सनातन संस्थेचे संस्थापक आणि हिंदु जनजागृती समितीचे प्रेरणास्थान परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने . . .
दिंडीत ७०० हिंदुत्वनिष्ठ, धर्मप्रेमी आणि साधक यांचा सहभाग !
बेळगाव, ३० मे (वार्ता.) – ‘वीरराणी चन्नम्माचा विजय असो, झाशीची राणी लक्ष्मीबाईचा विजय असो, लाना होगा, लाना होगा, हिंदु राष्ट्र लाना होगा’, ‘हर हर महादेव’, ‘भारतमातेचा विजय असो’, ‘जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम्’ अशा घोषणा देत भावपूर्ण आणि उत्साहपूर्ण वातावरणात सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने बेळगाव येथे नुकतीच ‘हिंदू एकता दिंडी’ काढण्यात आली. या दिंडीच्या माध्यमातून भाव, चैतन्य आणि क्षात्रतेज यांचा अपूर्व संगम दाखवण्यात आला. या दिंडीत हिंदुत्वनिष्ठ संघटनांसह विविध संप्रदाय सहभागी होते.
या फेरीसाठी सनातन संस्थेच्या संत पू. विजया दीक्षित यांची वंदनीय उपस्थिती होती. या दिंडीमध्ये बेळगाव आणि बेळगाव जिल्ह्यातील साधक आणि धर्मप्रेमी उपस्थित होते. दिंडीत शंखनाद श्री. हनमंत होणगेकर यांनी केले. श्री गणेशवंदन आणि देवतांना प्रार्थना करून ‘हिंदू एकता दिंडी’ला धर्मप्रेमी श्री. यल्लप्पा पाटील यांच्या हस्ते धर्मध्वजपूजनाने प्रारंभ झाला. दिंडीच्या प्रारंभी सनातनच्या संत पू. विजया दीक्षित यांनी स्वतः केलेली भावपूर्ण प्रार्थना म्हटली.
परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या पालखीचे पूजन धर्मप्रेमी श्री. आणि सौ. अनिता कल्लापा मोरे यांनी केले, तर भाजपचे आमदार अनिल बेनके यांच्या पत्नी सौ. मीना बेनके यांनी ५ सुवासिंनीसह आरती केली. यानंतर शहरातील नाथ पै चौक येथून दिंडीला प्रारंभ झाला. खडे बाजार (शहापूर), श्यामाप्रसाद मुखर्जी मार्गे (एस्.पी.एम्.रोड) श्री कपिलेश्वर मंदिराजवळील रेणुका उपाहारगृह येथे सांगता झाली.
दिंडीच्या समोर धर्मध्वज, मागे परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे छायाचित्र असलेली दिव्य चैतन्यदायी पालखी, विविध फुलांनी सजवलेल्या रथामध्ये परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे छायाचित्र, तर छोट्या फुलांनी सजवलेल्या वाहनावर श्रीरामाचे छायाचित्र लावण्यात आले होते.
दिंडीच्या प्रारंभी सनातनच्या संत पू. विजया दीक्षित यांनी केलेली भावपूर्ण प्रार्थना…परम पूज्यांचे चरणी ठेवूया मस्तक |
दिंडीत सहभागी झालेले पथके आणि देखावे
पालखीच्या दोन्ही बाजूंनी नऊवारी साडी नेसलेल्या सुवासिनींचे डोक्यावर कलश घेतलेले पथक, टाळ-मृदंग घेतलेले वारकरी पथक, स्वरक्षण प्रात्यक्षिके सादर करणारी पथके, रणरागिणी पथक, सनातन संस्थेचा बालकक्ष, आरोग्य साहाय्य समितीचे पथक, रणरागिणी पथक, असे दिंडीचे स्वरूप होते. दिंडीमध्ये हातात भगवे ध्वज घेऊन विविध घोषणा देत सनातन संस्थेचे साधक, हितचिंतक आणि विविध संप्रदाय यांचे अनुयायी सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. संभाजी चव्हाण आणि सौ. चैताली यादव यांनी केले. दिंडी जात असतांना तिचे वाटेत धर्मध्वजाची आरती ओवाळून, तसेच पुष्पवृष्टी करून अनेकांनी स्वागत केले. भगवान श्रीकृष्ण, नारदमुनी, छत्रपती शिवाजी महाराज, झाशीची राणी, तुकाराम महाराज आणि मावळे असे पारंपरिक वेशातील बालसाधकांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
दिंडीचे भावपूर्णरित्या पुष्पवृष्टी करून स्वागत !
हितचिंतक श्री आणि सौ. रेश्मा विजय पवार, श्री आणि सौ. वेदा चेतन पत्तार, श्री आणि सौ. स्नेहल शिरीष कांदेकर यांनी दिंडीवर पुष्पवृष्टी करून दिंडीचे स्वागत केले.
दिंडीत सहभागी झालेले हिंदुत्वनिष्ठ आणि मान्यवर
इस्कॉन, वारकरी भजनी मंडळ, नंदीहळ्ळी (जिल्हा बेळगाव), अनगोळ (जिल्हा बेळगाव) येथील श्री विठ्ठल बिरदेव मंदिराचे धनगर समाजाचे ढोलपथक, कर्तव्य महिला मंडळाच्या आणि मानवाधिकार आयोगाच्या उपाध्यक्षा सौ. आक्काताई सुतार, भाजप महिला आघाडीच्या सौ. प्रज्ञा शिंदे, सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती, अवचारहट्टी (जिल्हा बेळगाव) येथील श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचे श्री. सचिन कुरंगी यांसह कार्यकर्ते, गौंडवाड (जिल्हा बेळगाव) येथील धर्मप्रेमी श्री. सतीश पाटील हे त्यांच्या मित्रांसह सहभागी होते, तसेच बेळगाव जिल्ह्यातील एकूण २०० धर्मप्रेमी हे कुटुंबांसह दिंडीत सहभागी झाले होते.
साहाय्य
• श्री काळभैरवनाथ मंदिराचे श्री. गुरुनाथ महाराज राऊळ यांनी मंदिरासमवेत आसंदी आणि पटल उपलब्ध करून दिले.
• बेळगाव येथील धर्मप्रेमी श्री. रत्नप्रसाद पवार यांनी दिंडीतील रथ विनामूल्य उपलब्ध करून दिला.
• धर्मप्रेमी श्री. ओंकार हेरेकर यांनी रणरागिणी पथकातील जीप वाहन दिले.
• रूचिरा कॅटर्सचे मालक श्री. व्यंकटेश शिंदे, सॅफ्रन उपाहारगृहाचे मालक श्री. शिलपित आचार्य, अजंठा उपाहारगृहाचे मालक श्री. दिनेश, अभिनंदन फॅक्टरीचे मालक श्री. दोड्डन्नावर यांनी दिंडीतील उपस्थितांसाठी खाऊ दिला.
दिंडीतील वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे…
१. बेळगाव येथील सनातनची साधिका कु. अक्षता भोंगाळे हिने दिंडीत सादर केलेले भरतनाट्य पहाण्यासाठी अनेकांनी गर्दी केली होती.
२. दिंडीत बेळगाव आणि खानापूर (जिल्हा बेळगाव) येथील सनातनच्या साधिकांनी लाठीकाठीचे, तर साधकांनी दंड साखळीचे प्रात्यक्षिके दाखवून क्षात्रतेज दाखवले.
३. नंदीहळ्ळी (जिल्हा बेळगाव) येथील वारकरी संप्रदायातील वारकर्यांनी दिंडीमध्ये पूर्णवेळ अभंग म्हटले, तसेच मधे मधे रिंगण सोहळाही साजरा केला. रिंगण सोहळा पाहून उपस्थित लोक भारावून गेले. ‘आम्ही आषाढी एकादशीच्या वारीमध्येच सहभागी झालो आहोत, असे आम्हाला वाटले’, असे वारकर्यांनी सांगितले.
४. दिंडी चालू असतांना २ दुकानांत लेमन गोळ्या आणण्यासाठी एक साधिका गेली असता दिंडी पाहून भारावून गेलेल्या त्या दोन्ही दुकानदारांनी लेमन गोळ्यांनी भरलेले २ डबे विनामूल्य दिले.
५. हिंदु राष्ट्राचा जागर करण्यासाठी निघालेल्या दिंडीत सद्गुरूंचे चालू असलेले मधूर गीत आणि श्रीरामाचा नामजप केल्यामुळे दिंडीचा आध्यात्मिक आणि चैतन्य यांच्या स्तरावर साधकांसह इतरांना लाभ झाला.
६. अनेकांनी दिंडीतील साधकांना दिंडीचा उद्देश विचारून घेतला.
७. दिंडीचा आवाज ऐकून उपाहारगृह आणि दुकान यांमध्ये गेलेले लोक रस्त्यावर येऊन उत्सुकतेने आणि कौतुकाने दिंडी पहात होते.
८. दिंडी चालू असतांना बंदोबस्तात असणार्या पोलिसांनी वारकर्यांची शिस्तबद्धता पाहून त्यांचे कौतुक केले, तसेच ‘इतर सर्व कार्यक्रमांपेक्षा ही दिंडी वेगळी आणि चैतन्यमय वाटली’, असे पोलिसांनी सांगितले.
क्षणचित्रे…
१. दिंडी चालू झाल्यापासून ते शेवटपर्यंत पोलिसांचे चांगले सहकार्य मिळाले. पोलिसांनी दिंडीच्या मार्गावरील वाहतून अन्य मार्गाने वळवल्याने दिंडीतील सहभागी संप्रदायातील अनुयायी आणि सनातनचे साधक यांना रस्त्यावर विविध प्रात्यक्षिके सादर करणे सोपे झाले.
२. दिंडी एका रांगते शिस्तबद्ध पद्धतीने काढण्यात आली.