(म्हणे) ‘विकसित देशांमध्ये महिला चंद्रावर जात असतांना भारतीय महिला चाळणीतून चंद्राला पहातात !’ – राजस्थानचे मंत्री गोविंदराम मेघवाल

‘करवा चौथ’विषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी भाजपची टीका

(हिंदु महिला पतीच्या दीर्घायुष्यासाठी ‘करवा चौथ’ हे व्रत करतात.)

राजस्थानचे मंत्री गोविंदराम मेघवाल

जयपूर (राजस्थान) – विकसित देशांमध्ये महिला चंद्रावर जात आहेत. चीन आणि अमेरिका येथे महिला विज्ञानाच्या जगात वावरत आहेत; पण आजही भारतातील महिला ‘करवा चौथ’च्या दिवशी चाळणीतून चंद्राकडे पहातात, हे दुर्दैव आहे. लोकांना अंधश्रद्धेच्या गर्तेत ढकलले जात आहे. लोक धर्म आणि जाती यांच्या नावावर एकमेकांशी भांडत आहेत, असे वक्तव्य येथील काँग्रेसचे मंत्री गोविंदराम मेघवाल यांनी ‘डिजिफेस्ट’ कार्यक्रमाच्या समारोप समारंभात केले. या वेळी मुख्यमंत्री अशोक गेहलोत हेही उपस्थित होते. त्यांच्या वक्तव्यानंतर विरोधी पक्ष असलेल्या भाजपने ‘मंत्री मेघवाल यांनी क्षमायाचना करावी आणि मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी मंत्र्यांच्या विरोधात कारवाई करावी’, अशी मागणी केली आहे.

याविषयी प्रतिक्रिया व्यक्त करतांना भाजपचे प्रदेश प्रवक्ते तथा आमदार रामलाल शर्मा म्हणाले की, भारतीय वंशाच्या कल्पना चावला अंतराळात गेल्या होत्या आणि अनेक भारतीय महिला वैमानिक म्हणून काम करत आहेत, याची मंत्र्यांना जाणीव नाही, असे वाटते.

मंत्री गोविंदराम मेघवाल यांनी यापूर्वीही अनेक वादग्रस्त वक्तव्ये केली आहेत.

संपादकीय भूमिका 

  • भारतीय महिलांनी धार्मिकता जोपासतात, त्याप्रमाणे त्या अनेक क्षेत्रांत आघाडीवरही आहेत ! असे असूनही त्यांचा जाणीवपूर्वक अपमान करणार्‍या मंत्र्यांनी महिलांची क्षमा मागावी !
  • मंत्री महोदय इतर पंथांतील व्रतांविषयी असे वक्तव्य करण्याचे धाडस करतील का ?