पितृपक्ष आणि श्राद्ध यांविषयी होणारा अपप्रचार आणि त्याचे खंडण

#Datta Datta #दत्त दत्त #श्रीदत्त श्रीदत्त #ShriDatta ShriDatta #mahalaya mahalaya #महालय महालय #pitrupaksha pitrupaksha #पितृपक्ष पितृपक्ष #shraddha shraddha #श्राद्ध श्राद्ध #ShraddhaRituals Shraddha rituals #श्राद्धविधी श्राद्धविधी #Shraddhavidhi Shraddha vidhi

सध्या पितृपक्ष चालू असून त्यानिमित्ताने सश्रद्ध हिंदू श्राद्धविधी करतात. पूर्वापार चालत असलेल्या परंपरा पाळण्याचा अनेकजण प्रयत्न करतात. असे असले, तरी तथाकथित पुरोगामी मंडळींकडून हिंदूंच्या अन्य सणांप्रमाणे श्राद्धपक्षाच्या संदर्भात हिंदूंचा बुद्धीभेद करण्याचा प्रयत्न करून हिंदूंना धर्माचरणापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला जातो. अनेक वेळा अज्ञानापोटीही काही प्रथा पडल्याचे दिसून येते. ‘पितृपक्ष आणि श्राद्ध यांच्या संदर्भात धर्मशास्त्र काय म्हणते आणि पुरोगाम्यांकडून नोंदवले जाणारे आक्षेप कसे चुकीचे आहेत’, हे लोकांना समजावे, यासाठी प्रस्तुत लेखाचे प्रयोजन !

टीका १ : या महिन्यात (प्रामुख्याने पितृपंधरवड्यात) अनेकजण महत्त्वाची कामे करत नाहीत. ज्यांना पैसे द्यायचे नसतात किंवा कोणतेतरी काम टाळायचे असते, असे लोकही याचे कारण सांगून कामे टाळतात.

खंडण : पितृपंधरवडा (महालय) निषिद्ध किंवा अशुभ मानण्याची मजल लांबपर्यंत गेलेली आहे की, या पंधरवड्यात ‘विवाह’ हा शब्दही उच्चारला जात नाही. मग विवाहविषयक बोलणी करणे, स्थळांना भेटी देणे, विवाह निश्‍चिती इत्यादी गोष्टी पुष्कळ दूर रहातात. प्रत्यक्षात प्राथमिक सिद्धता इत्यादी कोणत्याही गोष्टींसाठी पितृपंधरवडा आड येत नाही. (संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘सण, धार्मिक उत्सव आणि व्रते’)

दुसरे सूत्र असे की, ‘शास्त्रात् रूढिर्बलीयसी’ (शास्त्रापेक्षा रुढी अधिक बलवान ठरते) असे म्हणतात. त्यामुळे पितृपक्षात शक्यतो कोणत्याही शुभकार्याची सिद्धता केली जात नाही; पण याला शास्त्राधार नाही.

टीका २ : ज्या वेळी कावळ्याला ‘बाप’ म्हणून घास टाकतो, त्या वेळी एका कावळ्याने स्पर्श केला, तर एक वेळ समजू शकतो; पण एकाच वेळी १०-१२ कावळ्यांनी चोच मारली, तर त्याचा काय अर्थ काढायचा ? अन् तोच कावळा दुसर्‍याच्या गच्चीवर बसला, तर त्याचाही काय अर्थ काढायचा ? ही सर्व ढोंगबाजी आहे. फसवाफसवी आहे. चाळवाचाळवी आहे. आपल्यासाठीच आपण हे सर्व करत असतो.

खंडण : श्राद्धात पिंडदानाच्या माध्यमातून पितरांचे आवाहन करून त्यांच्या अतृप्त इच्छा पिंडाच्या माध्यमातून पुरवल्या जातात. सर्वसामान्य माणसात वासनांचे प्रमाण अधिक असते, म्हणून त्याच्या लिंगदेहातून विषम म्हणजे रज आणि तम प्रधान विस्फुटित लहरी बाहेर पडतात. कावळा हा अधिकाधिक विषम लहरी आकर्षित करून घेणारा प्राणी आहे; म्हणून त्याला या लहरी जाणवतात. पितरांचा लिंगदेह पिंडाकडे आकृष्ट होतो, तेव्हा पिंड विषम लहरींनी भारित होतो. या लहरींकडे कावळा आकृष्ट होतो. पितर श्राद्धस्थळी येऊन त्यांची तृप्ती झाल्याचे सूचक म्हणजे पिंडाला कावळा शिवणे. यालाच ‘कावळ्याने घास घेणे’, असे म्हणतात. अशा प्रकारे वासना असलेले लिंगदेह आणि माणसे यांच्यामधील कावळा हा एक दुवा (माध्यम) आहे. (संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘श्राद्ध : महत्त्व व शास्त्रीय विवेचन’)

हे शास्त्र लक्षात घेतल्यास पिंडाला एकाच वेळी अनेक कावळ्यांनी स्पर्श करणे, ही श्राद्धाच्या वेळी आवाहन केलेल्या अनेक पितरांची तेथील उपस्थिती दर्शवते. श्राद्धविधीत कावळा हा केवळ एक माध्यम असतो, हे समजून घेणे आवश्यक आहे. हिंदु धर्माने सांगितलेल्या चार ऋणांमध्ये पितृऋणाचाही समावेश आहे. कावळ्याला विशेष दृष्टी लाभली आहे. मुळात श्राद्धपक्ष हे केवळ दिवंगत वडिलांसाठी नाही, तर दिवंगत पूर्वजांसाठी करतात. त्यामुळे ‘एकाच्या ऐवजी अनेक कावळे पिंडाला शिवतात किंवा एकच कावळा अनेक पिंडांना शिवतो’, असे म्हणणे हास्यास्पद आहे. हे म्हणजे ‘एकच शिक्षक वेगवेगळ्या वर्गातील विद्यार्थ्यांना विषय कसा शिकवतो’, अशी शंका उपस्थित करण्यासारखे आहे.

टीका ३ : मेल्यावर दहावा, तेरावा, पितर घालण्यापेक्षा जिवंतपणी चांगले सांभाळा. सन्मान द्या. ती खरी सेवा ठरेल.

खंडण : ‘नातेवाईक जिवंत असतांना त्यांचा योग्य सांभाळ करणे’, हे प्रत्येक हिंदूचे कर्तव्य आहे, असे हिंदु धर्मशास्त्र सांगते. ‘मृत्यूनंतरचा प्रवास सुखमय आणि क्लेशरहित व्हावा, पितरांना पुढच्या लोकांत जाण्यासाठी गती मिळावी’, यांसाठी हिंदु धर्माने श्राद्धविधी करण्यास सांगितले आहेत. ‘श्राद्ध करा आणि जिवंतपणी वडिलधार्‍यांना त्रास द्या’, असे कुठेही सांगितलेले नाही. कर्माचा सिद्धांत अन् पुर्नजन्म न मानणारेच असा प्रचार करू शकतात.

टीका ४ : पूर्वजांची सेवा करायचीच असेल, तर आपली पूर्ण वंशावळ जमवा. पूर्वजांचे स्मरण रहावे, म्हणून छोटी छोटी पुस्तके छापा. त्यांच्या स्मरणार्थ विधायक कार्य करा. शाळा, वाचनालय, वैद्यकीय सेवा, सामाजिक काम करणार्‍या संघटनांना साहाय्य करा. जुनी वहिवाट पूर्ण बंद करून नवीन चालू करा, म्हणजे समाजात नवीन चांगल्या प्रथा निर्माण होतील.

खंडण : छोटी छोटी पुस्तके छापण्यासाठी किंवा सामाजिक कार्य करण्यासाठी कोणाची आडकाठी नाही; पण त्यासाठी ‘श्राद्धपक्षाला फाटा द्या’ हा कुठला तर्क ? ‘श्राद्धाऐवजी सामाजिक कार्य करा’, असे म्हणणे ‘एखाद्या रुग्णावर शस्त्रक्रिया करण्याऐवजी त्या पैशांतून सामाजिक कार्य करा’, असे म्हणण्याएवढे हास्यास्पद आहे. अध्यात्म हे अनुभूतींचे शास्त्र आहे. अनुभूती येण्यासाठी तो तो विधी अथवा आज्ञा श्रद्धेने करावी लागते. ती न करताच फाटे फोडत बसणे; म्हणजे ‘साखरेची चव घेण्याची वृत्ती न ठेवताच ‘साखरेची गोडी पटवून द्या’, असे आवाहन करण्यासारखे आहे.

तथाकथित पुरोगामी मंडळी हिंदु धर्मातील प्रथा-परंपरा यांवर सातत्याने द्वेषमूलक टीका करून श्राद्धाविषयी सामान्य हिंदूंमध्ये विकल्प निर्माण करत आहेत. अमेरिकेतील हॉलीवूड अभिनेते सिल्व्हेस्टर स्टॅलोन यांनी भारतात येऊन त्यांच्या मुलाचे श्राद्ध केले होते. प्रत्येक वर्षी असंख्य विदेशी श्राद्ध करण्यासाठी भारतात येतात. यंदाही नायजेरिया, रशिया, युनायटेड किंगडम आदी अनेक देशांतून येथून विदेशी लोक श्राद्धविधी करण्यासाठी गया आदी ठिकाणी आले होते. जुनी वहिवाट बंद करून नव्या प्रथा चालू करण्याचे आवाहन करण्याचे पाश्‍चात्त्य खूळ अंगी असणार्‍यांनी अनेक पाश्‍चात्त्य व्यक्ती भारतातील तीर्थक्षेत्री येऊन श्राद्धादी विधी करतात, तर अनेक विदेशी हे श्राद्धावर संशोधनही करत आहेत, हे लक्षात घेतले पाहिजे.

कथित पुरोगाम्यांच्या धर्मविरोधी कारस्थानांना बळी न पडता हिंदूंनी ‘श्राद्ध’ या हिंदु धर्मातील विधीकडे सकारात्मक आणि अध्यात्मशास्त्रीय दृष्टीने पहाणे आवश्यक आहे.

(सौजन्य : सनातन संस्था आणि सनातन संस्थेचे संकेत स्थळ sanatan.org)

(म्हणे) ‘जिवंतपणी दहाव्याचा विधी केला आणि पिंडाला कावळा शिवला !’ – डॉ. नरेंद्र दाभोलकर

विधान : ‘अंनिसच्या कार्यकर्त्याने जिवंतपणी दहाव्याचा सर्व विधी करून स्वतःचे पिंडदान केले, तरी त्याच्या पिंडाला कावळा शिवला. १०० ठिकाणी ही बाब समिती याच रितीने सिद्ध करू इच्छिते; मात्र धर्माभिमान्यांनी ही चिकित्सा करू देण्याची सिद्धता दाखवावी.’ – डॉ. नरेंद्र दाभोलकर, सातारा. (दै. सकाळ, पुणे, १६.६.२०१२)

खंडण : ‘सर्वसाधारण माणूस जिवंत असल्यास त्याचा लिंगदेह बाहेर पडू शकणार नाही आणि तो कावळ्यात शिरू शकणार नाही. असे असतांना लिंगदेह ते पिंडातील अन्न कसे ग्रहण करील ?


अंनिसचे डॉ. दाभोलकर यांच्या हास्यास्पद आव्हानाला एका वाचकाने दिलेले चोख प्रत्त्युत्तर !

जिवंतपणी पिंडदानाचा विधी केल्यास पिंडाभोवती सूक्ष्म शरीर घुटमळणार नसल्याने प्रत्येक पिंडाला कावळा शिवणे सहज शक्य !

विज्ञान असे सांगते की, शरिरातील चेतनेचा उगम रसायनांमुळे होतो; परंतु ती विशिष्ट रसायने टोचून मृत शरीर जिवंत झाल्याचे एकही उदाहरण नाही. त्यामुळे चेतनेचे मूळ रसायनांमध्ये नसून आत्म्यात आहे, अशी श्रद्धा सर्वत्र दिसते. त्या श्रद्धेनुसार मृत्यूसमयी आत्म्यासोबत सूक्ष्म शरीरही देह सोडून जाते आणि मृताची काही इच्छा राहिली असेल, तर सूक्ष्म शरीर पिंडाभोवती घुटमळत रहाते. ते काकदृष्टीला दिसत असल्याने कावळा पिंडाजवळ येत नाही. तसा अनुभवही अनेकांना येतो; परंतु जिवंतपणी पिंडदानाचा विधी केल्यास सूक्ष्म शरीर पिंडाभोवती घुटमळणार नाही. त्यामुळे अंनिस करू इच्छित असलेल्या उपरोक्त प्रयोगातील प्रत्येक पिंडाला कावळा शिवला, तर नवल नाही. मान्यतापात्र वैज्ञानिक संस्थांनी याविषयी सत्यशोधन करावे.’

– श्री. अभय रायकर, पुणे (दैनिक सकाळ, पुणे शहर, बुधवार, २०.६.२०१२)

(श्री. अभय रायकर यांनी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या धर्मद्रोही विचारांचा प्रतिवाद केला, हे चांगले केले. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन ! याविषयीच्या अधिक माहितीसाठी सनातन-निर्मित ग्रंथ ‘श्राद्धातील कृतींमागील शास्त्र’ हा वाचावा. – संकलक)

Sanatan Sanstha presents Shraddha Rituals App !
App is available in – Marathi, Hindi, Kannada, Gujarati, Telugu, Malayalam & English

(चित्रावर क्लिक करा)