गेल्या ६ मासांत ‘ॲमेझॉन’चे जंगल मुंबईच्या साडेसहा पट क्षेत्रफळाएवढे नष्ट !

ॲमेझॉन’चे जंगल

ब्राझिलिया (ब्राझील) – जगातील २० टक्के प्राणवायू बनवणार्‍या आणि त्यामुळेच ‘पृथ्वीचे हृदय’ समजले जाणार्‍या दक्षिण अमेरिका खंडातील ‘ॲमेझॉन’ जंगलात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केली जात आहे. गेल्या ६ मासांत मुंबई महानगराच्या साडेसहा पट, म्हणजे ३ सहस्र ९८८ चौरस किमी ‘ॲमेझॉन’ जंगल नष्ट करण्यात आले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण १०.६ टक्के अधिक आहे.

या जंगलाचा अनुमाने ६० टक्के भाग ब्राझिलमध्ये आहे. वृक्षतोडीचा हा वेग प्रत्येक मासागणिक वाढत आहे. ‘रॉयटर्स’ या आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, जंगलतोडीसह वणवे लागण्याच्या घटनाही वाढल्या आहेत. गेल्या १५ वर्षांची आकडेवारी पाहिल्यास जून २०२२ मध्ये येथे सर्वाधिक आगीच्या घटना घडल्या आहेत. या आगीस प्रामुख्याने शेतकरीच कारणीभूत असतात. हे शेतकरी प्रथम जंगलाला आग लावून झाडे नष्ट करतात आणि शेतीसाठी जागा मोकळी करत असतात, तसेच यास शासकीय  अनास्थानाही कारणीभूत आहे.

संपादकीय भूमिका

जागतिक तापमानवाढ, हवामान पालट आदी समस्यांनी रौद्र रूप धारण करण्यामागे अशी अनियंत्रित वृक्षतोडच कारणीभूत आहे ! प्रकृतीच्या असमतोलास उत्तरदायी असलेल्या अशा घोडचुकाच मानवाला नष्ट करतील, हे लक्षात घ्या !