभीर नोंद घेतली.