मराठी पाट्या नसल्यास कारवाई ! – अभय गिते, कामगार उपायुक्त

लोणावळा (जिल्हा पुणे) – दुकाने आणि आस्थापने येथे मराठी पाट्या लावण्याची कारवाई अधिक तीव्र करत मराठी पाट्या न लावणाऱ्या आस्थापनांवर कारवाई करण्यात येईल. जर दुकानदार न्यायालयाच्या कार्यवाहीपासून वाचला, तर त्याला दंड आकारण्यात येईल, अशी चेतावणी कामगार उपायुक्त अभय गिते यांनी दिली आहे. नामफलक हा मराठी देवनागरी लिपीसह इतर भाषेतही लिहू शकतो; मात्र मराठी भाषेतील नामफलक प्रारंभी लिहिणे आवश्यक आहे. मराठी भाषेतील नामफलकावरील अक्षरांचा आकार इतर भाषेतील अक्षरांच्या आकारापेक्षा लहान असू नये. ज्या आस्थापनात कोणत्याही प्रकारे मद्यविक्री किंवा मद्यपान सेवा दिली जात असेल, तर अशा आस्थापनास महापुरुष/ महनीय महिला यांची किंवा गड-दुर्गांची नावे देण्यात येऊ नयेत, असा निर्णय घेण्यात आला आहे.

पुणे जिल्ह्यातील विशेषतः लोणावळा परिसरात मराठी पाट्या नसल्याच्या तक्रारी शासनाकडे प्राप्त झाल्या आहेत. लोणावळा आणि खंडाळा ही महत्त्वाची पर्यटनस्थळे आहेत. मोठ्या संख्येने पर्यटक या ठिकाणी येतात. अनेक नामांकित हॉटेल्स आणि रिसॉर्ट्स, संस्था, चिक्कीची दुकाने शेकडोंच्या संख्येने येथे आहेत. तक्रारी वाढत असल्याने दुकाने आणि आस्थापने यांची निरीक्षकांकडून पडताळणी चालू करण्यात आली आहे. कारवाई अन् दंड टाळण्यासाठी दुकाने आणि आस्थापने यांवरील पाट्या नियमानुसार असाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.