पूरस्थितीतील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवा ! – मुख्यमंत्री

(प्रतिकात्मक चित्र)

मुंबई – पूरस्थितीत जीवितहानी होऊ नये, यासाठी जिल्हाधिकारी, तसेच जलसंपदा विभाग यांनी सावध राहून योग्य ती दक्षता घ्यावी. ‘एन्.डी.आर्.एफ.’च्या पथकांना सज्ज ठेवा. पूरस्थितीत नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

श्री. एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

१. चिपळूणमधील परिस्थितीकडे सातत्याने लक्ष ठेवावे. तेथील नागरिकांना वारंवार आवश्यक त्या सूचना देऊन सावध ठेवावे. रायगड, रत्नागिरी, ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग, तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांनाही पूरस्थितीविषयी वेळीच सूचना द्यावी. नागरिकांच्या स्थलांतराची योग्य व्यवस्था करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

२. कुंडलिनी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. अंबा, सावित्री, पाताळगंगा, उल्हास आणि गाढी या नद्यांतील पाणीही धोक्याच्या पातळीच्या जवळ पोचले आहे. जगबुडी, काजळी या नद्यांचे पाणी धोक्याच्या पातळीच्या वरून वहात आहे. याविषयी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या भागांतील नागरिकांना वेळीच आवश्यक त्या सूचना देण्याचे निर्देश दिले आहेत.

३. राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांच्याशी चर्चा करून पूरस्थितीतील जिल्ह्यांतील पालक सचिवांना संबंधित जिल्ह्यांत जाऊन पूरस्थितीची प्रत्यक्ष पहाणी करून आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.