‘ईडी’ने ‘पी.एफ्.आय.’ आणि ‘रिहॅब इंडिया फाऊंडेशन’ या संघटनांची ३३ बँक खाती गोठवली

नवी देहली – काळा पैसा पांढरा करण्याच्या प्रकरणी अर्थात् ‘मनी लाँड्रिंग’च्या प्रकरणे अंमलबजावणी संचालनालयाने (‘ईडी’ने) कट्टर इस्लामी संघटना ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ (पी.एफ्.आय.) आणि तिची साहाय्यक संघटना ‘रिहॅब इंडिया फाऊंडेशन’  या दोन्ही संघटनांची ३३ बँक खाती गोठवली. ‘मनी लाँड्रिंग’ प्रतिबंधक कायद्याच्या अंतर्गत ही कारवाई करण्यात आली असल्याचे वृत्त ‘पीटीआय’ने प्रसिद्ध केले आहे.
‘पी.एफ्.आय.’ ही इस्लामिक संघटना वर्ष २००६ मध्ये केरळ राज्यात स्थापन झाली. तिचे मुख्यालय देहलीमध्ये आहे. ‘ईडी’ ने  निवेदनात म्हटले आहे की, वरील दोन्ही संघटनांना संशयास्पद स्रोतांकडून मोठ्या प्रमाणात पैसे मिळाले असल्याचे अन्वेषणात आढळून आले आहे. ‘पी.एफ्.आय.’च्या खात्यात ६० कोटी रुपयांहून अधिक रक्कम जमा झाली आहे, तर ‘रिहॅब इंडिया फाऊंडेशन’च्या खात्यात अनुमाने ५८ कोटी रुपये जमा झाले आहेत. देशातील नागरिकत्व (दुरुस्ती) कायद्याच्या विरोधात लोकांना भडकावल्याच्या आरोपाखाली ‘पी.एफ्.आय.’ची ‘ईडी’ कडून चौकशी चालू आहे.

संपादकीय भूमिका 

आता अशा संघटनांवर सरकारने त्वरित बंदी घातली पाहिजे !