अनधिकृत पब आणि ‘डान्स बार’ यांच्यावर कारवाई करा ! – कळंगुटवासियांची मागणी

(प्रतिकात्मक चित्र)

म्हापसा, १८ मे (वार्ता.) – कळंगुट परिसरात चालत असलेले अनधिकृत पब आणि ‘डान्स बार’ यांच्यामुळे जागतिक स्तरावर प्रसिद्ध असलेल्या कळंगुट गावातील शांती भंग झालेली आहे. या अनधिकृत व्यवसायावर शासनाने त्वरित कारवाई करावी, अशी मागणी कळंगुटवासियांनी १८ मे या दिवशी मोठ्या संख्येने एकत्र येऊन केली.

कळंगुट परिसरात रात्रीच्या वेळी स्थानिक युवती किंवा महिला रस्त्यावर बाहेर पडू शकत नाहीत. रात्रीच्या वेळेला कळंगुट येथील रस्ते वेश्याव्यवसायातील दलाल आणि ग्राहक यांनी भरलेले असतात. कळंगुट परिसरात ‘बार अँड रेस्टॉरंट’ या नावाने सुमारे १८ ते २० पब आणि ‘डान्स बार’ कार्यरत आहेत. हा व्यवसाय गोव्याबाहेरील लोक चालवत आहे. शासनाने या व्यवसायांवर त्वरित कारवाई करावी, अशी मागणी कळंगुटवासियांनी या वेळी केली. आंदोलन करणारी एक महिला म्हणाली, ‘‘सरकारने अनधिकृत पब आणि ‘डान्स बार’ यांवर पुढील १५ दिवसांत कारवाई न केल्यास नागरिक रस्त्यावर उतरतील.’’

संपादकीय भूमिका

अशी मागणी जनतेला का करावी लागते ? अनधिकृत पब आणि ‘डान्स बार’ कुणाच्या संगनमताने चालतात ? संबंधितांवर कारवाई का होत नाही ?