पाकिस्तानमध्ये एका विश्‍वविद्यालयातील स्पर्धेमध्ये फडकावण्यात आला भारताचा राष्ट्रीय ध्वज !

ध्वज फडकावणार्‍या विद्यार्थ्याला नंतर रोखले !

पाकच्या मुलतान शहरातील निश्तार वैद्यकीय विश्‍वविद्यालयात भारतीय तिरंगा फडकावला गेला

इस्लामाबाद (पाकिस्तान) – भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त देशात सरकारकडून ‘हर घर तिरंगा’ अभियान राबवण्यात येत आहे. या पार्श्‍वभूमीवर पाकिस्तानातही असा प्रयत्न करण्यात आल्यावर त्याला विरोध झाल्याचा एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहे.

या व्हिडिओमध्ये एका महाविद्यालयातील कार्यक्रमात एक विद्यार्थी व्यासपिठावर चढून भारतीय तिरंगा ध्वज फडकावत असून पार्श्‍वभूमीवर ‘वन्दे मातरम्’ गीत ऐकू येत आहे. ही घटना पाकच्या मुलतान शहरातील निश्तार वैद्यकीय विश्‍वविद्यालयातील आहे. पाकिस्तानी पत्रकार गुलाम अब्बास शाह यांनी हा व्हिडिओ ट्वीट केला आहे.

त्यांनी म्हटले आहे की, या विश्‍वविद्यालयातील एका स्पर्धेमध्ये शहरातील शहिदा इस्लाम महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून हा झेंडा फडकावण्यात आला; मात्र लगेच त्याला रोखण्यात आले. हे विद्यार्थी एकेका देशाचे प्रतिनिधित्व करत होते. त्यात भारताचाही समावेश होता; मात्र तरीही नंतर तिरंगा ध्वज फडकावणार्‍या विद्यार्थ्याला रोखण्यात आले.