एका विशेष समुदायाची लोकसंख्या वाढली, तर अराजक निर्माण होण्याचा धोका असतो ! – मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – लोकसंख्या नियंत्रण कार्यक्रम यशस्वीरित्या पुढे नेला पाहिजे जेणेकरून भविष्यात लोकसंख्येच्या कारणाने असमतोल निर्माण होऊ नये. असे होऊ नये की, मूळनिवासींची लोकसंख्या न्यून होईल आणि एका विशेष समुदायाची लोकसंख्या वाढत जाईल. त्यातून अराजक निर्माण होण्याचा धोका असतो, असे विधान उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी येथे केले. ते जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ पुढे म्हणाले की, असे होऊ नये की, एखाद्या समुदायाची लोकसंख्या वाढण्याची गती अधिक असेल आणि मूळनिवासींची लोकसंख्या अल्प होत असेल. लोकसंख्येचा असमतोल देशासाठी चिंतेचा विषय आहे. जेथे धार्मिक लोकसंख्येवर परिणाम होतो, तेथे एका कालावधीनंतर अराजक आणि अव्यवस्था निर्माण होते. अशा वेळी जेव्हा आम्ही लोकसंख्येवर नियंत्रण आणण्याविषयी सांगतो, तेव्हा समाजातील प्रत्येक जात, धर्म, क्षेत्र आणि भाषा यांच्या पलीकडे जाऊन त्याविषयीचा कार्यक्रम राबवण्यास सांगतो.

 (सौजन्य : HW News Network)

संपादकीय भूमिका

लोकसंख्या नियंत्रणासाठी केंद्र सरकारने लवकरात लवकर कायदा केला पाहिजे, तसेच समान नागरी कायदाही संमत केला पाहिजे. यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केंद्र सरकारवर दबाव निर्माण आणावा, असे हिंदूंना वाटते !