सध्या पुष्कळ मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळालेला ‘छावा’ हिंदी चित्रपट पहाण्यात आला. त्यामध्ये अभिनेते अक्षय खन्ना यांनी केलेल्या भूमिकेतून औरंगजेब अत्यंत क्रूरकर्मा असल्याची झलक तरी देशवासियांना बघायला मिळाली. औरंगजेबाने रयतेवर अनन्वित अत्याचार केलेच; परंतु हिंदूंची मंदिरे उद्ध्वस्त करण्यापासून कला-संस्कृतीची पाळेमुळेही नष्ट करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. बलपूर्वक धर्मांतर करून त्याने भारतियांना हिंदु धर्माचरण करणे बंद करायला लावले. हिंदूंच्या कलांवरही मोगलांनी आक्रमण केले. त्या काळी गुरुकुल पद्धतीतून जे विद्यार्थी घडत होते ते विविध कला आणि विद्या यांमध्ये पारंगत असायचे. अशा शैक्षणिक पद्धतीवर आक्रमण करून त्या कलाही नष्ट करण्यासाठी मोगल राज्यकर्त्यांनी प्रयत्न केले. औरंगजेबाने राजांना मांडलिक बनवलेच; पण कलाकारांनाही गुलाम बनवले. दरबारी कलाकार बनवले. त्यामुळे बर्याच जणांना वाटते की, कथ्थक ही मोगलकालीन कला आहे. मला भेटणारेही बरेच जण कथ्थक ही ‘दरबारी कला’ असल्याविषयी मला विचारतात; परंतु ‘कथ्थक’ केवळ ‘दरबारी’ नव्हे, तर ते ‘दैवी’ आहे.
खरेतर श्री गणेश ही १४ विद्या आणि ६४ कला यांची देवता आहे. प्रत्यक्ष भगवान शिव यांनी केलेले तांडवनृत्य हे आजही कथ्थकमध्ये केले जाते. नृत्याचा जर अभ्यास केला, तर ‘ते ‘कुशीलव’ आहे; म्हणजेच त्याचा उगम रामायणकाळात झालेला आहे’, असे लक्षात येते. ‘श्रीकृष्ण आणि राधा’ हा विषय तर कथ्थक नृत्याचा प्राण आहे. प्राचीन काळापासून ‘ईश्वरप्राप्ती’ हा उद्देश ठेवून ही कला मंदिरांतून प्रस्तुत केली जात असे; मात्र ती मोगलांच्या काळात ‘दरबारी कला’ म्हणून अधिक नावारूपाला आली. मोगलांच्या या आक्रमणामुळे तिचे स्वरूप ‘मोगलांच्या मनोरंजनासाठी’ असे झाले. त्यामुळे मोगलांच्या दरबारात किंवा त्यांच्या सरदारांचे मनोरंजन करण्यासाठी या नृत्यात कामुक भावाची नृत्ये अधिक प्रमाणात निर्माण झाली आणि ईश्वरप्राप्तीचा मूळ उद्देश हरवू लागला. संगीतावरही मोगल आक्रमकांचा प्रभाव पडला. त्यामुळे सध्याच्या काळातही मुसलमानांचा प्रभाव असणार्या हिंदी चित्रपटसृष्टीनेही कथ्थकला ‘कोठीवरचे नृत्य’ म्हणून सादर केले. आपल्या कलांचे अस्तित्व, त्यांचा मूळ उगम आणि त्यांचे उद्दिष्ट नक्कीच केवळ मनोरंजन असे नाही. यासाठी त्यांचा सखोल अभ्यास होणे आवश्यक आहे. कलाप्रेमी, कला विद्यार्थी, कलाशिक्षक, रसिक प्रेक्षक या सगळ्यांनीच हे उमजून या कलांचे ‘ईश्वरप्राप्तीसाठी कला’, म्हणजेच साधना म्हणून पुनरुत्थान करण्याची वेळ आता आली आहे !
– सौ. सावित्री वीरेंद्र इचलकरंजीकर, नृत्य अभ्यासिका, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा.