सोलापूर, ५ सप्टेंबर (वार्ता.) – हिंदु जनजागृती समितीच्या ‘हिंदु राष्ट्र संकल्प अभियाना’अंतर्गत येथील श्री हिंगुलांबिका देवीच्या मंदिरात हिंदुत्वनिष्ठ आणि धर्मप्रेमी महिला यांनी ‘हिंदु राष्ट्र स्थापने’ची शपथ घेतली. या वेळी सामाजिक कार्यकर्ते श्री. बापू ढगे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. राजन बुणगे यांच्यासह मोठ्या संख्येने महिला भाविकही उपस्थित होत्या.
सोलापूर येथील ‘श्री ब्रह्मानंद गणपति समाजसेवा मंडळ ट्रस्ट’च्या वतीने मंडळामध्ये हिंदु राष्ट्र स्थापनेची शपथ घेण्यात आली. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. राजन बुणगे यांच्या हस्ते श्री गणेशाचे पूजन आणि आरती करण्यात आली. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे विनोद रसाळ, मंडळाचे अध्यक्ष संदीप बेळमकर आणि ट्रस्टचे पदाधिकारी उपस्थित होते.
मध्यवर्ती सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळामध्ये ३०० भक्तांनी घेतली हिंदु राष्ट्र स्थापनेची प्रतिज्ञा !
सोलापूर येथील पूर्वविभाग मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने लोककल्याणार्थ ‘अथर्वशीर्ष पठण’ आणि पर्यावरण शुद्धीसाठी ‘सामूहिक अग्निहोत्र’ यांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ३०० हून अधिक भाविक आणि गणेशोत्सव मंडळांचे कार्यकर्ते उपस्थित होते. या वेळी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘हिंदु राष्ट्र स्थापने’ची शपथ घेण्यात आली. या वेळी सहभागी झालेल्या १७५ गणेशभक्तांना आयोजकांच्या वतीने सनातन संस्थेचा ‘अथर्वशीर्ष’ हा लघुग्रंथ भेट देण्यात आला.
या वेळी पोलीस उपायुक्त डॉ. वैशाली कडुकर, पूर्व विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे सचिव अजय दासरी, पांडुरंग दिड्डी (काका), रामचंद्र जन्नू, अखिल भारत पद्मशाली पुरोहित संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष पंतलु वेणुगोपाल जिला, पूर्व विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष संजय साळुंके, अमर बोडा, अनिल वंगारी, गणेश पेंनगोंडा, अक्कलकोटचे ब्रह्मे गुरुजी, हिंदु जनजागृती समितीच्या श्रीमती अलका व्हनमारे आदी उपस्थित होते.