पंढरपूर, १० जून (वार्ता.) – आषाढी यात्रेत विठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी लाखोंच्या संख्येने भाविक येत असतात. सध्या काही जिल्ह्यात पुन्हा कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे आरोग्य विभागाने कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांसमवेत पंढरपूर येथे कोरोना पडताळणी केंद्र चालू करावे, तसेच रुग्णास तात्काळ उपचार मिळण्यासाठी ‘कोरोना केअर सेंटर’ची निर्मिती करावी, अशा सूचना आपत्ती व्यवस्थापन केंद्राचे संचालक (यशदा) कर्नल विश्वास सुपनेकर यांनी दिल्या. आषाढी यात्रा कालावधीत आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत कराव्या लागणार्या कामांच्या पूर्व सिद्धतेच्या प्रशिक्षणाविषयी येथील नवीन भक्त निवास मध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी त्यांनी या सूचना दिल्या.
या बैठकीस बैठकीस प्रांताधिकारी गजानन गुरव, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, तहसिलदार सुशील बेल्हेकर, मुख्याधिकारी अरविंद माळी, मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाढ, तसेच संबंधित विभागाचे विभागप्रमुख उपस्थित होते.
या वेळी सुपनेकर म्हणाले,
१. वारी कालावधीत गर्दीच्या ठिकाणी, तसेच ज्या ठिकाणी भाविक मोठ्या प्रमाणात थांबतात, त्याठिकाणी भाविकांच्या सुविधेसाठी शीघ्र कृती दलाची नियुक्ती करावी. प्रदक्षिणा मार्ग, नदी पात्र, घाट, पत्राशेड, दर्शन रांग, मंदिराचा परिसर, तसेच ६५ एकर या ठिकाणी वेगवेगळे संभावित धोके लक्षात घेता तात्काळ प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. अग्नीशमन यंत्रणा सज्ज ठेवावी.
२. यात्रा कालावधीत शहरातील सर्व स्रोतातील पाण्याच्या नमुन्यांची प्रतिदिन पडताळणी करावी. महावितरण आस्थापनेने रोहित्रांची, तसेच विद्युत् वाहक तार पडताळणी करावी.