शेतीमालांवर ५ टक्के वस्तू आणि सेवा कर लावल्याने किंमती वाढणार !

पुणे – केंद्र सरकारने पॅकिंग (बांधणी) केलेल्या आणि लेबल (नाव) लावलेल्या सर्व खाद्यपदार्थांवर, तसेच शेतीमालावर ५ टक्के जी.एस्.टी. (वस्तू आणि सेवा कर) लावण्याचा निर्णय घेतल्यामुळे महागाई वाढणार आहे. त्याचा परिणाम सामान्य ग्राहकांवर होणार आहे, असे मत व्यापाऱ्यांनी व्यक्त केले आहे.

किरकोळ भुसारी (किराणा माल) मालाची विक्रीही जी.एस्.टी.च्या कक्षेत येणार आहे. यापूर्वी केंद्र सरकारने वस्तू आणि सेवा कर यांमध्ये केवळ नोंदणीकृत नामांकित आस्थापनांच्या वस्तूंवर जी.एस्.टी. लावला होता. आता शेतीमालावर कर लागू केल्यामुळे याचा सामान्यांना अधिक फटका बसणार आहे, असे मत अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे सदस्य सूर्यकांत पाठक यांनी व्यक्त केले आहे.

फेडरेशन ऑफ असोसिएशन्स ऑफ महाराष्ट्रचे (फाम) वरिष्ठ उपाध्यक्ष राजेश शहा यांनी ‘केंद्र सरकारने या निर्णयाचा फेरविचार करण्याची आवश्यकता आहे’, असे मत व्यक्त केले.