महाराष्ट्रात रहात असतांना मराठी भाषा शिका ! – भगतसिंह कोश्यारी, राज्यपाल

गुजराती समाजाच्या कार्यक्रमातील विधान !

महाराष्ट्रात रहात असतांना मराठी भाषा शिका ! – भगतसिंह कोश्यारी

मुंबई – महाराष्ट्रात रहात असतांना मराठी भाषा शिका, असा समुपदेश राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी गुजराती समाजाच्या एका कार्यक्रमात गुजराती समुदायाला दिला आहे. ‘गुजराती सांस्कृतिक फोरम’ या मुंबईतील सामाजिक आणि सांस्कृतिक संस्थेने विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणार्‍या ११ प्रसिद्ध गुजराती व्यक्तींचा सत्कार समारंभ आयोजित केला होता. त्या वेळी ते बोलत होते. या व्यक्तींचा सत्कार राज्यपालांच्या हस्ते राजभवन येथे करण्यात आला.

कोश्यारी पुढे म्हणाले, ‘‘भारत हा सुंदर पुष्पगुच्छाप्रमाणे विविधतेने नटलेला देश आहे. प्रत्येक राज्याची वेशभूषा आणि भाषा इत्यादींविषयी स्वतंत्र ओळख असली, तरीही सर्व भारतियांना जोडणारे राष्ट्रीय चारित्र्य समान आहे. देशातील राष्ट्रीयतेची भावना वृद्धींगत करण्यासाठी प्रत्येकाने आपली सांस्कृतिक ओळख जपतांना स्थानिक संस्कृतीशी एकरूप होणे आवश्यक आहे.’’