त्वचेच्या बुरशी संसर्गावर (‘फंगल इन्फेक्शन’वर) आयुर्वेदाचे उपचार


१. बुरशीच्या संसर्गाची लक्षणे

‘जांघा, काखा, मांड्या, नितंब (कुल्ले) इत्यादी भागांवर जेथे घामामुळे त्वचा ओली रहाते, तेथे काही वेळा खाज सुटून लहान लहान फोड येतात आणि ते पसरत जाऊन गोलसर आकाराची चकंदळे निर्माण होतात. या चकंदळांच्या कडा उचललेल्या, तांबूस आणि फोडयुक्त असून मध्यभाग मात्र पांढरट अन् कोंडा असलेला असा दिसतो. हे बुरशीचा संसर्ग झाल्याचे लक्षण असते. हा बुरशीचा संसर्ग बरा होण्यासाठी पुढीलपैकी कोणताही एक उपचार करून पहावा, तसेच पुढे दिलेल्या आनुषंगिक सूचनांचे पालन करावे.

२. बुरशी संसर्गावर उपचार

वैद्य मेघराज पराडकर

अ. नारळाची करवंटी पेटवून ती लोखंडाच्या स्वच्छ पत्र्यावर किंवा पालथ्या घातलेल्या तव्यावर ठेवावी. ही करवंटी जळत असतांना करवंटीमधून करवंटीच्याच रंगाचे तेल निघते. पत्र्यावरील तेल वाळून पत्र्याला चिकटण्यापूर्वी हाताच्या बोटाने पटकन जेथे जेथे बुरशीचा संसर्ग झाला आहे, तेथे तेथे लावावे. पत्रा गरम झालेला असल्याने बोट फार काळ पत्र्याला टेकवून ठेवू नये. काहींना थेट करवंटीचे तेल लावल्याने त्वचा भाजून निघते. तसे होऊ नये, यासाठी आधी त्वचेवर नारळाचे तेल चोपडावे आणि त्यावर करवंटीचे तेल लावावे. हा उपाय सकाळ – संध्याकाळ केल्यास बुरशीचा संसर्ग केवळ ३ – ४ दिवसांतच आटोक्यात येतो. बुरशीच्या संसर्गावरील हा सर्वांत नामी उपाय आहे. (इरोड, तमिळनाडू येथील ‘एस्.के.एम्.’ या आस्थापनाचे करवंटीचे तेल मिळते. याला तमिळ भाषेत ‘सिरट्टै तैलम्’ म्हणतात. ‘Chirattai thailam’ असे गूगल संकेतस्थळावर शोधून येणार्‍या संकेतस्थळावरून हे तेल ‘ऑनलाईन’ मागवता येते. या तेलाचे २ – ३ थेंब तेवढ्याच नारळाच्या तेलात मिसळून बुरशी संसर्ग झालेल्या त्वचेला लावावे.)

आ. वरील उपाय शक्य नसल्यास करवंटी जाळून तिची राख करावी आणि ती बारीक चाळणीने चाळून घ्यावी. दिवसातून ३ – ४ वेळा, तसेच रात्री झोपण्यापूर्वी ही राख खाज येणार्‍या भागांवर फासावी. झाकणाला बारीक छिद्रे केलेल्या डबीत राख भरून ठेवल्यास ती टाल्कम पावडरप्रमाणे लावता येते.

इ. आयुर्वेदाच्या औषधांच्या दुकानात ‘गंधकर्पूर’ नावाचे मलम मिळते. उडुपी, कर्नाटक येथील ‘एस्.डी.एम्.’ आस्थापनाचे हे मलम ‘ऑनलाईन’ही उपलब्ध आहे. ‘Gandha karpura’ असे गूगलच्या संकेतस्थळावर शोधल्यास याविषयीच्या मार्गिका (लिंक) उपलब्ध होतात. हे मलम खाज येणार्‍या भागांवर दिवसातून ३ – ४ वेळा लावावे. मलम लावण्यापूर्वी शरिराचा तो तो भाग स्वच्छ धुऊन कोरडा करून घ्यावा.

ई. रात्री झोपण्यापूर्वी देशी गायीचे चमचाभर गोमूत्र किंवा गोमूत्र अर्क यांमध्ये चिमूटभर हळद मिसळून त्वचेला लावावी.

३. काही आनुषंगिक सूचना

अ. अधिक त्रास होत असल्यास दिवसातून २ वेळा अंघोळ करावी.

आ. अंघोळ करतांना साबण वापरू नये. साबणामुळे त्वचेची प्रतिकार क्षमता न्यून होते. साबणाऐवजी त्रिफळा चूर्ण, बेसन, उटणे किंवा यांचे मिश्रण वापरावे.

इ. नेहमी सुती कपडे वापरावेत. कपडे नेहमी कोरडे असावेत.

ई. बुरशीचा संसर्ग असणार्‍या व्यक्तीने स्वतःचे वापरलेले कपडे प्रतिदिन धुवावेत. प्रतिदिन स्नानानंतर वापरलेले अंगपुसणे (टॉवेल) धुवावे. बर्‍याच वेळा वापरलेले कपडे डेटॉल इत्यादींनी धुतले जातात; परंतु अंगपुसणे धुण्याचे लक्षात येत नाही. त्यामुळे अंगपुसणे आठवणीने धुवावे.

उ. दुसर्‍याचे कपडे किंवा साबण वापरू नये.

ऊ. वरील उपचारांनी लाभ न झाल्यास स्थानिक वैद्य किंवा त्वचारोग तज्ञ यांना भेटावे.

ए. बुरशी संसर्गावर केवळ येथे दिलेलीच औषधे वापरायला हवे, असे नाही. कोणत्याही उपचारपद्धतीनुसार उपचार घेतले, तरी चालतील; परंतु ‘उपचारांमध्ये सातत्य असणे’, हा बुरशी संसर्गजन्य विकारांवरील उपचारांचा सर्वांत महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे उपचारांमध्ये एक दिवसही खंड पडू देऊ नये. कोणत्याही उपचारपद्धतीतील तज्ञांनी सांगितलेले उपचार नियमित करावेत.’

– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (८.२.२०१५)

सूचना : ‘आयुर्वेदाची महती सर्वांना समजावी, यासाठी हा लेख आहे. कोणतेही औषध वैद्यांच्या सल्ल्यानेच घ्यावे. या लेखात पेठेतील सिद्ध आयुर्वेदाची औषधांची नावे ही वाचकांच्या सोयीसाठी दिली आहेत. या औषधांशी संबंधित आस्थापनांशी ‘सनातन प्रभात’चा कोणताही आर्थिक हितसंबंध नाही’, याची वाचकांनी कृपया नोंद घ्यावी. – संपादक