औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्यांच्या नामांतराचा ठराव विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहांत संमत !

मुंबई – ‘औरंगाबाद’चे नामांतर ‘छत्रपती संभाजी महाराज नगर’, तर ‘उस्मानाबाद’चे नामांतर ‘धाराशिव’ करण्याचा ठराव २५ ऑगस्ट या दिवशी विधानसभा आणि विधान परिषद या दोन्ही सभागृहात संमत करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा ठराव सभागृहात मांडला होता. हे दोन्ही ठराव विधीमंडळात संमत झाल्यावर सभागृहात ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘छत्रपती संभाजी महाराज की जय’, ‘भारतमाता की जय’, असा जयघोष करण्यात आला.

१. १६ जुलै या दिवशी झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत ‘औरंगाबाद’ आणि ‘उस्मानाबाद’ या दोन्ही जिल्ह्यांच्या नामांतराचा निर्णय घेण्यात आला होता.

२. विधीमंडळात संमत करण्यात आलेले हे दोन्ही ठराव मान्यतेसाठी केंद्रीय गृहविभागाकडे पाठवण्यात येणार आहेत.

३. या दोन्ही ठरावांसह नवी मुंबई येथील विमानतळाचे नामांतर ‘लोकनेते दि.बा. पाटील नवी मुंबई विमानतळ’ असे करण्याचा ठरावही या वेळी संमत करण्यात आला. हा ठराव मान्यतेसाठी केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्रालयाकडे पाठवण्यात येणार आहे.