श्री तुळजाभवानी देवस्थान अपहार आणि विशाळगड अतिक्रमण प्रकरणांमध्ये कारवाई करण्याची मागणी !
नागपूर, ११ जून (वार्ता.) – श्री तुळजाभवानी मंदिरात झालेल्या अपहारातील दोषींना कठोर शिक्षा व्हावी, तसेच विशाळगडाचे रक्षण करून तेथील अतिक्रमणाच्या विरोधात कारवाई करण्यात यावी, यांसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने श्री. अतुल अर्वेनला यांनी भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस तथा विधानपरिषदेचे आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांना निवेदन दिले.
या निवेदनामध्ये पुढील मागण्या केल्या आहेत. तुळजाभवानी देवीचे मंदिर शासकीय नियंत्रणात असतांना तेथील सिंहासन दानपेटीच्या लिलावात कोट्यवधी रुपयांचा अपहार झाला आहे. याला ३१ वर्षे पूर्ण होऊनही अद्याप दोषींवर कुठलीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे दोषींना त्वरित अटक करून त्यांना शिक्षा करावी आणि मंदिराची अपहार झालेली रक्कम चक्रवाढ व्याजासह मंदिराला परत द्यावी. विशाळगडावर अतिक्रमण करणाऱ्या दोषींना कडक शिक्षा द्यावी आणि मंदिर तसेच गड यांची होणारी हानी भरून काढावी.