१. महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने साधकांना देण्यात येणाऱ्या शिक्षणाचा उद्देश आणि महत्त्व !
‘मनुष्याला ईश्वरप्राप्ती करवून देण्यासाठी आवश्यक ते शिक्षण देणे’, हा महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचा मूळ उद्देश आहे. यासाठी या विश्वविद्यालयामध्ये देण्यात येणाऱ्या शिक्षणातून साधकांची शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक या तीनही स्तरांवर सिद्धता करण्यात येते. अशा तीनही स्तरांवर सिद्ध झालेल्या साधकांना महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने ईश्वराधिष्ठित आनंदी जीवन जगण्यासोबतच ‘उत्तम राष्ट्र निर्मिती आणि धर्म जागृती’, यांसाठी करावयाच्या प्रयत्नांचे आवश्यक असे परिपूर्ण शिक्षण देऊन त्यांना घडवण्यात येईल.
२. आपत्काळास आरंभ झाल्याने श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ काही साधकांसमवेत दैवी दौरे करत असून आध्यात्मिक स्तरावरची ठिकठिकाणची माहिती गोळा करून हिंदु संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या विविध गोष्टींचे जतन करत असणे
आपल्या भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य लक्षात घेऊन महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या सेवेच्या अंतर्गत श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ आणि त्यांच्या समवेत काही साधक गेल्या काही वर्षांपासून देश-विदेशांत भ्रमण करून सर्वत्रची आध्यात्मिक स्तरावरची अमूल्य माहिती गोळा करत आहेत.
विविध तीर्थक्षेत्रे, ऐतिहासिक स्थळे, संगीत, कला अशा विविध क्षेत्रांमधील दैवी चैतन्याने भारीत असलेल्या आध्यात्मिक वस्तू, तसेच ग्रंथ, तीर्थ, दगड, माती अशा भारतीय (हिंदु) संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या विविध गोष्टी यांचे जतन करण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे.
३. आपत्काळात या गोष्टींची माहिती उपलब्ध होण्याविषयी शंका असल्याने आणि भविष्यकाळात पुढच्या पिढीला याचे ज्ञान होण्यासाठी या अनमोल ठेव्याच्या प्राप्तीसाठी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ आणि त्यांच्या समवेतचे साधक यांनी हे कठीण परिश्रम घेणे
या अनमोल ठेव्याच्या प्राप्तीसाठी आज केलेले हे परिश्रम भविष्यकाळात पुढच्या पिढीसाठी वरदानच असणार आहेत. आता आपत्काळाला आरंभ झाला आहे. अनेक संतांनी सांगितल्याप्रमाणे ‘येणारा काळ फार कठीण आहे. अशा स्थितीत जर तिसरे महायुद्ध झाले, तर पृथ्वीवर काय आणि किती शेष राहील, हे सांगता येत नाही.’ जर युद्धात या गोष्टींचा नाश झाला, तर पुढच्या पिढीला शिक्षण देण्यासाठी आपल्या हातात काहीच रहाणार नाही. यासाठीच हे परिश्रम घेतले जात आहेत.
४. मिळवलेल्या माहितीचा संग्रह आणि त्याविषयीचे ग्रंथ यांचे जतन केल्याने पुढील पिढीला त्यांचा अभ्यास करणे शक्य होणार असणे
संतांनी सांगितल्याप्रमाणे काळानुसार हे ईश्वरीकार्य चालू आहे. आताच्या काळात या सर्व माहितीचा केवळ संग्रह करणे आणि त्याविषयीचे ज्ञान असलेले ग्रंथ जतन करणे, हीच मुख्य सेवा आहे. महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या माध्यमातून या गोष्टी बीजस्वरूपात जतन केल्यामुळे येणाऱ्या पिढीला त्यांचा अभ्यास करता येईल. त्यामुळे या गोष्टींची उपयुक्त माहिती पुन्हा पुढच्या पिढीच्या माध्यमातून समाजात संक्रमित होईल.
५. साधना म्हणून या सगळ्याचा अभ्यास करणारे सर्व विद्यार्थी उन्नत साधक असतील; म्हणून त्यांना या संदर्भातील पुढचे ज्ञानही देव देईल आणि पुन्हा आपली सनातन भारतीय संस्कृती संपूर्ण जगासमोर एक नवे चैतन्य घेऊन उदयास येईल.’
– एक साधक, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१८.४.२०२०)