नेपाळमध्ये हिंदु राष्ट्र आणि राजेशाही यांच्या पुनरुच्चारास आरंभ !

  • नेपाळमध्ये पुन्हा राजेशाही सुरू होणार ?      

  • माजी राजे ज्ञानेंद्र शाह यांच्या स्वागतासाठी हजारो लोक उतरले रस्त्यावर

१. नेपाळचे माजी राजा ज्ञानेंद्र शाह यांच्या स्वागतासाठी १० सहस्र लोक जमले !

नेपाळची राजधानी काठमांडू येथील त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या मुख्य प्रवेशद्वारापासून १० सहस्र उत्साही लोकांचा मोठा जमाव जमला होता. प्रत्येक जण एका व्यक्तीची वाट पहात होता आणि त्या व्यक्तीच्या स्वागतासाठी प्रत्येक जण उत्सुक होता. काहींना हस्तांदोलन करायचे होते, तर काही जण घोषणा देत होते. त्या व्यक्तीमत्त्वाचे नाव आहे नेपाळचे माजी राजा ज्ञानेंद्र शाह ! ही गर्दी नेपाळमध्ये हिंदु राष्ट्र परत यावे आणि राजेशाही परत यावी, यासाठी घोषणा देत होती आणि माजी राजाचे स्वागत करत होती.

माजी राजा ज्ञानेंद्र शाह काठमांडूला परतल्यानंतर आर्.पी.पी.च्या वरिष्ठ नेत्यांनी विमानतळावर त्यांचे स्वागत केले. विमानतळावरून त्यांना त्यांच्या घरी पोचायला अडीच घंटे लागले; कारण स्वागतासाठी मोठी फेरी काढण्यात आली होती. लोकांनी राजाचे स्वागत केले आणि घोषणाही दिल्या.

२. राजेशाहीचे समर्थकांची राजेशाही शासनव्यवस्था परत आणण्याची मागणी आणि राष्ट्रीय लोकशाही पक्षाचा पाठिंबा !

१६ वर्षांपूर्वी नेपाळ हे जगातील एकमेव हिंदु राष्ट्र होते. ज्ञानेंद्र शाह २००८ पर्यंत नेपाळचे राजा होते; पण माओवादी चळवळ आणि कथित डावी विचारसरणी यानंतर तेथे सत्तांतर झाले. त्यामुळे ज्ञानेंद्र शाह यांना सिंहासन सोडावे लागले. आता नेपाळमधील राजेशाहीचे समर्थक राजेशाही शासनव्यवस्था परत आणण्याची मागणी करत आहेत. नेपाळमधील शासनव्यवस्थेत परिवर्तन करण्याच्या मागणीत ज्ञानेंद्र शाह यांना राष्ट्रीय लोकशाही पक्ष पाठिंबा देत आहे. स्थापनेपासूनच राष्ट्रीय प्रजातंत्र पक्ष नेपाळमध्ये हिंदु राष्ट्र आणि राजेशाही यांना पाठिंबा देत आहे. नॅशनल डेमोक्रॅटिक पार्टी नेपाळसाठी हिंदु राष्ट्र आणि राजेशाही यांना एकमेकांना पूरक मानते.

२ अ.  नेपाळमधील वर्तमान व्यवस्थेमुळे लोकांचा भ्रमनिरास : ‘आर्.पी.पी.’चे वरिष्ठ उपाध्यक्ष रवींद्र मिश्रा यांनी बीबीसीला सांगितले की, आमच्या पक्षाला नेपाळमध्ये राजेशाही हवी आहे. नेपाळमधील सध्याच्या व्यवस्थेमुळे लोकांचा भ्रमनिरास झाला आहे. आता लोकांना जुने दिवस आठवत आहेत. वर्ष २००८ मध्ये सत्ता परिवर्तनानंतर १७ वर्षांनी राजा ज्ञानेंद्र आता नेपाळमध्ये खलनायक राहिलेले नाहीत.

३. ‘आम्हाला आमचा राजा परत हवा’, अशी नेपाळींची मागणी !

टाईम्स ऑफ इंडियाने त्यांच्या एका वृत्तात म्हटले आहे की, नवीन शासन व्यवस्थेमुळे लोकांचा भ्रमनिरास झाला आहे. कुलराज श्रेष्ठ नावाच्या एका सुताराने सांगितले की, १६ वर्षांपूर्वी तो राजेशाही संपवण्यासाठी झालेल्या निदर्शनात सहभागी झाला होता. त्याला आशा होती की, परिस्थिती पालटेल; पण तो चुकीचा असल्याचे त्याच्या लक्षात आले. नेपाळमध्ये काहीही पालटलेले नाही. लाखो नेपाळी लोकांना त्यांचे जुने दिवस परत हवे आहेत. राजेंद्र कुंवर म्हणाले, ‘‘देशात अस्थिरता आहे, किमती वाढत आहेत, शिक्षण आणि आरोग्य यांची स्थिती आणखी वाईट आहे. गरिबांकडे खायला काही नाही. देशाचे नियम श्रीमंतांना लागू होत नाहीत; म्हणूनच आम्हाला आमचा राजा परत हवा.’’

४. नेपाळमधील सत्तापरिवर्तन !

वर्ष २००८ पासून येथे १३ सरकारे पालटली. २४० वर्षांची राजेशाही पालटण्यासाठी नेपाळने अनेकदा त्याग केला. आंदोलनामुळे पर्यटनावर आधारित अर्थव्यवस्था ठप्प झाली. हिंसाचारात १६ सहस्र लोकांना प्राण गमवावे लावले.

वर्ष २०२२ च्या जनगणनेनुसार, हिमालयाच्या कुशीत असलेल्या नेपाळची लोकसंख्या ३०.५५ दशलक्ष म्हणजेच सुमारे ३.५ कोटी आहे. ८१.१९ टक्के लोकसंख्या हिंदू आहे.

५. पर्यायी राजकारणासाठी नेपाळवासियांचा शोध !

नेपाळमध्ये ‘आओ राजा, देश वाचवा’ अशा घोषणा दिल्या जात आहेत; परंतु संसदीय पाठिंब्याविना हे होणे कठीण वाटते. नेपाळमधील लोकप्रिय वृत्तपत्र ‘कांतिपूर’चे संपादक उमेश चौहान यांनी बीबीसीला उद्धृत केले आहे की, नेपाळमधील लोकांमध्ये सध्याच्या सरकारविषयी निराशा आहे. लोक संतप्त आहेत. ते पर्यायी राजकारण शोधत आहेत; परंतु त्यांना कोणताही ठोस पर्याय दिसत नाही. अशा परिस्थितीत राजेशाहीचे समर्थक या असंतोषाला एकत्र आणू इच्छितात. मला वाटत नाही की, हा असंतोष राजेशाहीच्या बाजूने जाईल.’’

नेपाळमधील माजी भारतीय राजदूत रणजित राय म्हणाले, ‘‘नेपाळमधील लोकांमध्ये निराशा आहे. सरकार लोकांच्या अपेक्षा पूर्ण करू शकले नाही; परंतु राजेशाही नेपाळमधील लोकांना निराशेतून बाहेर काढू शकेल का ? याविषयी मला शंका आहे.’’

६. राजेशाही पुनर्संचयित करण्यासाठी व्यापक सुधारणा आणि सार्वजनिक पाठिंबा यांची आवश्यकता !

नेपाळमधील प्रमुख राजकीय पक्ष, जसे की नेपाळी काँग्रेस आणि कम्युनिस्ट पक्ष हे धर्मनिरपेक्षता आणि लोकशाही यांचे समर्थन करतात. घटनात्मकदृष्ट्या राजेशाही पुनर्संचयित करण्यासाठी व्यापक सुधारणा आणि सार्वजनिक पाठिंब्याची आवश्यकता आहे; पण ते सध्या कठीण दिसते.

७. नेपाळच्या पंतप्रधानांकडून माजी राजा ज्ञानेंद्र शाह यांना मुख्य प्रवाहाच्या राजकारणात येण्याचे आव्हान !

नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी माजी राजा ज्ञानेंद्र शाह यांना मुख्य प्रवाहाच्या राजकारणात येण्याचे आव्हान दिले आहे. ओली यांनी ज्ञानेंद्र शाह यांच्यावर सुसंवाद बिघडवण्याचा आरोप केला आहे. सुदूर पश्चिम प्रांत विधानसभेच्या बैठकीला संबोधित करतांना पंतप्रधान म्हणाले, ‘‘ते (माजी राजा ज्ञानेंद्र) राज्यघटना, कायदा, लोकशाही, व्यवस्था, प्रक्रिया यांविषयी काहीही बोलत नाहीत; परंतु म्हणतात, ‘माझ्यासोबत चला, मी येईन आणि देश वाचवीन.’ देशाचे काय झाले आहे ? या प्रकारची कृती स्वीकारार्ह नाही. अशा कृती अस्थिरतेला आमंत्रण देतील. त्यांच्याकडून चालू असलेल्या कारवाया देशाला अराजकाच्या उंबरठ्यावर ढकलत आहेत. जर त्यांना राजकारणात यायचे असेल, तर मी त्यांचे स्वागत करतो. त्यांनी येऊन निवडणूक लढवावी. त्यांना संवैधानिक पद्धतीने राजकारणात प्रवेश करायचा असेल, तर त्यांचे स्वागत आहे.’’

८. माजी राजा ज्ञानेंद्र यांचे राजकीय पुनरागमन शक्य ?

नेपाळच्या जनतेच्या रोषाला तोंड देणारे माजी राजा ज्ञानेंद्र यांनी नेपाळमध्ये हिंदु धर्म आणि राजेशाही परत आणण्याच्या आवाहनावर कोणतीही थेट टिप्पणी केलेली नाही. त्यांनी थेट राजकीय वक्तृत्वापासून अंतर राखले आहे. त्यांच्या समर्थनार्थ होणारी निदर्शने आणि आरंभल्या गेलेल्या मोहिमा राजकीय पुनरागमनाचा प्रयत्न म्हणून पाहिल्या जात आहेत.

नेपाळमधील राजेशाही कशी संपुष्टात आली ?

वर्ष २००१ मध्ये राजवाड्यात भावाची आणि कुटुंबातील सदस्यांची हत्या झाल्यानंतर ज्ञानेंद्र २००२ मध्ये राजा झाले. या हत्येचा आरोप राजकुमार दीपेंद्रवर होता. त्याने आत्महत्या केली. त्यानंतर माजी राजा ज्ञानेंद्र नेपाळमध्ये अलोकप्रिय झाले. त्यांच्याविरुद्ध असंतोष वाढू लागला. वर्ष २००६ चे जनआंदोलन आणि माओवादी बंड यानंतर ज्ञानेंद्र यांनी औपचारिकपणे संवैधानिक राजेशाही रहित केली. त्यांनी सरकार आणि संसद विसर्जित करून पूर्ण सत्ता हस्तगत केली. आणीबाणी घोषित केली आणि देशावर राज्य करण्यासाठी लष्कराचा वापर केला. यामुळे नेपाळमधील डाव्या चळवळीला आणखी चालना मिळाली. प्रदीर्घ हिंसाचारानंतर वर्ष २००८ मध्ये नेपाळमधील राजेशाही संपुष्टात आली.

(संदर्भ : ‘आज तक’)