दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाच्या निमित्ताने हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांच्या ‘प्राईम टी.व्ही. गोवा’ या वृत्तवाहिनीने घेतलेल्या मुलाखतीचे सूक्ष्म परीक्षण !

१२ ते १८ जून २०२२ या कालावधीत गोव्यामध्ये श्री रामनाथ देवस्थानाच्या सभागृहात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने दशम ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन’ होत आहे. या पार्श्वभूमीवर ९ जून २०२२ या दिवशी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांची ‘प्राईम टी.व्ही. गोवा’ या वृत्तवाहिनीचे पत्रकार श्री. संदीप केरकर यांनी मुलाखत घेतली. तिचे ‘यू ट्यूब’ वर झालेले थेट प्रक्षेपण पहात असतांना देवाने माझ्याकडून करून घेतलेल्या सूक्ष्म परीक्षणातील महत्त्वाची सूत्रे येथे देत आहे.

श्री. रमेश शिंदे

१. श्री. शिंदे यांच्याभोवती श्री दुर्गादेवीचे संरक्षककवच निर्माण झाल्यामुळे त्यांचे अनिष्ट शक्तींच्या आक्रमणांपासून रक्षण होणे

श्री. शिंदे बोलत असतांना त्यांच्या भोवती श्री दुर्गादेवीने ३ टक्के मारक शक्ती प्रक्षेपित करून त्यांच्या भोवती श्री दुर्गादेवीचे कवच निर्माण केले. त्यामुळे ही मुलाखत चालू असतांना अनिष्ट शक्तींना त्यांचे मन आणि बुद्धी यांच्यावर त्रासदायक आवरण निर्माण करता आले नाही.

२. श्री. शिंदे जेव्हा हिंदु धर्माशी संबंधित असणारे विषय बोलतात, तेव्हा त्यांच्याकडून पुष्कळ प्रमाणात धर्मतेजाचे प्रक्षेपण होऊन धर्मप्रसार, धर्मजागृती आणि धर्मरक्षण हे धर्मकार्य होणे

श्री. शिंदे यांच्या अंत:करणात धर्मबीज असल्यामुळे त्यांच्याकडे धर्मलोकातून धर्मशक्ती आणि धर्मतेज यांचा प्रवाह आकृष्ट झाला. त्यामुळे त्यांचा सूक्ष्मदेह केशरी रंगाच्या धर्मशक्तीने भारित झाला होता आणि त्यांच्या लिंगदेहातून धर्मविचारांचे मोठ्या प्रमाणात प्रक्षेपण होत होते. अशा प्रकारे श्री. शिंदे जेव्हा हिंदु धर्माशी संबंधित असणारे विषय बोलतात, तेव्हा त्यांच्याकडून पुष्कळ प्रमाणात धर्मतेजाचे प्रक्षेपण होऊन धर्मप्रसार, धर्मजागृती आणि धर्मरक्षण हे धर्मकार्य होते.

कु. मधुरा भोसले

३. श्री. शिंदे यांच्यावर श्री गणेशाची कृपा असल्यामुळे त्यांना राष्ट्र आणि धर्म यांच्याशी संबंधित ज्ञान प्राप्त होणे आणि श्री सरस्वतीदेवीची कृपा असल्यामुळे त्यांच्या ओजस्वी वाणीतून धर्मज्ञान शब्दरूपाने प्रगट होणे

श्री. शिंदे यांच्यावर श्री गणेशाची कृपा असल्यामुळे त्यांना राष्ट्र आणि धर्म यांच्याशी संबंधित ज्ञान प्राप्त होते आणि श्री सरस्वतीदेवीची कृपा असल्यामुळे त्यांच्या ओजस्वी वाणीतून धर्मज्ञान शब्दरूपात प्रगट होते. अशा प्रकारे श्री. शिंदे यांच्यावरील श्री गणेशाच्या कृपेमुळे ज्ञानशक्ती आणि श्री सरस्वतीदेवीच्या कृपेमुळे ब्राह्मतेज कार्यरत होऊन त्यांचे प्रक्षेपण वायूमंडलात होते. त्यामुळे श्री. शिंदे यांच्या संपर्कात येणार्‍या आणि त्यांचे व्याख्यान ऐकणार्‍या व्यक्ती प्रभावित होऊन धर्मविचारांनी प्रेरित होऊन धर्मप्रसार, धर्मरक्षण आणि धर्मसेवा करण्यासाठी कृतीप्रवण होतात.

४. श्री. शिंदे यांची सूर्यनाडी चालू होऊन त्यातून श्री दुर्गादेवीची मारक शक्ती प्रवाहित होऊन त्यांच्या वाणीतून क्षात्रतेज प्रगट होणे

श्री. शिंदे यांच्यामध्ये आवश्यकतेनुसार हिंदु राष्ट्राची स्थापना करण्यासाठी राष्ट्रशक्तीचे प्रतीक असणार्‍या श्री दुर्गादेवीची शक्ती कार्यरत होते. त्यामुळे त्यांची आवश्यकतेनुसार सूर्यनाडी चालू होऊन त्यातून पुष्कळ प्रमाणात श्री दुर्गादेवीची मारक शक्ती आणि शब्दातून क्षात्रतेजाने ओतप्रोत भरलेली वाणी कार्यान्वित होते. त्यामुळे धर्मावरील आक्रमणे ऐकून निद्रिस्त हिंदू जागृत होऊन त्यांचा सुप्त असलेला धर्माभिमान प्रकट होतो. त्यामुळे जागृत हिंदूंची संख्या दिवसेंदिवस वृद्धींगत होत आहे.

५. श्री. शिंदे यांचे व्यक्तीमत्त्व आणि त्यांची वाणी यांनी प्रभावित झालेल्या जागृत हिंदूंचे त्यांच्याकडून यशस्वीपणे अन् उत्तम संघटन होणे

श्री. शिंदे यांची बुद्धी कुशाग्र असण्यासह त्यांच्यामध्ये नियोजनकौशल्य आणि नेतृत्वगुणही आहेत. त्यामुळे त्यांची वाणी ऐकून जागृत झालेल्या हिंदूंचे ते यशस्वीपणे उत्तम संघटन करू शकतात. त्यामुळे भारतातील विविध राज्यांतील जागृत हिंदू संघटित होत आहेत.

६. श्री. रमेश शिंदे यांची विविध योगमार्गांनुसार असणारी विविध गुणवैशिष्ट्ये

७. हिंदु राष्ट्र स्थापन करण्याच्या दैवी कार्यामध्ये श्री. रमेश शिंदे यांचा मोठा वाटा असणे

अशा प्रकारे श्री. रमेश शिंदे हे हिंदु जनजागृती समितीला मिळालेले अनमोल रत्नच आहे. ते धर्मलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहेत. त्यामुळे त्यांना धर्मसंस्थापनेचा ध्यास लागलेला आहे. त्यामुळे त्यांची धर्मज्ञानाने ओथंबलेली वाणी ऐकून सामान्य हिंदूच नव्हे, तर ‘सेक्युलर’ आणि बुद्धीवादी वर्गही धर्मविचारांनी प्रेरित होऊन धर्मरक्षण, धर्मसेवा आणि धर्मप्रसार करण्यासाठी कृतीप्रवण होतो. हे श्री. रमेश शिंदे यांचे वैशिष्ट्य आहे. हिंदु राष्ट्र स्थापन करण्याच्या दैवी कार्यामध्ये श्री. रमेश शिंदे यांचा मोठा वाटा असेल. धर्मकार्यातील त्यांचे अनमोल योगदान हा हिंदु समाज कधीही विसरणार नाही.

श्री. रमेश शिंदे यांच्यातील विविध गुणांमुळे त्यांच्यावर परात्पर गुरु डॉ. आठवले यांची अखंड कृपादृष्टी आहे. त्यामुळे श्री. शिंदे यांची धर्मसेवेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात समष्टी साधना होऊन आध्यात्मिक उन्नती होणार आहे आणि त्यांची वाटचाल ईश्वरप्राप्तीच्या दिशेने वेगाने होणार आहे.

कृतज्ञता

श्रीगुरूंच्या कृपेमुळे श्री. रमेश शिंदे यांची आध्यात्मिक वैशिष्ट्ये समजली आणि हिंदु राष्ट्र स्थापन करण्याची प्रेरणा मिळाली’, यासाठी मी श्रीगुरूंच्या चरणी कोटीश: कृतज्ञ आहे.

– कु. मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के) (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान) सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१०.६.२०२२)

  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म-परीक्षण’ म्हणतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक