सातारा, ३१ मे (वार्ता.) – देशातील कायदा आणि सुव्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी पोलीस अव्याहतपणे कार्यरत असतात; मात्र सातारा जिल्ह्यातील सेवानिवृत्त पोलिसांना स्वत:च्या विविध मागण्या मान्य करण्यासाठी सातारा पोलीस मुख्यालयासमोर आंदोलन करण्याची वेळ आली. सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन असो किंवा कार्यालयीन कामांविषयी दिली जाणारी हीन प्रतीची वागणूक असो, अशा विविध विषयांसाठी हे आंदोलन करण्यात आले. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याची चेतावणी आंदोलनात सहभागी झालेल्या सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्यांनी केली.