पास्टर डॉम्निक याच्या विरोधात अन्वेषण चालूच रहाणार ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

(पास्टर म्हणजे पाद्री)

पणजी, २९ मे (वार्ता.) – आमिषे दाखवून हिंदूंचे बलपूर्वक धर्मांतर करणारा ‘बिलिव्हर्स’चा पास्टर डॉम्निक याच्या विरोधात अनेक प्रकरणे नोंद झाली आहेत. पास्टर डॉम्निक याची जामिनावर सुटका झालेली असली, तरी पोलिसांनी डॉम्निक याच्या घरावर छापा टाकून त्याचा भ्रमणभाष आणि इतर साहित्य कह्यात घेतले आहे. पास्टर डॉम्निक याच्या बलपूर्वक धर्मांतराच्या प्रकरणाचे अन्वेषण यापुढेही चालू रहाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. पोलिसांनी पास्टर डॉम्निक याला २६ मे या दिवशी अटक केली होती; मात्र २७ मे या दिवशी त्याला सशर्त जामिनावर सोडण्यात आले होते.

मुख्यमंत्री म्हणाले, ‘‘पास्टर डॉम्निक बळजोरीने धर्मांतर करत होता, अशा स्वरूपाच्या अनेक तक्रारी पोलिसांकडे आल्या आहेत. पास्टर डॉम्निक याने आजार बरा करण्यासाठी दिलेले तेल लावल्यानंतर एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. गोवा सरकार घटनेने प्रत्येकाला दिलेल्ये अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा सन्मान करते; मात्र सरकार कोणत्याही परिस्थितीत बळजोरीने, पैसे किंवा वस्तू यांचे आमीष दाखवून केले जाणारे धर्मांतर खपवून घेणार नाही. पास्टर डॉम्निक याच्या विरोधात झालेली कारवाई ही कायद्यानुसारच आहे.

पास्टर डॉम्निक याच्याकडील आलिशान गाड्यांविषयी प्रश्नचिन्ह !

पास्टर डॉम्निक याच्याकडे ‘मर्सिडीज’, ‘थार’, ‘एव्हेंजर’ आदी आस्थापनांच्या एकूण ५ अलिशान गाड्या आणि २ दुचाकी असल्याचे पोलिसांना अन्वेषणाच्या वेळी आढळले. विशेष म्हणजे पास्टर डॉम्निक याने वर्ष २०१६ मध्ये खरेदी केलेल्या आलिशान ‘मर्सिडीज’ गाडीवरील ‘रस्ता कर’ तत्कालीन सरकारने त्याचे समाजकार्य पाहून माफ केला होता, अशी माहितीही उघडकीस आली आहे. पास्टर डॉम्निक याच्याकडे आलिशान गाड्या कुठून आल्या ? याची ‘अंमलबजावणी संचालनालया’च्या माध्यमातून अन्वेषण करण्याची मागणी होत आहे. या पार्श्वभूमीवर म्हापसा पोलीस अधिक तपास करत आहे.

गोव्यात धर्मांतराच्या कारवायांना थारा दिला जाणार नाही आणि यापुढेही कुठे धर्मांतराच्या विरोधात तक्रार आल्यास त्वरित कारवाई केली जाणार आहे. आवश्यकता भासल्यास आगामी पावसाळी अधिवेशनात धर्मांतरविरोधी कायदा आणणार आहे’’, असे प्रतिपादन मुख्यमत्र्यांनी २८ मे या दिवशी केले.

संपादकीय भूमिका

उठसूठ कुठल्याही प्रकरणात हिंदु संतांना आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करून त्यांच्याविरोधात सातत्याने गरळकओक करणारी प्रसारमाध्यमे हिंदूंना आमिषे दाखवून त्यांचे बलपूर्वक धर्मांतर करणार्‍या पाद्र्याच्या कृतीविषयी अवाक्षरही काढत नाहीत, हे लक्षात घ्या !