पाकिस्तानी जिहादी आतंकवाद्याला अटक

भारतीय सैन्याच्या चौकीवर आक्रमणासाठी पाकच्या कर्नलने दिले होते ११ सहस्र रुपये !

घायाळ पाकिस्तानी जिहादी आतंकवादी तबराक हुसेन

राजौरी (जम्मू-काश्मीर) – येथील सीमेवरून भारतीय सैन्याने तबराक हुसेन (वय ३२ वर्षे) या पाकिस्तानी जिहादी आतंकवाद्याला अटक केली आहे. घुसखोरी करतांना तो पळून जात असतांना सैन्याने केलेल्या गोळीबारात तो घायाळ झाल्यानंतर त्याला पकडण्यात आले, तर त्याचे अन्य साथीदार पळून गेले. त्याने चौकशीत सांगितले की, पाकच्या सैन्याच्या युनूस चौधरी या कर्नलने भारतीय सैन्याच्या चौकीवर आक्रमण करण्यासाठी ३० सहस्र पाकिस्तानी रुपये (१० सहस्र ९८० भारतीय रुपये) दिले होते.

भारतीय सैनिकांनी दिले ३ बाटल्या रक्त !

तबराक हुसेन पळून जात असतांना गोळीबारात घायाळ झाला. त्याच्या मांडीला आणि खांद्यावर दोन गोळ्या लागल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत होता. त्याला उपचारांसाठी रुग्णालयात भरती केले. अतिरक्तस्त्रावामुळे त्याला रक्ताची आवश्यकता असल्याचे डॉक्टांनी सांगितल्यावर सैनिकांनी त्याला रक्तदान करण्याचा निर्णय घेतला. त्याला ३ बाटल्या रक्त चढवण्यात आले. त्याच्यावर शस्त्रक्रिया करुन त्याला अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे. त्याची प्रकृती सध्या स्थिर आहे. तो पाकव्याप्त काश्मीर (पीओके) येथील कोटली जिल्ह्यातील सब्जकोट गावचा रहिवासी आहे.

संपादकीय भूमिका

भारतीय सैनिकांची गांधीगिरी ! महंमद घोरीच्या इतिहासापासून भारतीय काहीच शिकलेले नाही, हेच अशा घटना परत परत सांगतात ! सापांना दूध पाजल्यावर ते अमृत नाही, तर गरळच ओकणार, हे भारतियांच्या कधी लक्षात येणार ?

वर्ष २०१६ मध्येही अटक केली होती

भारतीय सैन्याने वर्ष २०१६ मध्ये याच परिसरातून तबराक हुसेन आणि त्याचा भाऊ हारून अली यांना याच ठिकाणी घुसखोरीच्या प्रयत्नाच्या वेळी पकडले होते; परंतु नोव्हेंबर २०१७ मध्ये त्यांना मानवतेच्या आधारावर सोडण्यात आले होते. (त्याच वेळी हुसेन याच्यावर कारवाई केली असती, तर आज ही वेळ आली नसती ! – संपादक) हुसेन पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेसाठी २ वर्षांपासून काम करत आहे. नियंत्रणरेषा ओलांडून लष्कर-ए-तोयबाच्या प्रशिक्षण शिबिरात त्याने ६ आठवड्यांचे प्रशिक्षण घेतले आहे. १६ डिसेंबर २०१९ या दिवशी हुसेन याचा दुसरा भाऊ महंमद सईद याला त्याच भागात भारतीय सैनिकांनी पकडले होते.