‘श्री गुरुदेव दत्त ।’ या नामजपाचा सनातनच्या तीन गुरूंशी संबंध असल्याचे साधिकेला जाणवणे

आज सकाळपासूनच मला श्री दत्तगुरूंचे स्मरण होऊन त्यांची भजने आठवत होती. सकाळी सेवा झाल्यावर मी रामनाथी आश्रमातील ध्यानमंदिरात नामजपाला बसले. तेव्हा ‘ध्यानमंदिरातील अष्टदेवतांपैकी दत्ताच्या चित्राकडे बघून ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप करूया’, असा विचार माझ्या मनात आला आणि मी डोळे बंद करून ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप एकाग्रतेने करण्यास आरंभ केला. नामजप करत असतांना एक-दोन मिनिटांनी ‘श्री गुरुदेव दत्त ।’ या नामजपाविषयी माझ्या मनात आपोआप विचार येऊ लागले आणि गुरुकृपेने मला ते लगेच वहीत लिहिताही आले. त्या वेळी ‘ध्यानमंदिरातील गुरुतत्त्व पूर्ण जागृत आहे’, असे मला जाणवत होते. तेव्हा ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप म्हणजे आपल्या तीनही गुरूंचे (टीप) स्मरण कसे आहे, हे गुरुदेवच मला सांगत आहेत’, असे मला वाटले.

(टीप : तीन गुरु म्हणजे परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले आणि त्यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ अन् श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ)

१. ‘श्री गुरुदेव दत्त ।’ या नामजपातील  ‘श्री’ म्हणजे श्री महालक्ष्मीस्वरूप श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ !

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ, परात्पर गुरु डॉ. आठवले आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ

‘श्री गुरुदेव दत्त ।’ या नामजपातील ‘श्री’ म्हणजे श्री महालक्ष्मीस्वरूप श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ या आहेत. त्या ज्ञानशक्तीद्वारे जगभरातील साधकांना साधनेत मार्गदर्शन करून त्यांना साधनेसाठी प्रवृत्त करतात. सनातनच्या ‘बिंदूचा सिंधू’ होण्यासाठी (सनातनच्या कार्याचा विस्तार होण्यासाठी) त्या मातृभावाने डोळ्यांत तेल घालून अखंडपणे कार्य करत आहेत. गुरुदेवांची प्रीती आणि भक्ती यांचे बोधामृत साधकांना पाजण्याचे कार्य त्या अविरतपणे करत आहेत. तेव्हा ‘अष्टमहासिद्धी त्यांना प्रसन्न आहेत; म्हणून त्या ‘श्री’ आहेत’, असा विचार माझ्या मनात आला.

२. ‘श्री गुरुदेव दत्त ।’ या नामजपातील ‘गुरुदेव’ म्हणजे परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले !

परात्पर गुरु डॉ. आठवले हे आपले ‘गुरुदेव’ आहेत. ते साक्षात् श्री महाविष्णु असून सर्वकाही त्यांच्याच इच्छेनुसार घडत आहे. शिष्यभाव कसा असावा ? हे स्वतःच्या आचरणातून शिकवणारे ते जणू चालते बोलते गुरुकुलच आहेत. सगुण रूपात रामनाथी आश्रमात, तर निर्गुण रूपाने सर्व साधकांच्या अंतरात राहून त्यांना शिकवणारे ‘गुरुदेव’ परात्पर गुरु डॉ. आठवलेच आहेत.

३. ‘श्री गुरुदेव दत्त ।’ या नामजपातील ‘दत्त’ म्हणजे श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ !

‘दत्त’ म्हणजे अखंड भ्रमंती ! भक्तांच्या उद्धारासाठी आणि गुरुदेवांच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) कार्याचा भक्तीमहिमा सांगण्यासाठी श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ या देश-विदेशांत भ्रमंती करत आहेत. सनातनच्या कार्याचा वटवृक्ष करणे आणि गुरुदेवांच्या छत्रछायेखाली अनेक जिवांना आणणे, ही सेवा अविरतपणे करणाऱ्या श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळकाकू या ‘दत्तगुरुच’ आहेत.

सौ. निवेदिता जोशी

त्यामुळे म्हणावेसे वाटते,

‘दत्त येऊनिया उभा ठाकला ।
सद्भावे साष्टांगे प्रणिपात केला ।
प्रसन्न होऊनी आशीर्वाद दिधला ।
जन्म-मरणाचा फेरा चुकविला ।।’

त्यामुळेच ‘हे तीनही गुरु ‘श्री गुरुदेव दत्त ।’ या नामजपात आहेत’, असे मला वाटते.

हे सर्व सुचण्यापूर्वी मला एक साधिका श्रीमती भाग्यश्री आणेकर यांनी श्री महालक्ष्मीदेवीच्या चरणांवरील कुंकू ‘प्रसाद’ म्हणून दिले होते. ते कुंकू कपाळाला लावून मी ध्यानमंदिरात जप करायला गेल्यानंतर मला हे सर्व सुचले. त्याबद्दल श्री महालक्ष्मीदेवी आणि श्री गुरुदेव यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !

– सौ. निवेदिता जोशी (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१६.३.२०२२)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक