कामोठे, रायगड येथील सौ. पल्लवी म्हात्रे यांची ११ वर्षांची मुलगी कु. तनिष्का म्हात्रे (आध्यात्मिक पातळी ५१ टक्के) हिच्या निधनानंतर तिच्या आईने अनुभवलेली स्थिरता !

कामोठे (जिल्हा रायगड) येथील सौ. पल्लवी म्हात्रे यांची मुलगी कु. तनिष्का म्हात्रे (वय ११ वर्षे) हिचे १६.९.२०२१ या दिवशी निधन झाले. आज ६.९.२०२२ या दिवशी तिचे वर्षश्राद्ध आहे. त्या निमित्ताने तिच्या निधनाच्या दिवशी आणि निधनानंतर तिची आई सौ. पल्लवी म्हात्रे यांना जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.

कै. (कु.) तनिष्का म्हात्रे

१. निधनाच्या दिवशी जाणवलेले सूत्र

१ अ. विजेचा तीव्र धक्का लागून मुलीचे जागीच निधन होणे आणि प्रारंभी ही परिस्थिती स्वीकारता न येणे : ‘१६.९.२०२१ या दिवशी माझी मोठी मुलगी तनिष्का म्हात्रे ही आमच्या इमारतीत खाली खेळायला गेलेली असतांना तिला विजेचा तीव्र धक्का लागून तिचे जागीच निधन झाले. सायंकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली. आम्ही तिला रुग्णालयामध्ये घेऊन गेलो; परंतु तिचे आधीच निधन झाले होते. प्रारंभी ही परिस्थिती मला स्वीकारता येत नव्हती. तिच्या सर्व आठवणी डोळ्यांपुढे उभ्या रहात होत्या.

सौ. पल्लवी म्हात्रे

२. निधनानंतर जाणवलेली सूत्रे

२ अ. मुलीचे पार्थिव घरी आणल्यानंतर ‘तुझी जन्मोजन्मीची आई परम पूज्य गुरुमाऊली असून तू कुठेही अडकू नकोस’, असे तिला सांगणे आणि तिच्या डोक्यावर हात ठेवून दत्ताचा नामजप करणे : तिचे पार्थिव येईपर्यंत घरामध्ये दुःखाचे वातावरण होते; परंतु तिचे पार्थिव आल्यानंतर मला पुष्कळ शांत वाटत होते. मी मनातून तनिष्काला सांगत होते, ‘तू आता आमच्यामध्ये अडकू नकोस. परम पूज्य गुरुदेवांच्या चरणी जा. या जन्मामध्ये आपण एवढाच वेळ सोबत होतो. मी केवळ या जन्मात तुझी आई होते; पण आपली जन्मोजन्मीची आई परम पूज्य गुरुमाऊलीच आहे. तू त्यांच्याकडे जा.’ तिचे पार्थिव घरी असेपर्यंत मी तिच्या डोक्यावर हात ठेवून दत्ताचा नामजप करत होते. मला गुरुमाऊलीच्या कृपेमुळेच त्या क्षणी स्थिरता लाभली आणि त्यांनीच माझ्याकडून दत्ताचा नामजप करून घेतला.

२ आ. ‘निधनानंतर मुलीला श्री गुरूंच्या चरणी स्थान मिळेल’, या विचाराने पुष्कळ आनंद होणे : तनिष्काला तीव्र आध्यात्मिक त्रास होता. तो त्रास सहन करण्याच्या क्षमतेच्या पलीकडे होता. ती पुष्कळ लहान होती. ‘तिला या त्रासातून मुक्ती मिळाली’, असा दृष्टीकोन मला सुचल्यामुळे मी स्थिर होते. तिला साधनेची पुष्कळ आवड होती. ‘आपण परम पूज्यांना भेटायला कधी जाणार ?’, अशी ती सारखे म्हणायची. ‘निधनानंतर तिला श्री गुरूंच्या चरणी स्थान मिळेल’, या विचाराने मला पुष्कळ आनंद होत होता.

२ इ. घरी भेटायला येणार्‍या साधकांना घरात पुष्कळ चैतन्य जाणवणे : तनिष्काला अग्नी दिल्यानंतर घरातील वातावरण अगदी शांत वाटत होते. घरी येणारे साधकही सांगत होते, ‘‘घरात कुणाचे निधन झाले आहे, असे वाटत नाही. पुष्कळ चैतन्य जाणवत आहे.’’

२ ई. ‘तनिष्का गुरुचरणांशी पोचली असून ती कशातच अडकलेली नसणे आणि तिच्या सर्व इच्छा पूर्ण झाल्या आहेत’, असे सद्गुरु अनुराधा वाडेकर यांनी सांगितल्यावर साधिका निश्चिंत होणे : मला सद्गुरु अनुराधा वाडेकर यांचा दूरभाष आला. तेव्हा सद्गुरु ताईंनी सांगितले, ‘‘तनिष्का गुरुचरणांशी पोचली आहे. ती कशातच अडकलेली नाही. तिच्या सर्व इच्छा पूर्ण झाल्या आहेत.’’ त्या वेळी मी निश्चिंत झाले.

२ उ. समाजातील व्यक्तींच्या प्रश्नांना योग्य उत्तरे देऊन सामोरे जाता येणे : काही समाजातील व्यक्ती आणि नातेवाइकांनीही मला प्रश्न विचारला, ‘‘तुम्ही सनातनचे इतके करता. एवढे देवाचे करता, तरी तुमच्या समवेत असे कसे झाले ?’’ त्या वेळी श्री गुरूंच्या कृपेने मला त्यांना ठामपणे उत्तर देता आले.

२ ऊ. साधक आल्यानंतर त्यांनी गुरुदेवांचे स्मरण आणि दत्ताचा नामजप करून स्थिर रहाण्यास सांगणे अन् ‘परात्पर गुरुदेवच साधकांच्या माध्यमातून येत आहेत’, असे जाणवणे : साधक भेटायला आले की, मला चांगले वाटायचे; कारण ते तनिष्काच्या आठवणी काढण्यापेक्षा मला गुरुदेवांचे स्मरण करून द्यायचे. ‘दत्ताचा नामजप कर आणि स्थिर रहा’, असे मला सांगायचे. ‘मला चैतन्य पुरवण्यासाठी परात्पर गुरुदेवच साधकांच्या माध्यमातून येत आहेत’, असे जाणवायचे.

२ ए. गुरुमाऊलीच्या कृपेमुळे ‘तनिष्का गुरुदेवांची आहे’, असे साधिकेच्या मनावर बिंबणे आणि तिच्या निधनानंतर ‘ती गुरुमाऊलीचेच लेकरू असून गुरुमाऊलीच्या जवळ गेले आहे’, असा भाव मनामध्ये निर्माण होणे : आपली एखादी प्रिय व्यक्ती आपल्याला सोडून गेली की, आपल्याला दुःख होते, वाईट वाटते; परंतु मला या प्रसंगी स्थिर रहाता आले. वेळोवेळी गुरुमाऊलीच्या कृपेमुळे ‘तनिष्का माझी नसून गुरुदेवांची आहे’, असे माझ्या मनावर बिंबले गेले. त्यामुळे तनिष्काच्या निधनानंतर माझ्या मनामध्ये ‘ती गुरुमाऊलीच्या जवळ गेली आहे’, असा भाव निर्माण झाला आणि ‘या जन्मात तनिष्काच्या संदर्भातील माझे दायित्व संपले आहे’, असे मला वाटू लागले. ‘तनिष्काचे पुढच्या साधनेसाठी मार्गक्रमण झाले आहे आणि आता आपल्याला आपली पुढची साधना करायची आहे’, असेच विचार मनामध्ये येत होते.

‘हे गुरुमाऊली, जन्म आणि मृत्यू यामध्ये न अडकणे, सुख-दुःखाच्या पलीकडे जाऊन स्थिर रहाणे, हे आपणच आम्हाला शिकवलेत. त्याबद्दल आपल्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

२ ऐ. मुलीच्या दहाव्या दिवसाचे विधी करतांना आलेली अनुभूती आणि अकराव्या दिवशीचे विधी करतांना जाणवलेली सूत्रे

२ ऐ १. दहाव्या दिवसाचा विधी होत असतांना कावळा पिंडाला न शिवणे आणि दत्तगुरूंना प्रार्थना करून मुलीला परम पूज्य गुरुदेवांजवळ घेऊन जाण्यास सांगितल्यावर लगेच कावळा पिंडाला शिवणे : दहाव्या दिवसाचा विधी होत असतांना तिच्या पिंडाला कावळा शिवत नव्हता. त्या वेळी मी डोळे मिटले असता मला तनिष्का पुष्कळ आनंदात असल्याचे दिसले. तिची या त्रासदायक देहातून सुटका झाली; म्हणून ती आनंदी दिसत होती. मी त्या वेळी दत्तगुरूंना प्रार्थना केल्यावर दत्तगुरु तिच्या शेजारी प्रगट झाले. तनिष्काने खाली वाकून दत्तगुरूंना नमस्कार केला. मी दत्तगुरूंना प्रार्थना केली, ‘हे भगवंता, तिच्याभोवती संरक्षककवच निर्माण करा आणि तिला परम पूज्य गुरुदेवांच्या जवळ घेऊन जा.’ तितक्यात सर्व नातेवाइकांचा आवाज आला की, ‘पिंडाला कावळा शिवला.’

२ ऐ २. ‘अकराव्या दिवशी तिच्या विधीच्या वेळी दत्तगुरु मुलीच्या समवेत आहेत’, असे आईला जाणवणे आणि दत्तगुरूंनी परम पूज्य गुरुमाऊलीपर्यंत मुलीला पोचवल्याने ती पुष्कळ आनंदी असणे : अकराव्या दिवशी तिचे कार्य होते. विधी चालू असतांना त्यातील चैतन्य तिला ग्रहण करता यावे; म्हणून ‘दत्तगुरु तिला घेऊन आमच्या घरात आले’, असे मला दिसले. ‘दत्तगुरु सतत तिच्या समवेत आहेत’, असे मला जाणवले. थोड्या वेळाने पांढरेशुभ्र वस्त्रे घातलेली परम पूज्य गुरुमाऊलीही तिला नेण्यासाठी तेथे उपस्थित झाली. तेव्हा मला पुष्कळ कृतज्ञता वाटली. संपूर्ण विधी होईपर्यंत आणि सर्व लहान मुलींचे भोजन होईपर्यंत परम पूज्य गुरुमाऊली तिच्या समवेतच उभी होती. त्यांनी तिचा हात धरला. तेव्हा तनिष्का पुष्कळ आनंदात होती. ‘गुरुदेवांनी तनिष्काचा हात धरल्यावर दत्तगुरुही तनिष्काला गुरुदेवांपर्यंत पोचवण्याचे दायित्व पूर्ण झाले’, असे म्हणून निघाले. त्यांच्या चरणीही कृतज्ञता व्यक्त झाली.

केवळ गुरुमाऊलीच्या कृपेमुळेच या एवढ्या मोठ्या कठीण प्रसंगांमध्ये मला स्थिर रहाता आले.  ‘तुमची कृपा माझ्यावर असू द्या’, अशी तुमच्या चरणी प्रार्थना करते.’

– सौ. पल्लवी म्हात्रे (कै. तनिष्काची आई) कामोठे, जिल्हा रायगड. (२८.९.२०२१)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक