श्री गणेशमूर्ती विसर्जन पंचगंगा नदीच्या वहात्या पाण्यात करण्यास आडकाठी आणू नये ! – समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे जिल्हाधिकारी यांना निवेदन

जिल्हाधिकारी राहुल रेखावार (उजवीकडे) यांना निवेदन देतांना विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी

कोल्हापूर, २७ ऑगस्ट (वार्ता.) – प्रशासनाने येणारा गणेशोत्सव अत्यंत उत्साहाने साजरा होण्यासाठी जनतेच्या भावना समजून घेऊन काम करावे आणि येणारा उत्सव जनतेच्या हातात हात घालून दबाव तंत्राचा वापर न करता साजरा करावा. ज्यांना श्री गणेशमूर्ती विसर्जन पंचगंगेत करायचे आहे त्यांना आडकाठी आणू नये. कुणावरही कुठे विसर्जन करावे, यासाठी सक्ती करू नये, असे निवेदन कोल्हापूर येथील समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या वतीने जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना देण्यात आले.

या प्रसंगी शिवसेनेचे उपशहरप्रमुख श्री. शशी बीडकर, श्री. दुर्गेश लिंग्रस, श्री. किशोर घाटगे, हिंदुत्वनिष्ठ श्री. संभाजी साळुंखे, हिंदु एकता आंदोलनचे श्री. चंद्रकांत बराले, हिंदु महासभेचे श्री. संजय कुलकर्णी, श्री. मनोहर सोरप, श्री. प्रमोद तथा नंदू घोरपडे, बजरंग दलाचे श्री. अक्षय ओतारी, हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी, ‘वन्दे मातरम् युथ ऑर्गनायझेशन’चे श्री. अवधूत भाट्ये यांसह अन्य उपस्थित होते.

जिल्हाधिकारी राहुल रेखावार (उजवीकडे) यांच्यासमवेत चर्चा करतांना विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी

निवेदनात करण्यात आलेल्या अन्य काही मागण्या

१. गणेशोत्सव खड्डेमुक्त, वाहतूक कोंडीमुक्त व्हावा यासाठी प्रशासनाकडून कोणत्या उपाययोजना केल्या जात आहेत ? प्रशासनाने तरुण मंडळांचे खड्ड्यांचे पैसे भरून घेतले आणि दिलेल्या आवाहनास हरताळ फासला.

२. गणेशोत्सव काळात विद्युत् पुरवठा आणि पाणीपुरवठा सुरळीत ठेवावा.

३. जिल्हाधिकारी यांनी प्रशासनातील सर्व घटक, प्रदूषण नियंत्रण मंडळ, लोकप्रतिनिधी यांची संयुक्त बैठक घ्यावी. त्यात गणेशोत्सवाविषयी नेमकी भूमिका स्पष्ट करावी.

वर्षभर प्रदूषण नियंत्रण मंडळ झोपलेले असते ! – किशोर घाटगे, शिवसेना

निवेदन दिल्यानंतर पत्रकारांशी बोलतांना शिवसेनेचे श्री. किशोर घाटगे म्हणाले, ‘‘वर्षभर प्रदूषण नियंत्रण मंडळ झोपलेले असते आणि गणेशोत्सवाच्या कालावधीत प्रदूषण मंडळास जाग येते. ते वेगवेगळे आदेश काढते.’’

श्री गणेशमूर्ती दान करण्याच्या संकल्पनेस विरोध ! – संभाजीराव साळुंखे, हिंदुत्वनिष्ठ

या प्रसंगी बोलतांना हिंदुत्वनिष्ठ श्री. संभाजीराव साळुंखे म्हणाले, ‘‘श्री गणेशमूर्ती दान करण्याच्या संकल्पनेस आमचा विरोध आहे. देवता दान करण्याची वस्तू नाही. ज्या भगवंताने सृष्टी घडवली त्या भगवंतांचे दान कसे काय कोणी देऊ शकतो आणि दान घेऊ शकतो ? महापालिकेने हिंदूंच्या धार्मिक गोष्टींमध्ये लुडबूड करू नये.’’

उत्तरेश्वर पेठ येथील ५३ पेक्षा अधिक तालीम मंडळे आणि गणेशोत्सव मंडळे पंचगंगा नदीतच विसर्जन करण्यावर ठाम !

कोल्हापूर – या संदर्भात उत्तरेश्वर पेठ येथील ५३ पेक्षा अधिक तालीम मंडळे आणि गणेशोत्सव मंडळे यांची बैठक पार पडली. यात सर्वांनी ‘पारंपरिक मार्गानेच मिरवणूक काढणार आणि पंचगंगेतच विसर्जन करणार’, अशी ठाम भूमिका घेतली आहे. या संदर्भात गणेशोत्सव मंडळाचे एक कार्यकर्ते म्हणाले, ‘‘पंचगंगा नदीत नाल्याचे पाणी जाते, कारखान्याचे पाणी जाते, रुग्णालयातील ‘सिरींज’ आढळून येतात. हे प्रशासनास अनेक वेळा दाखवून दिले आहे. त्यावर पहिल्यांदा प्रशासनाने कारवाई करावी. हिंदूंचे सण आल्यावरच प्रशासनास कशी काय जाग येते ?’’